ब्रेकिंग न्यूज़

भाजप प्रदेशाध्यक्षपदास तिघे इच्छुक

दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी कृषी व क्रीडामंत्री रमेश तवडकर हे प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी इच्छुक असून ह्या पदासाठी फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार दामू नाईक यांचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान, माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यात विळ्या भोपळ्याचे सख्य असून रमेश तवडकर यांनी नरेंद्र सावईकर यांना अध्यक्षपद देण्यास कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

राज्यात २०१७ साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी काणकोण मतदारसंघातून आपणाला उमेदवारी मिळू नये यासाठी नरेंद्र सावईकर यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आल्याने आपणाला काणकोण मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळाली नव्हती, असे तवडकर यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. तेव्हापासून सावईकर व तवडकर यांच्यात शत्रुत्व निर्माण झालेले असून हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तवडकर यांनी सावईकर यांच्यासाठी काणकोण मतदारसंघातून काम केले नव्हते. परिणामी तवडकर यांना काणकोणमधून अत्यल्प अशी आघाडी मिळाली होती, असे सूत्रानी सांगितले.

नरेंद्र सावईकर यांना आता भाजपचे प्रदेश अध्यक्षपद मिळू नये यासाठी तवडकर हे आता प्रयत्न करणार असून पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याचा प्रयत्न केल्यास कडाडून विरोध करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.