भाजपच्या ‘त्या’ आमदाराच्या वृत्तीवर पंतप्रधान मोदींचे आसूड

मध्य प्रदेशमधील भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी कर्तव्य बजावणार्‍या सरकारी अधिकार्‍याला क्रिकेट बॅटने सर्वांसमक्ष मारहाण केल्याच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारचा उद्दामपणा व बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्टपणे भाजपच्या संसदीय बैठकीवेळी बजावले. भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी ही माहिती दिली.

आमदार विजयवर्गीय तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करणार्‍यांवरही पक्षातर्फे कारवाई केली जाणार असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आकाश विजयवर्गीय यांचे वडील कैलाश विजयवर्गीय हेही सदर बैठकीस उपस्थित होते.

अशी बेशिस्त व उद्दामपणा करणारा कोणीही असो, तो कोणाचाही मुलगा असो त्याविरुद्ध कारवाई केली गेली पाहिजे असे मोदी सदर बैठकीत म्हणाले. आकाश विजयवर्गीय यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते. त्यांनी पत्रकारांसमोर म्हटले होते, ‘पहले निवेदन, फिर आवेदन, फिर दनादन’. याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की जर कोणी चूक केली तर त्याविषयी पश्‍चातापही व्हायला हवा.