भाजप – बाबुश यांचे ‘सेटिंग’चे राजकारण!

>> सुभाष वेलिंगकर यांचा आरोप
पणजी मतदारसंघात भाजपने गेली कित्येक वर्षे कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांच्याशी सेटिंगचे राजकारण केले. हे सेटिंगचे राजकारण बंद करण्यासाठी मतदारांनी गोवा सुरक्षा मंचाला साथ द्यावी, असे आवाहन वेलिंगकर यांनी काल केले.
गोवा सुरक्षा मंचाच्या पणजी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते. या सेटिंगच्या राजकारणामुळे पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केला नाही. ताळगाव ग्रामपंचायतीच्या एकाही प्रभागात भाजपने उमेदवार उभा केला नाही. भाजपने राजकारणात एका विशिष्ट वाईट प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.
भाजपने बाबुश मोन्सेर्रात यांच्यासमोर लोटांगण घातलेले आहे, असा दावा वेलिंगकर यांनी केला.  स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहार उघडकीस आणला जाणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात आलेल्या विकासकामांची श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी वेलिंगकर यांनी काल केली.
गोवा सुरक्षा मंच पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा राजकीय वारसा चालविण्याचे काम करीत आहे. पणजी मतदारसंघातील मतदार सुशिक्षित आहेत. या मतदारांना कुणी विकत घेऊ शकत नाही. सुज्ञ मतदार योग्य निर्णय घेतील, असा विश्वास वेलिंगकर यांनी व्यक्त केला.