भाजपने बोलणारा पंतप्रधान दिला

भाजपने बोलणारा पंतप्रधान दिला

>> अमित शहांचे राहुल गांधींना उत्तर

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाला भाजपने काय दिले असा प्रश्‍न वारंवार करत असल्याच्या टीकेला भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात उत्तर देताना भाजपने देशाला बोलणारा पंतप्रधान दिला असल्याचे उद्गार काढले. शहा यांचा रोख तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर होता. डॉ. सिंग जास्त बोलत नसल्याबद्दल विरोधकांकडून टिकेचे लक्ष्य ठरत असत. गांधी कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी अमेठीला काय दिले असा सवालही शहा यांनी आपल्या वक्तव्यात केला. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही होते.

गुजरातमध्ये खूप कमी विकास झाला असल्याच्या राहुल गांधी यांच्या दाव्यालाही शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘ते (राहुल) गुजरातमधील विकासासंदर्भात थट्टा करतात. मी कॉंग्रेसच्या शाहजाद्यांना विचारतो, त्यांच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केले? तुम्ही आम्हाला तीन वर्षांचा हिशेब विचारत आहात. मात्र आम्ही तुम्हाला तुमच्या तीन पिढ्यांचा हिशेब विचारत आहोत’शहा म्हणाले, ‘कॉंग्रेसने देशावर ७० वर्षे राज्य केले. तुम्ही (राहुल) बराच काळ इथले खासदार आहात. असे असताना येथे जिल्हाधिकारी कार्यालय नाही, क्षयरोग इस्पितळ नाही, आकाशवाणी केंद्र नाही. गोमती नदीमुळे जमिनीची होणारी धूप थांबलेली नाही’ राहुल गांधी यांना भाजपने केलेला विकास दिसत नाही. कारण त्यांनी इटालीयन चष्मा लावला आहे अशी टीका त्यांनी केली. शहा यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना यावेळी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘तुम्ही ६० वर्षे एका कुटुंबावर विश्‍वास ठेवला. आता भाजप व नरेंद्र मोदींवर विश्‍वास ठेवा’. यावेळी त्यांनी स्मृती इराणी यांनी अमेठीत केलेल्या कामांची प्रशंसा केली. त्याविषयी ते म्हणाले की गेल्या ३५-४० वर्षात आपण प्रथमच पाहतो की एक पराभूत उमेदवार आपल्या मतदारसंघातील लोकांना वेळ देत आहे.