भक्ती तृतीय, अनुराग ४२वा

जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) जाहीर केलेल्या ऑक्टोबर क्रमवारीत गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी महिलांच्या गटात २४१८ गुणांसह देशात तिसर्‍या स्थानी आहे. हंपी व हरिका अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानी आहेत. जागतिक स्तरावर भक्तीचा ४६वा क्रमांक लागतो.

गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याने अत्यंत चुरशीच्या खुल्या गटात भारतीय खेळाडूंमध्ये ४२वे स्थान मिळवत प्रभाव पाडला आहे. त्याच्या खात्यात २४९० गुण जमा आहेत. २३८२ गुण घेत रॅपिडमध्ये तो २८व्या स्थानी आहे. ब्लिट्‌झमध्ये अनुराग आघाडीच्या १०० मध्ये नाही. ज्युनियर (२० वर्षाखालील) स्टँडर्ड क्रमवारीत गोव्याचा ल्युक मेंडोसा (२३८८) भारतीयांमध्ये तिसाव्या स्थानी आहे. अमेय अवदी (४४वे स्थान, २३३६), रित्विज परब (७०वे स्थान, २२८०) यांचादेखील आघाडीच्या शंभर खेळाडूंत समावेश आहे. जागतिक स्तरावर खुल्या गटातील स्टँडर्ड रेटिंगमध्ये विश्‍वनाथन आनंद नवव्या स्थानी आहे. त्याचे २७६५ गुण आहेत. पेंटाला हरिकृष्णा (१८वे स्थान, २७४८), विदित गुजराती (३१वे स्थान, २७१८), कृष्णन शशिकिरण (६३वे स्थान, २६७५), सूर्यशेखर गांगुली (८९वे स्थान, २६५८) हे अव्वल शंभरातील अन्य भारतीय आहेत.

महिलांमध्ये भारताची कोनेरू हंपी तिसर्‍या क्रमांकावर आहे. दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर ३२ वर्षीय हंपीने स्कोलकोवो येथे झालेली फिडे वूमन ग्रांप्री स्पर्धा जिंकून पुनरागमन केले होते. या जोरावर तिने १७ इलो गुण कमावत आपली गुणसंख्या २५७७ केली. चीनची हो युफान (२६५९) पहिल्या व वू वेनजून (२५८६) दुसर्‍या स्थानावर आहे.