भाजपच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

>> आत्तापर्यंत १.८० लाखांची नोंदणी ः तानावडे

भाजपच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत १ लाख ८० हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस तथा सदस्यता नोंदणी मोहिमेचे प्रमुख सदानंद शेट तानावडे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल सांगितले.

भाजपच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला ६ जुलैपासून सुरूवात करण्यात आली आहे. सदस्य नोंदणीसाठी ऑन लाईन सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपच्या राज्यातील सदस्य नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यासाठी येत्या ८ ऑगस्टला राष्ट्रीय पातळीवरील नेते अरुण चतुर्वेदी येणार आहेत. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ११ ऑगस्टला सदस्य नोंदणी मोहिमेचे राष्ट्रीय प्रमुख शिवराज चौहान येणार आहेत. राज्यातील सदस्य नोंदणी मोहिमेचे निर्धारित केलेले ४ लाखांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी चौहान व चतुर्वेदी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

अमित शहा, गडकरी गोव्यात
ऑगस्ट महिन्यत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी गोव्यात येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या तारखा निश्‍चित झालेल्या नाहीत. भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या आमदारांच्या मतदारसंघांत सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात य्ेेणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.