भारताचा सामना पाकिस्तानशी

श्रीलंका बेसबॉल महासंघाने आशियाई बेसबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या पश्‍चिम अशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसर्‍या उपांत्य लढतीत इराणचा संघ यजमान श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. १५ जुलैपासून खेळविण्यात येत असलेली सदर स्पर्धा २० जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारत, नेपाळ व श्रीलंका यांचा एका गटात तर पाकिस्तान, इराण व बांगलादेश यांचा दुसर्‍या गटात समावेश करण्यात आला होता.

पहिल्या साखळी फेरीत भारताने नेपाळला ८-० होम्सनी नमविले तर दुसर्‍या लढतीत भारताला यजमान श्रीलंकाकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंका व इराण यांच्यातील लढत आज सकाळी १० वाजता होणार असून यानंतर दुपारी १ वाजता भारत-पाकिस्तान लढत खेळविली जाईल. उपांत्य फेरीतील विजेते संघ २० रोजी अंतिम फेरीत भिडतील. तर पराभूत संघांमध्ये तिसर्‍या स्थानासाठी सामना होईल. गोव्याचा अमेय शेट्ये थर्ड बेस प्लेयर म्हणून भारतीय संघाकडून खेळत असून दिलीप नाईक संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.