ब्रेकिंग न्यूज़

भारताने पाकिस्तानला लोळवले

>> मिळविला ८९ धावांनी विजय

>> रोहित शर्माचे तुफानी शतक

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील काल रविवारी झालेल्या एकतर्फी लढतीत टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ८९ धावांनी पराभव केला. पावसाने बाधित या लढतीत पाकसमोर विजयासाठी ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य होते. परंतु, त्यांना ६ बाद २१२ धावांपर्यंतच जाता आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या. कालच्या विजयासह भारताने विश्‍वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अपराजित घोडदौड कायम राखताना १९९२च्या विश्‍वचषकापासूनची परंपरा कायम राखली. विश्‍वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड ७-० असा झाला आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांना मात्र सार्थ ठरवता आला नाही. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथम एकत्र डावाची सुरुवात करताना पहिल्या गड्यासाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली.

राहुलने आपले तिसरे वनडे अर्धशतक झळकावताना ५७ धावा केल्या. रियाझने राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला. या द्वयीने दुसर्‍या यष्टीसाठी ९८ धावांची भागीदारी केली. हसन अलीने रोहितला बाद करत ही जोडी फोडली. रोहितने आपले २४वे वनडे शतक पूर्ण केले. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पंड्याने १९ चेंडूंत २६ धावांची छोटेखानी परंतु, उपयुक्त खेळी केली. पंड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस विराटने शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. कोहली वैयक्तिक ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ‘रिव्ह्यू’चा वापर केला असता तर त्याला आपली विकेट राखता आली असती. पण, तसे झाले नाही. केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ठरली. या आधी २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ३०० धावा ठोकल्या होत्या.

धावफलक
भारत ः लोकेश राहुल झे. बाबर गो. वहाब ५७, रोहित शर्मा झे. वहाब गो. हसन (११३ चेंडू, १४ चौकार, ३ षटकार), विराट कोहली झे. सर्फराज गो. आमिर ७७ (६५ चेंडू, ७ चौकार), हार्दिक पंड्या झे. बाबर गो. आमिर २६, महेंद्रसिंग धोनी झे. सर्फराज गो. आमिर १, विजय शंकर नाबाद १५, केदार जाधव नाबाद ९, अवांतर ११, एकूण ५० षटकांत ५ बाद ३३६
गोलंदाजी ः मोहम्मद आमिर १०-१-४७-३, हसन अली ९-०-८४-१, वहाब रियाझ १०-०-७१-१, इमाद वासिम १०-०-४९-०, शादाब खान ९-०-६१-०, शोएब मलिक १-०-११-०, मोहम्मद हफीझ १-०-११-०
पाकिस्तान ः (लक्ष्य ४० षटकांत ३०२) ः इमाम उल हक पायचीत गो. शंकर ७, फखर झमान झे. चहल गो. कुलदीप ६२, बाबर आझम त्रि. गो. कुलदीप ४८, मोहम्मद हफीझ झे. शंकर गो. पंड्या ९, सर्फराज अहमद त्रि. गो. शंकर १२, शोएब मलिक त्रि. गो. पंड्या ०, इमाद वासिम नाबाद ४६, शादाब खान नाबाद २०, अवांतर ८, एकूण ४० षटकांत ६ बाद २१२
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार २.४-०-८-०, जसप्रीत बुमराह ८-०-५२-०, विजय शंकर ५.२-०-२२-२, हार्दिक पंड्या ८-०-४४-२, कुलदीप यादव ९-१-३२-२, युजवेंद्र चहल ७-०-५३-०