भारताची विंडीजवर २२ धावांनी मात

>> रोहित शर्माचे अर्धशतक

>> पावसामुळे थांबवावा लागला होता सामना

भारताने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडीज डकवर्थ लुईस पद्धतीद्वारे २२ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सदर सामना गडगडाट, विजेचा लखलखाट व पावसामुळे थांबविण्यात आला होता. त्यावेळी विंडीजने १५.३ षटकांत ४ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, ‘डीएलएस’च्या आधारे त्यांचा संघ पिछाडीवर होता. पुढे खेळ होऊ न शकल्याने भारतीय संघ विजयी झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६७ धावा केल्या होत्या.

नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजने या सामन्यासाठी सलामीवीर जॉन कॅम्पबेलला वगळून डावखुरा फिरकीपटू खारी पिएरे याला संधी दिली. पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या शिखर धवन याने या लढतीत तुलनेने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मासह त्याने संघाला ६७ धावांची सलामी दिली. रोहितने यानंतर कर्णधार विराटसह संघाला शतकी वेस ओलांडून दिली. रोहित शर्मा दुसर्‍या गड्याच्या रुपात परतल्यानंतर मात्र भारताचा डाव गडगडला. ऋषभ पंत सलग दुसर्‍या लढतीत बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. मनीष पांडेलादेखील संधीचा फायदा घेता आला नाही. कृणाल पंड्या व जडेजाने फटकेबाजी करत संघाला १६७ धावांपर्यंत पोहोचविले.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांना खेळपट्टीशी जुळवून घेणे कठीण गेले. नारायण व लुईस परतले त्यावेळी फलकावर केवळ ८ धावा लागल्या होत्या. पूरनने यानंतर नांगर टाकत एकेरीदुहेरी धावांवर भर दिला. दुसर्‍या टोकाने रोव्हमन पॉवेल भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. कृणालने या दोघांना एकाच षटकात माघारी धाडत भारताला मजबूत पकड पुन्हा मिळवून दिली.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. हेटमायर गो. थॉमस ६७ (५१ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार), शिखर धवन त्रि. गो. पॉल २३, विराट कोहली त्रि. गो. कॉटरेल २८, ऋषभ पंत झे. पोलार्ड गो. थॉमस ४, मनीष पांडे झे. पूरन गो. कॉटरेल ६, कृणाल पंड्या नाबाद २० (१३ चेंडू, २ षटकार), रवींद्र जडेजा नाबाद ९, अवांतर १०, एकूण २० षटकांत ५ बाद १६७
गोलंदाजी ः ओेशेन थॉमस ४-०-२७-२, शेल्डन कॉटरेल ४-०-२५-२, सुनील नारायण ४-०-२८-०, किमो पॉल ४-०-४६-१, कार्लोस ब्रेथवेट २-०-२२-०, खारी पिएरे २-०-१६-०
वेस्ट इंडीज ः सुनील नारायण त्रि. गो. सुंदर ४, इविन लुईस झे. व गो. भुवनेश्‍वर ०, निकोलस पूरन झे. पांडे गो. पंड्या १९, रोव्हमन पॉवेल पायचीत गो. पंड्या ५४, कायरन पोलार्ड नाबाद ८, शिमरॉन हेटमायर नाबाद ६, अवांतर ७, एकूण १५.३ षटकांत ४ बाद ९८
गोलंदाजी ः वॉशिंग्टन सुंदर ३-१-१२-१, भुवनेश्‍वर कुमार २-०-७-१, खलील अहमद ३-०-२२-०, नवदीप सैनी ३-०-२७-०, कृणाल पंड्या ३.३-०-२३-२, रवींद्र जडेजा १-०-६-०

रोहित बनला सिक्सर किंग
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार्‍यांच्या यादीत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. काल विंडीजविरुद्ध तीन षटकार लगावत त्याने त्याने आपली षटकारांची संख्या १०६ केली. विंडीजच्या ख्रिस गेलच्या नावावर १०५ षटकार आहेत. यानंतर मार्टिन गप्टिल (१०३), कॉलिन मन्रो (९२) व ब्रेंडन मॅक्कलम (९१) यांचा क्रमांक लागतो.