भगवा फडकला!

0
93

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अपेक्षेनुरुप नेत्रदीपक यश मिळवले आहे. मात्र, महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढ्या जागा त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. साहजिकच पुन्हा एकदा शिवसेनेला आपल्या मागण्या ताणून धरण्याची संधी मिळाली होती, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःहून भाजपाच्या सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा करून सेनेची सौदेबाजीची संधी घालवली. महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपाचा वडील बंधू आहे याच तोर्‍यात शिवसेनेचे नेते आजवर वागत आले. भाजपाच्या यशाची चढती कमान आजवर ते डोळ्यांआड करीत आले. परंतु या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पक्षाने आपली ताकद कशी सर्वदूर पसरू लागलेली आहे याचा दिमाखदार प्रत्यय आणून दिला आहे. भाजपाच्या या यशाचे श्रेय जसे पक्षाच्या कष्टाळू कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जाते, त्यांच्या काटेकोर नियोजनाला जाते, तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रातील सरकारच्या उजळलेल्या प्रतिमेलाही जाते. देशात चांगले काही घडते आहे आणि आपण त्याला साथ द्यायला हवी याच भावनेने महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने भाजपाला साथ दिलेली आहे. ही दोन्ही राज्ये कॉंग्रेसकडून हिसकावून घेण्याची संधी भाजपाला मतदारांनी दिली, त्यामागे केवळ अँटी इन्कम्बन्सी एवढाच घटक नव्हता, तर दोन्ही सरकारे भ्रष्टाचारात आकंठ बुडून गेलेली आहेत, अशी जी त्यांची कलंकित प्रतिमा जनतेपुढे उभी राहिली होती, त्याचाही हा परिपाक आहे. हरियाणामध्ये मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरा यांच्यासाठी पायघड्या अंथरत आहेत, त्यांना मोक्याच्या जमिनी स्वस्तात मिळवून देण्यासाठी कायदेकानून वाकवीत आहेत असे दिसून आले होते, तर महाराष्ट्रामध्ये आदर्श घोटाळा, नंतरचा सिंचन घोटाळा यातून कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये केवळ लुटालूट चालली आहे असा राग मतदारांच्या मनात निर्माण झाला होता. त्याचा फटका राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसलाच अधिक बसल्याचे दिसून येते. पराभवाचे खापरही राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्याच माथी मारले. हर्षवर्धन पाटील, नारायण राणे अशा कॉंग्रेसच्या बर्‍याच दिग्गजांना घरी बसावे लागले आहे. महाराष्ट्रात महायुती फुटल्याने मतांचे विभाजन जरी झाले, तरी त्यावरही मात करीत भाजपने यश मिळवले आहे हे उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे अनेक गड भाजपाने यावेळी हिसकावून घेतले. पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजवरच्या वरचष्म्याला हादरे दिले, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तर भाजपाचे काम होतेच. पुण्यामध्ये आठपैकी आठही जागा जिंकण्याचा चमत्कार भाजपाने केला. बीडसारखा राष्ट्रवादीचा गड हिसकावून घेतला. शिवसेनेने कोकण हा आपला बळकट किल्ला राणेशाहीला दणके देत पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे. नारायण राणे यांचा श्रीधर नाईकांचे पुतणे वैभव नाईक यांनी केलेला कुडाळमधील पराभव, अलीकडेच शिवसेनेत गेलेले त्यांचे विरोधक दीपक केसरकर यांचा सावंतवाडीतील विजय ही कोकणातील दादागिरी संपुष्टात येऊ लागल्याची सुचिन्हे आहेत. राणेंचे पुत्र कणकवलीतून निवडून आले असले, तरी अन्यत्र कोकणात सर्वत्र भगवाच फडकला आहे. वाचीवीर राज ठाकरे यांच्या मनसेचा पुन्हा एकवार या निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यांचे बिनीचे शिलेदार पराभूत झाले. एमआयएम या अल्पसंख्यक केंद्रित पक्षाला विधानसभेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाली आणि काही मतदारसंघांत त्याने आपले अस्तित्व दाखवून दिले हे महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेले धार्मिक ध्रुवीकरणाचे वळण धोकादायक आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये ‘नोटा’ विकल्पाला दुसर्‍या स्थानावरची मते मिळाली ही बाबही चिंताजनक म्हणावी लागेल. भाजपाचा दौडता वारू हा शिवसेनेसाठी भविष्यातील इशारा आहे. त्यामुळेच सेनेने भाजपाशी असलेली युती तुटेपर्यंत आपले हट्ट ताणले होते. पण भाजपा आणि शिवसेना यांच्यात या निवडणुकीत कितीही कटुता आली असली, तरी दोघांची विचारधारा एकमेकांशी जुळणारी आहे, त्यामुळे आता त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे असेच एकूण जनमानस आहे, त्याचा आदर राज्याचे हित लक्षात घेऊन शिवसेनेने करणे अपेक्षित आहे.