भारताचा सलग दुसरा विजय

>> पोलंडवर ३-१ अशी मात

>> एफआयएच पुरुष सिरीज फायनल्स

भुवनेश्वर येथे सुरू झालेल्या एफआयएच हॉकी सीरिज फायनल्स स्पर्धेत का टीम हॉकी इंडियाने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना पोलंडचा ३-१ असा पराभव केला. आपल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने रशियाचा १०-० असा धुव्वा उडविला होता.

आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकीसंघासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानली जात आहे. प्रथम दोन स्थाने मिळविणारे संघ टोकियो ऑलिम्पिक क्वॉलिफायर स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करताना मनप्रीत सिंहने २१व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलमुळे आपले खाते खोलले. परंतु पोलंडने शानदार पुनरागमन करताना मॅटेउज हुलबोजने २५व्या मिनिटाला गोलमुळे १-१ अशी बरोबरी साधली.

दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये २६ व्या मिनीटाला मनप्रीतने आणखी एक गोल नोंदवित भारताला पुन्हा २-१ अशा आघाडीवर नेले. तर ३६ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने भारताच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.
दरम्यान, काल खेळविण्यात आलेल्या अन्य एका लढतीत आशियाई चॅम्पियन जपानने मेक्सिकोला ३-१ असे पराभूत केले. तर रशियाने उझ्बेकिस्तानचा १२-१ असा धुव्वा उडविला.