भारताने जपानवर डागले पाच गोल

भारताने जपानवर डागले पाच गोल

नवीन प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना भारतीय हॉकी संघाने काल बुधवारी झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेेच्या शुभारंभी लढतीत जपानचा ५-१ असा धुव्वा उडविला. दोनवेळच्या विजेत्या व विद्यमान उपविजेत्या भारताने नूतन प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना आपल्या पहिल्याच लढतीत जपानला दयामाया न दाखवता विशाल विजय साकारला. भारतीय खेळाडूंनी तब्बल २३ वेळा जपानच्या सर्कलमध्ये दाखल होत आक्रमकतेचे दर्शन घडविले. सामन्याच्या तिसर्‍या मिनिटाला आकाशदीप सिंग याने रचलेल्या चालीवर एस. व्ही. सुनील याने भारताचा पहिला गोल नोंदविला. या आघाडीचा आनंद भारतीय संघाला अधिक वेळ उपभोगता आला नाही. केंजी कितिझातो याने पुढील मिनिटाला जपानला बरोबरी साधून देणारा गोल केला. गोलपोस्टजवळ भारतीय खेळाडूंमधील गोंधळाचा फायदा उठवत त्याने हा गोल केला. पहिल्या सत्राअखेर भारतीय संघ १-१ असा बरोबरीत होता. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी सलग दोन मिनिटांत सुनीलने दोन गोलसंधी गमावल्या. हरमनप्रीतचा फटका रोखून जपानने भारतावर दबावाचा प्रयत्न केला. परंतु, २२व्या मिनिटाला ललित उपाध्याय याने ‘रिव्हर्स हिट’वर भारतीय संघाला पुन्हा आघाडीवर नेले. मध्यफळीतील मनप्रीत सिंग व रमणदीप सिंग यांच्या अचूक पासेसमुळे सुनील, आकाशदीप व उपाध्याय यांनी जपानच्या बचावफळीची वेळोवेळी परीक्षा पाहिली. दुसर्‍या सत्राअखेर भारताने २-१ अशी आघाडी कायम राखली. बचावात्मक खेळाचा फटका जपानला तिसर्‍या सत्रात बसला. रमणदीप सिंग याने उजव्या कोपर्‍यातून अचूक फटका खेळत भारताचा तिसरा गोल केला. या गोलच्या वैधतेची पडताळणी करण्यासाठी टीव्ही रिप्लेचा सहारा घ्यावा लागला. हरमप्रीत सिंगने ३५व्या व ४८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा चौथा व पाचवा गोल केला. दिवसातील दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला ७-० असे लोळविले. आज मलेशिया वि. चीन व द. कोरिया वि. ओमान यांच्यात सामने होणार आहेत.