ब्रेकिंग न्यूज़
भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा

भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा

>> सर्वसहमतीने निवड, अमित शहांंनी सूत्रे सोपवली

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सर्व सहमतीने निवड झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी ही घोषणा केली.
अध्यक्षपदासाठी खुद्द अमित शहा यांनी नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्याला सहमती असल्याने ही निवड केवळ औपचारिकता होती. संघटन कुशल असलेले नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मोदींचे जवळचे मानले जातात.

मोदींच्या नव्या सरकारमध्ये अमित शहा यांची गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली होती. स्वच्छ प्रतिमेच्या व वादग्रस्त विधांनापासून नेहमी दूर रहाणारे नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दमदार वाटचाल करेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

मूळचे हिमाचल प्रदेशचे आणि बिहारमध्ये जन्मलेले जे. पी. नड्डा यांचा पाटणामध्ये २ डिसेंबर १९६० ला जन्म झाला. इथेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेत सहभागी झाले. १९९३ मध्ये पहिल्यांदा ते हिमाचल प्रदेशमधून आमदार झाले.

ते तीन वेळा भाजपच्या उमेदवारीवर हिमाचल प्रदेशातून आमदार झाले. १९९३ ते ९८, १९९८ ते २००३ आणि २००७ ते २०१२ पर्यंत ते आमदार होते. तसेच १९९४ ते ९८ दरम्यान ते हिमाचल प्रदेश भाजपच्या विधिमंडळाचे नेते होते.

नड्डा यांनी २०१० मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. यावेळी नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते. गडकरींनी त्यावेळी नड्डांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली होती. यानंतर २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच कॅबिनेट मंत्री केले. तसेच अमित शहांना भाजप अध्यक्ष बनवले.

गेल्या वर्षी २०१९मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीचे सरकार सत्तेत आले. यावेळी भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा एकदा मोदींनी नड्डांवर पक्षाची जबाबदारी सोपवली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती. नड्डांनी पक्ष संघटना बळकट करत उत्तर प्रदेशात ६२ जागा जिंकून दिल्या. यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आणि नड्डांचे पक्षातील वजन वाढले.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करण्यासाठी सपा आणि बसपाने युती केली होती. पण नड्डांच्या अचूक नियोजना आणि धोरणांमुळे सपा-बसपाच्या युतीचा दारुण पराभव झाला. यामुळेच अमित शहा गृहमंत्री आणि नड्डा भाजपचे कार्यकरी अध्यक्ष झाले.

गोवा भाजपचा
नड्डा यांना पाठिंबा

गोवा भाजपच्या गाभा समितीने काल पक्षाचे नवे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली जे. पी. नड्डा यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक व संजीव देसाई आदी मंडळी उपस्थित होती.