भक्तिविजय

– सौ. पौर्णिमा केरकर

आता या वैज्ञानिक युगातही भक्तीची भावना माणसांना ईश्‍वराशी जोडते आहे. प्रापंचिक चढ-उतार आहेतच. सामाजिक व्यवस्थेत मनाविरुद्ध खूप गोष्टी कराव्या लागतात. तरीसुद्धा माणूस माणसाला मुक्तपणे भेटावा एवढे सामर्थ्य ‘भक्तिविजय’सारख्या ग्रंथाच्या पारायणात निश्‍चितच आहे.

‘हरिविजय’, ‘भक्तिविजय’, ‘पांडवप्रताप’ इ. अनेक ग्रंथांची नावे नकळत्या वयापासून ओळखीची झाली होती. घरात कट्टर धार्मिक वातावरण नसले तरी श्रावणात या ग्रंथांची भक्तिभावाने केली जाणारी पारायणे ऐकण्यासाठी तासन्‌तास घालवले होते. पेंगुळलेल्या डोळ्यांनी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कळत-नकळत का असेना, माझ्या जीवनात संस्काराचा एक प्रवाह मोकळा होत गेला. फक्त माझ्यासाठीच कशाला, माझ्या वयाच्या पिढीनेही तो अनुभवला. त्याचे संचित आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उपयोगी पडताना दिसत आहे.
आमच्या घराच्या पडवीला टेकूनच उजव्या बाजूला दत्तात्रयाचे छोटेसे मंदिर होते. आबाच्या पुढाकाराने तयार झालेले. पहिल्यांदा नुसतीच दत्ताच्या प्रतिमेची पूजा व्हायची. त्यानंतर त्याच्यावर घुमटी आणि पुढे चार खांब घालून छत तयार केले गेले. या सर्व प्रवासात आजूबाजूच्या परिसराला मात्र एक शिस्त आली. दर गुरुवारी भजन, पूजा सतत कानावर पडायची. श्रावणात मात्र न चुकता प्रत्येक गुरुवारी ‘ज्ञानेश्‍वरी’चे वाचन व्हायचे. त्या वयात ती कळली नाही; पण तिन्हीसांजा मात्र घरात मांगल्याचे वातावरण निर्माण करणार्‍या ठरल्या. ही वेळ शुभंकरोतीची असायची. हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर दिवावात करणे अपरिहार्यच असे. तुळशीवृंदावनाकडे पणती ठेवण्यापूर्वी ती चारही बाजूच्या सीमेवरील देवचारांनाही तिथल्या तिथेच फिरून दाखवावी लागे. आमच्या घराच्या मागच्या बाजूला देवचाराची वाट आहे म्हणायचे. म्हणून रात्री बारानंतर कोणीही एकटे बाहेर पडायचे नाही हे बंधन होते. त्या देवचारासाठीसुद्धा एक निरंजन प्रज्वलित केले जायचे. त्याच्यासाठी वात तेवती ठेवली की मग कसलीच भीती वाटत नसे.
हळूहळू बालवय वाढत गेलं. इतर व्याप वाढले. पुढे कॉलेजजीवनातही तिन्हीसांजा श्रावणातील आध्यात्मिक ग्रंथांची पारायणे मी अनुभवली. पण मग मात्र बदलत गेलेल्या सामाजिक-कौटुंबिक स्तरामुळे जी पारायणे श्रावण आपल्या दारात पोहोचल्याची खूण- भक्तीधून- घेऊन यायची तीच कोठे ऐकू येईनाशी झाली. मानापमानाच्या मुद्यावरून आपापसातील भांडणे वाढली. देवानासुद्धा गर्भकुडीत बंदिस्त केले गेले. खूप वेगवेगळ्या जागा होत्या, जिथे ही पारायणे चालू असायची. परंतु तिथपर्यंत काही जाणे झाले नाही. दोन-अडीच दशकांचा काळ तर असाच गेला. अन् मध्यंतरी हरवलेले ते डिचोलीतील ‘सेकन्ड इनिंगस्’च्या माध्यमातून पुन्हा एकदा गवसल्याचा निखळ आनंद प्राप्त झाला.
काही महिन्यांपूर्वी ‘भक्तिविजय’ या महिपतीकृत ग्रंथाचे पारायण श्रावण अगदी उंबरठ्यावर पोहोचला असता समाप्तीच्या वाटेवर आले होते. समाप्तीचा आनंदसोहळा माझ्या साक्षीने होणार होता. पुन्हा नव्याने हा क्षण मी डोळसपणाने अनुभवत होते. श्रावण मासाची वाट न पाहता जेव्हा देऊ पळ व त्यांच्या इतर सहकार्‍यांना आतून वाटले की वयाचा तिसरा टप्पा आपण आता गाठलेला आहे, प्रापंचिक जबाबदार्‍या थोड्या सुना-मुलांकडे सोपवूया. स्वतःच्या निरामय आनंदासाठी आध्यात्माची सोबत करून प्रवास करूया. कारण काही का असेना, आयुष्याच्या तिसर्‍या टप्प्यावर काही समविचारी, उत्साही व्यक्तिमत्त्वे एकत्रित येतात. रमाकांत शेट्येच्या संवेदनशील दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘सेकन्ड इनिंगस्’च्या बॅनरखाली विचारांची देवाण-घेवाण करीत मनमोकळा आनंद साधतात आणि सुरकुतलेल्या शरीराला, कुरकुरणार्‍या सांध्यानाही चिरतरुण करून टाकतात. म. कृ. पाटील सरांचे ऐंशीव्या वर्षाकडे प्रवास करणारे सजग तारुण्य मी गेली दोन दशके अनुभवीत आले आहे. साधी-सोपी चढण चढताना आमच्यासारख्यांना चाळिसी ओलांडल्यानंतर केवढी धाप लागते. इथे तर एक प्रगल्भ जाणतेपणच तरुण बनून चैतन्यपूर्ण वाटचाल करताना दिसते.
आयुष्यात खूप गोष्टी असतात शिकायच्या, आत्मसात करायच्या. पण त्यासाठी आयुष्यच कमी पडते. कोठे आणि कसे म्हणून आपण सगळीकडे पोहोचणार? मग त्यासाठी स्वतःच्या परीने मार्ग शोधले जातात. जीवन जाणून घेण्याचा तो शोध असतो. तो शोधही पूर्णत्वास येतो अशातला भाग नाही. बालवय कोडकौतुकात जाते, तारुण्याला एक धुंदी असते, प्रौढत्व असंख्य प्रापंचिक जबाबदार्‍या, ताणतणाव यांनी घेरलेले असते. ‘प्रौढत्वो नीज शैशवास’ जोपासणारी माणसे अवतीभोवती दिसतात. अशीच व्यक्तिमने मग ‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड’ अशा तत्त्वाने मार्गाक्रमण करीत असतात. ‘सेकन्ड इनिंगस्’मधील ‘भक्तिविजय’च्या पारायणांच्या वेळी मला असाच अनुभव आला.
अठ्‌ठ्याहत्तर वर्षांचे दीनानाथ तारी फक्त इयत्ता तिसरीपर्यंत शिकलेले आणि पंचेचाळीस वर्षे समई करण्याच्या कामात गुंतलेले. राजीव गोसावी वजनमाप खात्यातून निवृत्त होऊन वयाची सत्तरी पार केलेले. तबलापटू पांडुरंग मोरजकर, प्रभाकर डिचोलकर, रसाळ वाणीने निवेदन करणारे निवृत्त शिक्षक देऊ पळ इत्यादी सर्व मंडळी वयाची सत्तरी पार करून अतीव उत्साहाने जीवनातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावताना दिसत होती. संसारातील ताणतणाव, समस्या, संघर्ष या नित्याच्याच बाबी. त्या सार्‍या क्षणांना आपण कसे भिडायचे? की या सगळ्या संकटांना सोबतीला घेऊन मार्गाक्रमण करायचे? असे करताना स्वतःला सकारात्मक उपक्रमात गुंतवून घेतले की जबाबदार्‍यांचे ओझे वाटत नाही की आळस अंगात भिनत नाही. उलट चांगल्या उपक्रमांची, विचारांची, कृतीची सोबत ही मनीमानसी दुप्पट उत्साह निर्माण करणारी ठरते. लोकपरंपरेतील समाजजीवनाचा विचार करता या माणसांचे जगणेच एवढे कष्टप्रद होते. अहोरात्र शारीरिक श्रम, त्याशिवाय पर्यायच नाही. तरीही अतिव श्रद्धेने, मनःपूर्वक श्रावणमासात ‘हरिविजय’, ‘भक्तिविजय’सारख्या ग्रंथांची पारायणे रात्रीना सजिवंत करून जायची. सभोवतालच्या श्रोत्यांत आबालवृद्ध, बायका-मुले असायची. पेंगुळल्या डोळ्यांनी मुले सारे काही अनुभवायची. सकाळी उठून डोंगरदर्‍या पार करायलाच हव्यात हे माहीत असूनही पारायणे व्हायची. त्यातून उत्साह द्विगुणित व्हायचा. कष्टाची कामे करण्यासाठी बळ प्राप्त व्हायचं. इतकं काय असावं या ग्रंथात की एवढी भावतल्लिनता त्यात सामावून जावी? ‘भक्तिविजय’कर्त्या महिपतीना संत तुकारामांचा दृष्टांत झाला. त्यांच्याच आज्ञेवरून प्रस्तुत ग्रंथातून संत-चरित्रे लिहिली. त्यातील संत तुकारामांचे चरित्र तर प्रत्यक्षदर्शी माहितीवर अवलंबून आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक संशोधनपर लिखाणाचा तर तो एक वस्तुपाठच म्हणावा लागेल. महिपतीना तर सामाजिक भानही होते. त्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा त्याने स्वतःच्याच घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या जवळ होते नव्हते तेवढे दान करून टाकले. भावनाशील हृदय, संयम, सहनशीलता याच ग्रंथांनी समाजमनाला दिली. त्यांना माहीत होतेच की-
ज्ञानी निवती परमार्थ बोधे | पंडित निवती पदबंधे |
लोक निवती कथाविनोदे | ग्रंथ संबंधे जग निवे ॥
भक्त आणि ज्ञानी असे की ज्यांना आध्यात्माची आवड आहे, पंडित ज्यांना शब्दविलास संतुष्ट करतो आणि सर्वसामान्य लोकांना तर कथा-विनोदात रस आहे. मग त्या सगळ्यांचीच मानसिकता लक्षात घेऊन त्यानाच आवडेल असे साहित्य निर्माण केल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांनीही ओळखले होते. अशी पारायणे ऐकताना मढेसुद्धा जिवंत झाल्याचे संदर्भ येतात. संवेदनाहीन होत चाललेला समाज आज सभोवताली दिसत आहे. तो जिवंत आहे खरा, परंतु संवेदनाच सगळ्या गोठून गेलेल्या आहेत. पराकोटीचा एकमेकांबद्दल असलेला दुस्वास, नात्यांमध्ये वाढत चाललेली दरी, पैशांसाठी पाडले जाणारे खून… कोठे चाललो आहोत आपण याची जाणीवच होत नाही. जिवंत असूनही मंद रूपातच आपण माणसे वावरत आहोत. असे असताना हे आध्यात्मिक ग्रंथ मानवी भावना-संवेदनांना सुयोग्य आकार देतात, धकाधकीच्या प्रवाहात गात्रांना शांतता प्रदान करतात. आपल्या विचारवंतांनी सांगितले आहे, तुम्ही लाखो तत्त्वांचा उद्घोष करा, तुम्ही कोट्यवधी संप्रदाय स्थापन करा, पण भावनाशील हृदय नसेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सर्व लोकांबद्दलच मनात सहानुभूती बाळगायला हवी. आपल्याच शरीराचे ते अवयव आहेत ही भावना मनी असू द्या. गरीब वा श्रीमंत, संत वा पतित हे सर्व लोक आणि आपणही त्या एकाच पूर्णब्रह्माचे अंश आहोत याची अनुभूती करून घ्यायला हवी. जात-पात, राग-लोभ, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असे भेदाभेद विरघळून टाकणारे हे क्षण या पारायणाच्या माध्यमातून लोकमानसाला प्राप्त झाले. आता या वैज्ञानिक युगातही मोठ्या आत्मीयतेने भक्तीची भावना माणसांना ईश्‍वराशी जोडते आहे, ते क्षण जिवंत करीत आहेत. प्रापंचिक चढ-उतार आहेतच. सामाजिक व्यवस्थेत मनाविरुद्ध खूप गोष्टी कराव्या लागतात. तरीसुद्धा माणूस माणसाला मुक्तपणे भेटावा एवढे सामर्थ्य ‘भक्तिविजय’सारख्या ग्रंथाच्या पारायणात निश्‍चितच आहे.