ब्रेकिंग न्यूज़
भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूर

भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूर

– सौ. पौर्णिमा केरकर
लोकसंस्कृतीतील लोकजीवनाचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने जेव्हा लोकसाहित्य, लोकगीते, परंपरा, सण-उत्सव यांच्याशी सहवास जुळला, तेव्हा सातत्याने स्त्रीजीवनाचा वैविध्यपूर्ण जीवनपट उलगडत गेला. आपले श्रम हलके करण्यासाठी तिने वेदनेचे गाणे केले. ही वेदना तिने ज्याच्यावरील असीम श्रद्धेने सहजपणे पेलली, तो तिचा सखा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग! त्याचेच दुसरे रूप म्हणजे सावळा श्रीकृष्ण. या लोकगीतांशी जेव्हा माझे नाते जुळले, त्या वेळेपासून सावळ्या विठूरायाची विविध रूपं गाण्यातून अनुभवता येऊ लागली. पंढरपूरचा तो सारा परिसरच दृष्टीसमोर फेर धरू लागला आणि मनात विचार पक्का झाला, पंढरपूरला जायचेच!एरव्ही आपल्या प्रवासात शांत, रमणीय तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास आपण प्राधान्य देत असलो तरी धार्मिक पर्यटनालासुद्धा खास जागा आणि वेळ राखून ठेवलेला असतोच. हे सारे अंधश्रद्धाळूपणानेच होते असे नाही. बहुसंख्य लोक तर आयुष्याच्या उत्तरार्धात देवादिकांचे दर्शन घेण्यास बाहेर पडतात. आपल्या पूर्वजांनीसुद्धा बुद्धी-कल्पकतेची जोड देऊन देवदेवतांची स्थापना अशा काही शांत, मनोरम जागी केलेली दिसते की जेथे निसर्गरूपी परमेश्‍वराच्या आगळ्यावेगळ्या चिरंतन रूपाचा साक्षात्कार घडावा! मानवनिर्मित अचंबित करणार्‍या कलाकृतींचे दर्शन जसे यातून घडते, त्याचबरोबरीने लोकजीवन, संस्कृती, निसर्गाविष्कारांनी समृद्ध असलेली सुजलाम् सुफलाम् अशी आपली मातृभूमीही अनुभवता येते. पंढरपूर या धार्मिक पर्यटनक्षेत्राला भेट देण्यामागेसुद्धा हाच विचार होता.
आपल्या देशातील कित्येक धार्मिक स्थळे, तीर्थस्थाने फक्त त्या-त्या धार्मिक प्रवृत्तीच्याच नव्हे तर कुठल्याही जातिधर्माच्या निसर्गप्रेमी, पर्यटनप्रेमी, पदभ्रमणकर्ते, इतिहास- संस्कृतीप्रेमी, संशोधक-अभ्यासकांना मुद्दाम भेट द्यावीशी वाटावीत एवढी रमणीय व मुळचीच देखणी आहेत. परंतु त्याचे देखणेपण, अभिजातता पर्यटक, भाविक, रसिकप्रेमी म्हणून भेट देताना आपण टिकवून ठेवतो का, हा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे.
‘पंढरपूर’ हे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. भीमेच्या काठावर वसलेल्या या नगरीने लोकसंस्कृती, लोकजीवन समृद्ध केलेले आहे. अनोख्या मंदिरशिल्पांनी ही भूमी सजलेली आहे. संतांच्या पदस्पर्शाने इथला कणन् कण पवित्र झालेला आहे. वारीच्या माध्यमातून मानवतेचा धर्म जिथे जतन केला गेलेला आहे, सद्विचारांची देवाणघेवाण, भक्तीची अद्वैतता, एकात्मतेची दिंडी हा ज्या भूमीचा आत्मा आहे, या दृष्टीतून आज जेव्हा आपण या सार्‍या परिसराला न्याहाळतो तेव्हा परिसरातील ओंगळवाणी गलिच्छता, कर्मकांडं, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेली सुंदर मंदिरशिल्पं पाहून मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसलेले पंढरपूर हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र. पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर, फागनीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे, पांडरंगपल्ली अशा विविध नावांनी नानाविध जाती-जमातीत तेवढेच लोकप्रिय असलेले लोकदैवत म्हणजे हा सावळा विठूराया! संतजनांसाठी तर हे क्षेत्र म्हणजे भूवैकुंठच आहे. ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी’ असे म्हणणार्‍या तमाम संतमंडळीचे ‘पंढरपूर’ हे मायेने ओथंबलेले माहेरघरच होते. भिवरा नदी म्हणजे भीमा नदी. तिचा प्रवाह अर्धचंद्राकृती वाहणारा म्हणून ती समस्तांची ‘चंद्रभागा’ झाली. भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ, दक्षिणकाशी, भूवैकुंठ म्हणूनही पंढरपूरचा उल्लेख केलेला आढळतो. कृषिसंस्कृती जेव्हा आपल्या देशात स्थिरावली त्याच कालावधीत भक्तिसंप्रदायाचा उदय झाला. एक काळ असा होता की वारकरी संप्रदायाच्या विठ्ठलभक्तीची चळवळ ही फक्त महाराष्ट्रापुरतीच होती, परंतु आज ‘कानडा हो विठ्ठलू करनाटकू’ असे म्हणून कर्नाटक आणि गोवा येथील लोकमनांनी विठ्ठलाला स्वतःच्या जीवनजाणिवांशी समरस करून ठेवले आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या विठ्ठलभक्तीला लोकसंग्रहाची जोड देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. चोखामेळ्यापासून जनाबाईपर्यंत अठरापगड जातींतील अनेक संत भक्तिमार्गाने सर्वार्थाने उद्धारून गेले. संसारात राहूनही परमेश्‍वराची प्राप्ती करता येते हा आत्मविश्‍वास सर्वसामान्य भक्तजनांना वारकरी संप्रदायानेच दिला. हा संप्रदाय चंद्रभागेच्या तीरी रूजला, अंकुरला, बहरला. गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे प्रवाहित असलेल्या या अध्यात्मचिंतनाने सामान्य जिवाला असामान्यत्व बहाल केले. याच भिवरेच्या काठाने सावळ्या परब्रह्माला साक्षी मानून साहित्य-संस्कृतीची अभिवृद्धी झाली. अक्षय, अभंग साहित्यनिर्मिती ही या पंढरपूरनगरीने समस्तांना दिलेली एक अमूल्य देणगी आहे. संतमंडळीनी विठ्ठलाला वेगवेगळ्या रूपांत अनुभवले, स्वीकारले. त्यातील विठ्ठलाचे कृष्णरूप तर त्यांना अधिकच भावले. याच रूपाला त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात स्वीकारले. ज्ञानेश्‍वरी, भागवत, अभंग, गवळणीमधून याची प्रचिती येते. विठ्ठलाच्या परिवारात म्हणूनच रुक्मिणीला सन्मानाचे स्थान प्राप्त झाले.
खरे तर पंढरपूरला गेल्यानंतर डोळे भरून पाहण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. पंढरपूरजवळ येताच चंद्रकोरीसारखी वाहणारी भीमा चंद्रभागा होते. पुंडलिकासारख्या भक्तामुळे विठूराया पंढरपुरात स्थिरावला. त्याचे मंदिरसुद्धा याच प्रवाहात आहे. लाखो भाविकांना तृप्त करणारे घाट हे इथले वेगळेपण होते. एखादी नगरी भावभक्ती, अध्यात्म, तत्त्वचिंतनात मग्न व्हावी, किंबहुना नगरीच्या नावालाच अध्यात्माचे वलय प्राप्त व्हावे हे सहजासहजी घडत नाही. परंतु पंढरपूर मात्र याला अपवाद आहे. कर्मकांडे, अंधश्रद्धा यांची झापडे डोळ्यांपुढे ठेवून जर आपण या नगरीत प्रवेश केला तर तेथील अभिजात साहित्य, संतांच्या मांदियाळीतील सहवास, अभंग ओवीतील गोडवा, प्रासादिकता, त्यात असलेले समाजभान, व्यवहारज्ञान, सर्वधर्मसमभावाची शिकवण, तेथील मंदिरशैली, विविध नद्यांचे संगम यातले काहीही आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी तशीच नजर सोबतीला घेऊन आपल्याला प्रवास करता आला पाहिजे.
शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्‍वरांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. अध्यात्मज्ञान त्यांनी सर्वांसाठी खुले केले. नामदेवांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. एकनाथांनी भक्तिसंप्रदायाची ही चळवळ जनमानसात खोलवर रुजवली. त्यातूनच आचारधर्म निर्माण झाला. दिंडीवारी, एकादशी, तुळशीमाळ, अबीर-बुक्का, ज्ञानेश्‍वरी, भागवताचे वाचन, भजन, कीर्तन, चंद्रभागेचे स्नान, विठ्ठलदर्शन, संतसहवास ही सारी गजबज पूर्वीप्रमाणे आजही आहे; पण भाविकमनाच्या हृदयातील हे सर्व अनुभवण्याचा भाव बदललेला दृष्टीस पडतो. पंढरीमहात्म्यात पंढरीक्षेत्राचे वर्णन करताना तिथल्या पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण द्वारांचे वर्णन केलेले आहे. भीमा व शिशुमाला नद्यांच्या संगमावर पूर्वद्वार आहे, इथेच संध्यावळी देवीचे स्थान आहे, तर पश्‍चिमद्वारावर भुवनेश्‍वरी मंदिर स्थित आहे. भीमा व भरणी नदीच्या संगमस्थळी उत्तरद्वार येते. भीमा व पुष्पावती नद्यांचा संगम जेथे आहे तेथेच सिद्धेश्‍वर शिवलिंग असून मानसूर हे दक्षिणद्वार आहे. मंदिराच्या पूर्वद्वाराला महाद्वार तसेच नामदेवदरवाजा असे संबोधले जाते. नामदेवांनी याच जागेवर समाधी घेतल्याने या जागेला हे नाव पडले आहे. याच मंदिराच्या परिसरात इतर लहानमोठी मंदिरे स्थिरावलेली आहेत. त्यात तेहतीस कोटी देवांचे मंदिर, मुक्तिमंडप, मुखमंडप, आत असलेली मोठ्या फडताळातील गणेशमूर्ती, मंडपात असलेल्या दोन दीपमाळा मनाला आकर्षून घेतात. गरुडाचे व हनुमंताचे मंदिर, समर्थांनी स्थापन केलेले मारुतीराया, सोळाखांबी मंडप, चौखांबी मंडप अशी एकंदरीतच या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसते.
पंढरपूरचा सारा परिसरच मंदिरमय आहे. त्यातही लक्षवेधक असलेली मंदिरे म्हणजे रुक्मिणीचे मंदिर व पुंडलिकाचे मंदिर. ज्या पुंडलिकापायी श्रीविठ्ठल पंढरपुरात स्थिरावले त्या भक्ताला चंद्रभागेतीरी सन्मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. विष्णूपद, गोपालपूर येथील श्रीकृष्णमूर्ती, पद्युमतीर्थ, दिंडीखन, व्यासनारायण, यात्राविधी, कुंडलतीर्थ अशी छोटीमोठी भक्तिस्थळे इथे सर्वत्र विखुरलेली आहेत. भिवरेच्या तीरी भक्तजनांसाठी अकरा लहानमोठ्या घाटांची बांधणी केलेली आहे. पूर्वीच्या काळात या सार्‍यांची गरज होती. घाटांचा वापर सुयोग्य पद्धतीने भाविक करायचे. पाण्याचे पावित्र्य म्हणूनच जतन केले जायचे. परंतु आज मात्र सर्वत्र अस्वच्छताच मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे पावित्र्याचे, तत्त्वचिंतनाचे, साहित्य-संस्कृतीचे उगमस्थान असलेल्या या स्थळावर भाविकांच्या, पर्यटकांच्या मनमानी वागण्यामुळे ओंगळवाणे, गलिच्छ रूप प्राप्त झालेले आहे. ज्या चंद्रभागेच्या पाण्यात पापक्षालन व्हायचे, त्या चंद्रभागेचे पावित्र्य लोकमानसानेच भंग केलेले दिसते. मलमूत्र विसर्जन, वाहने धुणे, गुरावासरांची स्वच्छता, कपडे धुणे, निर्माल्य फेकणे, अस्थिविसर्जन यांसारखे गुन्हे करून या परिसराचा विटाळ आरंभलेला आहे. पर्यटक, भाविकांची असंस्कारसंपन्न मनोवृत्ती, शासनाची कायद्याच्या बाबतीतली ढिलाई या गोष्टीसुद्धा याला कारणीभूत आहेत. ज्या संतमहंतांनी शेकडो वर्षांपूर्वीपासून अभंग, भारुडे, ओव्यांच्या माध्यमातून अज्ञजनांना सामाजसाक्षरतेचे धडे दिले, स्वच्छतेचे महत्त्व विशद केले, पर्यावरणविषयक जागृती निर्माण केली, त्या भूमीतले हे नैतिक अधःपतन मनाला क्लेशदायक वाटते. संत तुकारामांनीच म्हटलेले आहे- ‘ नाही निर्मळ मन, काय करील साबण?’ म्हणूनच समर्थ म्हणतात तसे, ‘समजले आणि वर्तले| तेचि भाग्यपुरुष जाले|’ असे असले तरी इथे येणार्‍या भाविकांच्या, पर्यटकांच्या मनात या सार्‍याची उपरती होणे फार गरजेचे आहे.
पंढरपूर हे जरी धार्मिक पर्यटनक्षेत्र असले तरी त्याला प्रादेशिक संस्कृतीच्या समन्वयाचे क्षेत्र मानले गेलेले आहे. महाराष्ट्र-कोकण-गोवा प्रांताचा वारकरी जसा इथे येतो, तसेच कर्नाटकातील हरिदासही इथे जमतात. माध्व संप्रदायाचे लोकही विठ्ठलाच्या दर्शनाला आतुरलेले असतात. मराठी-कन्नड संस्कृतीचे सामंजस्य हे पंढरपूरचे एक वेगळेपण आहे. शैव व वैष्णवांचा समन्वय इथे आहे. मुस्लिम धर्मातही संत, भक्त निर्माण झाले ते या ठिकाणच्या एकेकाळच्या नितांत रमणीय परिसरामुळेच. साक्षात विठ्ठलालासुद्धा हा परिसर आवडला. अर्धचंद्रकार वळसा घेऊन वाहणार्‍या चंद्रभागेचे इथे वाळवंट सोबत करते. अशी रचना क्वचितच एखाद्या स्थळाची असते. हा परिसर तसा रुक्ष, कोरडाच. रणरणत्या उन्हात हिरवेपण जतन करून तग धरत असलेल्या बोरी-बाभळींचा प्रदेश. तसा काटेरी. तरीही विठ्ठल-पुंडलिकाच्या नात्याने या स्थळाचे मोठेपण वाढले. संतांच्या मांदियाळीने तर या स्थळाला मंत्राक्षरत्व प्राप्त करून दिले.
या इथून काही वेगळ्या ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी देता येतात. जवळच असलेले जेजुरी, तुळजापूर वगैरे तीर्थक्षेत्रे किंवा धार्मिक स्थळे ही पर्यटनस्थळे नाहीतच असा विचार मनात निर्माण व्हावा एवढा बदल इथे गेल्यावर दिसतो. मंदिरात जायचे ते मंदिराची शिल्पकला पाहण्यासाठी. तेथील अद्भुत कलाकुसर, शेकडो वर्षांपूर्वीचा त्यांचा इतिहास हे सारे जाणून घेण्यासाठीची परिस्थितीच इथे राहिलेली नाही, एवढे व्यावहारीकरण आणि सवंगपणा प्रत्येक कर्मकांडाला आलेले दिसते. इथे जणू काही श्रद्धेचाच व्यापार होत आहे. युगानुयुगे कटेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या विठ्ठलाची विटेवरची ही मूर्ती खरे तर श्रद्धाळू मनाची प्रेरणा आहे. जिच्याकडे नुसते नीतळ नजरेने पाहिल्यावरही आत्मसाक्षात्कार घडावा एवढी संगती तिच्यात निश्‍चितच आहे. परंतु डोळे भरूनच कशाला, अर्ध्या डोळ्यांनीही त्याला अनुभवण्याची उसंत देण्यात येत नाही, हेच मोठे दुर्दैव! लांबच लांब न संपणार्‍या रांगा, शेकडो मैलांचा प्रवास करून येणारे भाविक जेव्हा इथे रांगेत उभे राहतात तेव्हा त्यांच्यातील सहनशिलता अगोदरच संपलेली असते. तरीही आपल्या लाडक्या दैवतासाठी सारे काही सहन केले जाते, हेच तर विठूरायाचे वेगळेपण आहे. त्याच्या दर्शनाने होणारे श्रमपरिहारण हाच एक मोठा आनंदसोहळा असतो. पंढरपूर हे धार्मिक पर्यटनस्थळ फक्त पैसेवाल्यांची मक्तेदारी नसून ते सर्वसामान्यांचे, सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. भक्ती-मुक्तीचे हे क्षेत्र आहेच, त्याबरोबरीने लौकिक पातळीवरची सुख-दुःखं इथे हलकी होतात म्हणून विठ्ठल माऊली भक्तजनांच्या हृदयात विसावली आहे. लोकमाणसे म्हणतात-
गावामंदी गाव| गाव पंढरी नाही ऐस, सावळा पांडुरंग| तिथला पाटील हरीदास॥
सकाळच्या पारी| चंद्रभागेत माझा पायी, पांडुरंगाचे माझ्या| असं तीरथं कुठं नाही॥
पंढरपूरला भेट देणार्‍या भाविकांनी, पर्यटकांनी या स्थळाचे पावित्र्य आणि स्वच्छता जतन केली तरच हे प्रादेशिक, सांस्कृतिक समन्वयाचे वैभव येणार्‍या पिढीला कळेल.

Leave a Reply