ब्रेकिंग न्यूज़
भाजपकडून दिशाभूल; कॉंग्रेसचे आमदार एकसंध

भाजपकडून दिशाभूल; कॉंग्रेसचे आमदार एकसंध

>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा

>> पॅकेज उघड झाल्याने बिनबुडाचे आरोप

कॉंग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी भाजपने तयार केलेल्या पॅकेजचा भांडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उघडे पडले असल्याने त्यांनी बचावासाठी बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा भाजपचा आरोप तथ्यहीन व दिशाभूल करणारा आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार एकसंध आहेत, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

भाजपने आत्तापर्यंत पाच आमदारांची खरेदी करून आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविली आहे. आणखीन आमदारांच्या खरेदीसाठी खास पॅकेज तयार केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खास पॅकेजच्या जोरावर गेल्या कित्येक महिन्यांपासून विरोधी गटातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा करीत आहेत. भाजपकडून कॉंग्रेसच्या आमदारांवर विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विश्‍वजित राणे, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी भाजपच्या वाढत्या दबावामुळे अखेर भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा चोडणकर यांनी केला.

कॅसिनो भाजपचे एटीएम
भाजप आघाडी सरकारचे मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोच्या कारभारावर कुठलेही नियंत्रण नसल्याने वार्षिक ५ हजार कोटींचा महसूल बुडत आहे. मांडवीतील कॅसिनोवरील ९० टक्के व्यवहार बेकायदा आहेत, असा दावा चोडणकर यांनी केला. सरकार फेरीबोटीतून वाहतूक करणार्‍या वाहनाकडून दहा रुपयांचे तिकीट आकारण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करते. परंतु, कॅसिनोमध्ये जाणार्‍यांचे शुल्क वसुलीसाठी एका कर्मचार्‍याची नियुक्ती करू शकत नाही. कॅसिनो धोरण जाहीर करण्यास चालढकल केली जात आहे. गेमिंग कमिशनरची नियुक्ती केली जात नाही. कॅसिनोबाबत भाजपच्या मूळ भूमिकेत बदल झाला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विरोधात असताना कॅसिनोविरोधात आंदोलन करून कॅसिनो समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती. तथापि, सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या कॅसिनोबाबतच्या भूमिकेत बदल झाला. कॅसिनो हे भाजपचे एटीएम बनले आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही कॅसिनो लॉबीने आपल्या खिशात घातले आहेत, असा आरोप चोडणकर यांनी केला. पुलावरून नदीत कचरा फेकणार्‍या व्यक्तीला मुख्यमंत्री डॉ. सावंत नदीत पुन्हा कचरा टाकू नको, अशी सूचना करतात. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडवी नदी प्रदूषित करणार्‍या कॅसिनो मालकांना घाण मांडवी नदीत सोडू नका अशी सूचना करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

मासळी तपासणीकडे दुर्लक्ष
परराज्यातून गोव्यात येणार्‍या मासळीची पोळे, पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर तपासणी केली जात नाही. तसेच मडगाव येथील मार्केटमध्ये सुध्दा परराज्यातून येणार्‍या मासळीची तपासणी केली जात नाही. सरकारने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. परराज्यातून आणण्यात येणार्‍या मासळीची तपासणी सुरू करावी. तसेच मासळीच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

चर्चेअंती मगोशी युती
मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाशी युती करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावावर कॉंग्रेस पक्षाकडून योग्य विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहितीही चोडणकर यांनी दिली.