ब्रेकिंग न्यूज़

भारताचे पहिल्याच दिवशी वर्चस्व

>> अफगाणिस्तान विरूद्धची ऐतिहासिक कसोटी;  ६ बाद ३४७; धवन, मुरलीची शतके
ऐतिहासिक कसोटीत भारत पहिल्याच दिवशी वरचढ बेंगळुरू सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या दमादर शतकांच्या जोरावर भारताने  ६ गडी गमावत ३४७ अशी धावसंख्या उभारीत अफगाणिस्ताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रास्तापित केले आहे. या सामन्याद्वारे अफगाणिस्ताने आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये आपले पदार्पण केले आहे.
काल नाणेफेक जिंकून भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवन आणि मुरलीने सावध प्रारंभ केला. परंतु खेळपट्टीवर जम बसविल्यानंतर दोघांनीही आक्रमक फलंदाजी करीत पहिल्या विकेटसाठी २८.४ षट्‌कांत १६८ धावांची शतकी भागीदारी केली. १९ चौकार आणि ३ षट्‌कारांच्या सहाय्याने ९६ चेंडूत १०७ धावांची आक्रमक शतकी खेळी केलेला धवन दुसर्‍या सत्रात यामिन अहमद्जाईच्या गोलंदाजीवर मोहम्मद नाबीकडे झेल देऊन परतला. त्याचे हे शतक विक्रमी ठरले. पहिल्याच सत्रात शतक नोंदविणारा तो भारताचा पहिला तर क्रिकेट जगतातला सहावा फलंदाज ठरला.
दरम्यान, मुरली विजयने आपले शतक पूर्ण केले. पावसाच्या व्यत्ययामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला. त्यानंतर १५ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने १५३ चेंडूत १०५ धावांची शतकी खेळी केलेला विजय वफादारच्या एका चेंडूवर फसला व पायचित होऊन परतला. त्याने दुसर्‍या विकेटसाठी लोकेश राहुलच्या साथीत ११२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानी गोलंदाजांनी लय मिळविताना भारताचे आणखी चार फलंदाज तंबूत पाठविले.  मधल्या फळीत लोकेश राहुलचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. राहुलने ८ चौकारांनिशी ६४ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा ३५ धावा करून परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेलाही फारशी चमक दाखवता आली नाही व तो केवळ १० धावा जोडून बाद झाला. अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानचा तो पहिला बळी ठरला. मुरली कार्तिक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचित झाला.  अखेर रविचंद्रन आश्विन आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये नेटाने फलंदाजी करुन दिवस खेळून काढला.
अफगाणिस्तानकडून यामीन अहमदजाईने २ तर वफादार, मुजीब उर रेहमान आणि राशिद खानने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
धावफलक,
भारत, पहिला डाव ः मुरली विजय पायचित गो. वफादार १०५,
शिखर धवन झे. मोहम्मद नाबी गो. यामिन अहमदजाई १०७, लोकेश राहुल त्रिफळाचित गो. यामिन अहमदजाई ५४, चेतेश्वर पुजारा झे. मोहम्मद नाबी गो. मुजीर उर रेहमान ३५, अजिंक्य रहाणे पायचित गो. राशिद खान १०, दिनेश कार्तिक धावचित ४, हार्दिक पंड्या खेळत आहे १०, रविचंद्रन अश्विन खेळत आहे ६.
अवांतर ः १५. एकूण २८.७८ षट्‌कांत ६ बाद ३४७ धावा.
गोलंदाजी ः यामिन अहमदजाई १३/६/३२/२, वफादार १५/४/५३/१, मोहम्मद नाबी ८/०/४५/०, राशिद खान २६/२/१२०/१, मुजीब उर रेहमान १४/१ /६९/१, असगर स्टॅनिझाई २/०/१६/०.
धवनचे विक्रमी शतक
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीत भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने विक्रमी शतक नोंदविले. धवनने १८ चौकार व ३ षट्‌कारांच्या सहाय्याने ८७ चेंडूत हे शतक पूर्ण केले. पहिल्या सत्रात म्हणजेच उपहारापूर्वी शतक नोंदविणारा तो भारताच पहिला फलंदाज ठरला. त्याच प्रमाणे क्रिकेट विश्वातील सहावा फलंदाज ठरला. या पूर्वी भारताच्या विरेंद्र सेहवागने पहिल्या सत्रात ९९ धावांची खेळी केली होती. त्याला पहिला शतकवीर बनण्याचा विक्रम थोडक्यात एका धावेने हुकला होता.
पहिल्या सत्रात सर्वांत प्रथम ऑस्ट्रेलियाच्या विक्टर ट्रम्पर यांनी १९०२ मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चार्ली मार्कटनी (१९२६, लीड्‌स), सर डॉन ब्रॅडमन (१९३०, लीड—स), पाकिस्तानच्या माजिद खानने (१९७६, न्यूझीलंडविरुद्धच्या कराचीत, डेव्हिड वॉर्नर (२०१७, सिडनी,  पाकिस्तानविरुद्ध) यांनी पहिल्या सत्रात शतके नोंदविली आहेत.