भाजप सरकार स्थिर ः सावंत

भाजप सरकारची लोकप्रियता वाढत असल्याने काही नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने वैफल्यग्रस्त बनल्याने बिनबुडाची व दिशाभूल करणारी वक्तव्ये ते करीत आहेत. भाजपचे सरकार स्थिर असून वैफल्यग्रस्त नेत्यांच्या वक्तव्याकडे आपण गंभीरपणे पाहत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल सांगितले.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी फातोर्डा येथे एका कार्यक्रमात भाजप सरकार टिका केली. २०१७ मध्ये मनोहर परीर्र्कर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला पाठिंबा दिला ही आपली चूक होती का ? आपण या प्रश्‍नाचे उत्तर शोधत आहे, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले.

माजी उपमुख्यमंत्री सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण भाष्य करू इच्छित नाही, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सरकारची विकास कामांकडे घोडदौड सुरू असल्याने काही नेते सैरभैर झाले आहेत. भाजपचे २७ आमदार आहेत. तसेच ३ अपक्षांचा पाठिंबा लाभलेला आहे. भाजप सरकारने सुरू केलेले कामकाज जनतेला आवडू लागले आहे. त्यामुळे आपण टीका करणार्‍यांकडे गंभीरपणे पाहत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.