भाजप, कॉंग्रेस उमेदवारांची आज होणार अधिकृत घोषणा

>> पणजीतून मंचचे सुकेरकर अनुत्सुक

 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत उत्तर व दक्षिण गोव्यातील मिळून ४० पैकी २९ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्‍चित झाली असून त्यांपैकी १९ विद्यमान आमदार व अन्य दहा उमेदवारांचा समावेश आहे. मये व काणकोण मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने दोन्ही जागांबरोबरच सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा आज करण्यात येईल असे भाजपच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कॉंग्रेस उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस गोटातील सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत भाजप ४० पैकी ३७ जागा स्वबळावर लढविणार असून सासष्टीत ३ अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. मये व काणकोण मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मयेत कॉंग्रेसचे युवा नेते प्रवीण झांट्ये यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरविले असल्याने सभापती अनंत शेट यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. कॉंग्रेसतर्फे इच्छुकांमध्ये झांट्ये यांचे नावच नसल्याने त्यांना भाजपची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. भाजप निवडणूक समितीच्या नेत्यांनी शेट यांना वगळून अन्य नेत्याला उमेदवारी दिल्यास पक्षाबरोबर राहण्याचे स्पष्ट बजावले आहे. यामुळे मयेत शेट यांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. काणकोण मतदारसंघात मंत्री रमेश तवडकर की माजी आमदार विजय पै खोत याबाबत अटकळ कायम आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खोत यांना झुकते माप दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अद्याप या जागेचा उमेदवार निश्‍चित करण्यात आलेला नाही.
दरम्यान, भाजपविरोधात कॉंग्रेसने समविचारी पक्षांबरोबर युतीला हिरवा कंदील दिला असल्याने युतीच्या प्रश्‍नावर अंतिम निर्णय घेण्यासाठी युगोपचे बाबूश मोन्सेर्रात व गोवा फॉरवर्डचे ज्येष्ठ नेते विजय सरदेसाई यांना काल नवी दिल्लीत पाचारण करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाचे नेतेही महायुतीला अनुकूल असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न चालविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीला दोन जागा सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गडकरींची आज पणजीत सभा
दरम्यान, भाजपचे गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज दि. १२ रोजी संध्याकाळी ४ वाजता पणजी येथील गोमंतक मराठा समाजसभागृहात सभा होणार आहे. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा वापर करण्यास निवडणूक आयोगाची मान्यता घेणे सक्ती करणारा आदेश आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

सुकेरकर पणजीत अनुत्सुक
गोवा सुरक्षा मंचतर्फे पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असलेले राजूभाई सुकेरकर आरोग्याच्या कारणावरून निवडणूक लढविणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. याविषयी मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांना विचारले असता श्री. सुकेरकर हे आजारी असल्याचे त्यांनी सांगितले. सद्या ते तब्येत बरी नसल्याने आरोग्यविषयक तपासणी करून घेण्यासाठी मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल झाले असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. पणजीतून श्री. सुकेरकर निवडणूक लढवणार नसल्याने सुरक्षा मंच, मगो व शिवसेना युतीसमोर पेच निर्माण झाला आहे. सध्या मगोने पणजीत उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.