ब्रेकिंग न्यूज़
भारताचा श्रीकांत ‘वर्ल्ड नंबर वन’

भारताचा श्रीकांत ‘वर्ल्ड नंबर वन’

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने जागतिक पुरुष बॅडमिंटनमध्ये क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुष एकेरीत अव्वल स्थान मिळविणारा श्रीकांत हा पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने काल जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत श्रीकांतने डेन्मार्कच्या विश्‍वविजेत्या व्हिक्टर एक्सेलसन याला मागे टाकत ७६,८९५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर हक्क सांगितला. ७५,४७० गुण असलेल्या एक्सेलसन दुसर्‍या क्रमांकावर आहे. क्रमवारीत अव्वलस्थानापर्यंत पोहोचणारा श्रीकांत हा दुसरा भारतीय खेळाडू असून महिला एकेरीत सायना नेहवालने यापूर्वी इथपर्यंत मजल मारली होती.

श्रीकांतच्या पहिल्या क्रमांकापर्यंतच्या प्रवासात मागील दोन वर्षे निर्णायक ठरली. पुल्लेला गोपीचंद यांचा शिष्य असलेल्या श्रीकांतने २०१६ आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारताना प्रभावी कामगिरी केली होती. मागील वर्ष त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरले. या वर्षी त्याने चार सुपरसीरिज किताब जिंकताना चीनी खेळाडूला हरवले.