बोलणं रुपेरी… पण मौन सोनेरी!

बोलणं रुपेरी… पण मौन सोनेरी!

– श्रेयस गावडे
आज पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात जाऊया… आठवा बरं ते दृश्य… वर्गात शिक्षिका येण्यापूर्वीचा गोंधळ! अन् त्यावेळी जवळजवळ सर्व शिक्षकांचं ठरलेलं सनातन वाक्य म्हणजे- ‘वर्ग आहे का मासळी बाजार?’ अन् त्याहूनही भयंकर म्हणजे रागावलेली शिक्षिका हातातला डस्टर समोरच्या टेबलवर जोरात वाजवून अन् त्याहूनही जोराच्या आवाजात म्हणते कशी- सायलऽ ऽ ऽ ऽन्स! कित्ती विसंगती आहे ना, शिक्षिकेने केलेल्या कृतीत (जोरात ओरडणे) अन् मुलांकडून अपेक्षा केलेल्या कृतीत (शांतता राखणे). अन् आता हे दृश्य पहा.वर्गात सगळा गोंधळ चाललाय. मुलं वर्गात बोलतायत, हसतायत, पळतायत… इतक्यात शिक्षिका वर्गात येते. शांतपणे आपली दृष्टी वर्गातील सर्व मुलांवरून फिरवते… अन् पाहता पाहता अर्ध्या मिनिटात सारा वर्ग चिडिचूप सर्वजण वाट पाहतायत आपली शिक्षिका केव्हा बोलेल. शिक्षिका बोलायला सुरुवात करते अन् वर्ग आनंदात सुरू होतो. वर्ग शांत करण्यासाठी फार कष्ट लागतच नाहीत, पण आपण मात्र उगीचच कष्ट करून घेतो. शांततेवर उत्तर अधिक आवाज, अधिक गोंधळ-गोंगाट नसून ‘शांतता’ हेच उत्तर आहे.
म्हणून एक म्हण आहे… ‘बोलणं रुपेरी… पण मौन सोनेरी!’ (स्पीच इज सिल्व्हर्न… बट सायलन्स इज गोल्डन).
याचा अर्थ असा नाही की, बोलूच नये. तर त्यापेक्षा किती-कसं-अन् केव्हा दुसर्‍याचं ऐकावं अन् केव्हा आपलं तोंड उघडावं हे कळलं तरी ते बोलण्यावर विजय मिळाल्यासारखंच असतं. असं म्हणतात ना, की ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. अन् असंही म्हणायला हरकत नाही की ज्याने स्वतःची वाणी जिंकली त्याने सर्वांची मनं जिंकली!
एक प्रसंग पाहू या. आपल्यासोबत असं नेहमी होतं… वडील संध्याकाळी ऑफिसमधून खूप थकून घरी आलेत. जरा विश्राम करुया असा विचार मनात येतो तेवढ्यात त्यांची चिमुकली येते अन् म्हणते, बाबा! मला हा असाइन्मेंट पूर्ण करायला मदत करा ना! उद्या द्यायचाय शाळेत. दिवसभराचा ताण डोक्यात असलेल्या बाबांनी रागावून सांगितलं, ‘दिसत नाही का आत्ता कामावरून आलो? आणखीन वैताग का आणतेस? आईकडून करून घे!’ चिमुरडी मान खाली घालून जातच होती इतक्यात दारावरची बेल वाजली- डिंग डॉंग! बाबांनी दार उघडलं तर शेजारची पिंकी दारावर होती अन् प्रेमाने म्हणते कशी – ‘अंकल विल यू प्लीज हेल्प मी इन् माय असाइन्मेंट? म्हणजे काका, तुम्ही मला मदत कराल का उपक्रम पूर्ण करण्यासाठी?’ बाबा थकलेलेच होते. पण तरीही म्हणाले, ‘हो नक्कीच! घरातील चिमुरडी पडद्यामागून हे पाहतच होती. ती मागच्या दारातून बाहेर गेली अन् पुढच्या दारात येऊन बेल वाजवली- डिंग डॉंग…! बाबांनी दार उघडलं. तेव्हा चिमुरडी म्हणाली, ‘अंकल, विल यू प्लीज हेल्प मी इन् माय असाइन्मेंट?’ हे ऐकून बाबा निरुत्तर झाले! त्यांना आपली चूक कळली होती.
आपलंही असं अनेकदा होतं. घरच्यांशी आपण कठोर बोलतो जे खरे अधिकारी असतात आपल्या प्रेमाचे, अन् बाहेरच्यांशी कितीही रागावलेलो असलो तरी आपला टोन लगेच शांत होतो. असं का? विचार करुया अन् आत्तापासूनच बदलू या! नाहीतर खूप उशीर झालेला असेल.
आज आपल्या बोलण्यात नुसता वाद दिसून येतो. संवाद दिसतच नाही. संध्याकाळी एकत्र बसून मारलेल्या शिळोप्याच्या गप्पा काळाच्या प्रभावात हरवत चालल्यायत्! वर्गात मुलांची बडबड, स्टाफरूममध्ये शिक्षक अन् ऑफिसमध्ये कर्मचारी यांच्या नुसत्या गप्पा, कॉलेजमध्ये वर्ग असतानाचं चॅटिंग, राजकीय नेत्यांनी आश्वासने, घरात मोठ्यांच्या नुसत्या सूचना या सर्वांत प्रेम अन् आपुलकी गमावलेली आहे. बोलण्याला अर्थच नाही, फक्त शब्दांची देवाण-घेवाण आपण करत आहोत! आज हे एक कटू सत्य आहे की रस्त्यावरून चालणारी मुलगी जर हसत अन् खूप वेळ फोनवर बोलत असेल तर ती आपल्या मित्र/मैेत्रिणीशीच बोलत असेल आणि जर लगेच फोनवरचं बोलणं संपलं तर ती घरच्यांशी बोलत असेल. कित्ती आपण बोलतो? कधीतरी गप्प बसू या. आपल्या बोलण्याला स्वल्पविराम खूप झाले, आता तरी फुलस्टॉप देऊ या.
काय बोलावे अन् कसे बोलावे यावर एक सुंदर सुभाषित आहे…
‘‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यं अप्रियम्‌|
प्रियं च नानृतम् ब्रूयात् एष धर्मः सनातनः॥
म्हणजे, ‘सत्य बोलावे, प्रिय बोलावे, सत्य पण अप्रिय बोलू नये आणि प्रिय पण असत्य बोलू नये हाच सनातन धर्म आहे’. ऐकायला सोपा वाटणारा हा श्लोक किती मोठा अर्थ सांगून जातो. शब्द हे असं शस्त्र आहे जे कधीच परत घेता येणार नाही, ते दोन हृदयांना जोडूही शकतं अन् तोडूही शकतं. शब्दांना कॉम्प्युटरच्या की पॅडमधला बॅकस्पेस बटन नसते. म्हणून जे बोलावं ते विचार करूनच बोलावं! सकारात्मक बोलावं!
चिल्लर नाणी नेहमीच आवाज करतात पण कागदाच्या नोटा आवाज करत नाहीत. इंद्रियं बंद ठेवल्याने त्यांची शक्ती वाढते. महाभारतातील गांधारीचे डोळे दीर्घकाळ बंद होेते म्हणून जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा त्या डोळ्यांतील प्रचंड शक्तीमुळेच दुर्योधनाचं शरीर अभेद्य बनलं. म्हणून आपलं तोंड बंद ठेवू या. शांत होऊ या. त्यानंतरचा शब्द हा प्रेमळच असेल. आशीर्वचनच असेल!!