भारतासाठी सोपा पेपर

>> आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना

विश्‍वचषक स्पर्धेत अपराजित असलेली टीम इंडिया व लागोपाठच्या पराभवामुळे अवसान गळालेला अफगाणिस्तान यांच्यात आज शनिवारी सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ दुबळ्या अफगाणिस्तानचा पराभव करून गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे प्रमुख फिरकीपटू राशिद खानला इंग्लंडने चोप दिल्यामुळे संपूर्ण अफगाण संघाने खांदे पाडले आहेत.

शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार सारखे दिग्गज खेळाडू नसतानादेखील भारतीय संघाला फरक पडलेला नाही. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवून आपली क्षमता दाखवून दिली आहे. सराव करताना विजय शंकरला किरकोळ दुखापत झाली असली तरी आजच्या सामन्याला तो मुकण्याची शक्यता फार कमी आहे. पाकविरुद्धच्या सामन्यातील त्याची कामगिरी पाहता त्याला वगळून विराट कोहली ऋषभ पंतला खेळविण्याची शक्यता दिसत नाही. विजय व केदारमुळे भारताला गोलंदाजीत पर्यायांची कमतरता जाणवणार नाही. भुवनेश्‍वर कुमारची जागा मोहम्मद शमी घेणार असून यामुळे नव्या चेंडूने बुमराहला नवीन जोडीदार मिळणार आहे. युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना सातत्य राखण्यात अपयश आले असून ‘जोडी’ म्हणून धावा रोखण्यात किंवा बळी घेण्यात ही दुकली कमी पडली आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध पुन्हा भरात येण्याचा मौका या दोघांना आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तान संघाला वादांनी ग्रासले आहे. विश्‍वचषकासाठी अफगाण संघ निवडलेल्या समितीचे प्रमुख दौलत अहमदझाय व संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने याचा गंभीर परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसून आला आहे. अफगाण संघाने स्पर्धेतील पाचही सामने गमावले आहेत. भारताविरुद्ध त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणे योग्य नसून बांगलादेशने दाखवलेला लढावू बाणा अफगाणिस्तानकडूनही दिसल्यास क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढणार आहे.