भाजपची प्राथमिक सदस्य नोंदणी नि:शुल्क

भाजपची प्राथमिक सदस्य नोंदणी नि:शुल्क

>> ऑनलाईन सुविधा उपलब्ध

>> सरचिटणीस सदानंद तानावडे यांची माहिती

भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड नोव्हेंबरअखेरपर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य सदस्य नोंदणी प्रमुख तथा सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला येत्या ६ जुलैपासून सुरुवात केली जाणार आहे. ६ ते १४ जुलै या काळात सदस्य नोंदणीसाठी पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यात ४ लाख भाजप सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सदस्य नोंदणीसाठी भाजप कार्यालय किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची गरज नाही. भाजपने पाच वर्षापूर्वी ४ लाख १९ हजार सदस्यांची नोंदणी केली होती, असेही तानावडे यांनी सांगितले.

सदस्य नोंदणीच्या प्राथमिक कामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २७ जून ते ४ जुलै दरम्यान चाळीस मतदारसंघांमध्ये खास कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणीवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्य कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची ९० टक्के उपस्थिती होती, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजप कमकुवत असलेल्या काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर सदस्य नोंदणीवर जास्त भर देण्याचे ठरविण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील साखळी मतदारसंघात १५ हजार सदस्य नोंदणी, तर दक्षिण गोव्यात बाणावली मतदारसंघात २ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रत्येक मतदान केंद्रावर मते मिळालेली आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्र समिती, मतदारसंघ समिती, जिल्हा समित्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राज्य समितीची निवड केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उत्तर गोवा सदस्य नोंदणी प्रमुख तथा माजी मंत्री दिलीप परूळेकर आणि दक्षिण गोवा सदस्य नोंदणी प्रमुख सर्वानंद भगत यांची उपस्थिती होती.