ब्रेकिंग न्यूज़
बोलणं आणि सल्ले

बोलणं आणि सल्ले

शब्द बापुडे केवळ वारा’ असं कोण्या कवीने म्हटले आहे. पण ‘वारा’ म्हणून शब्द वार्‍यावर उधळायचे नसतात, याचं थोड्या लोकांना भान किंवा ज्ञान नसतं. तोंडाला येईल ते बोलावं असाच त्यांचा खाक्या असतो. असंबद्ध, तिरकस बोलून आपलं शहाणपण उधळण्यात त्यांना धन्यता वाटते. काहीजणांना तर ‘असं कर’, ‘असं करू नकोस’ असे फुकटचे सल्ले देणं आवडतं. आपण कुठं जायला बाहेर पडल्यावर वाटेत कोणीतरी ओळखीचा माणूस भेटतो. बोलायला विषय असतोच असं नाही, त्यावेळी ‘काय बरा आहेस ना?’ असं विचारणं होतं.
असाच एकदा मी बाहेर पडल्यावर रस्त्यात माझ्या ओळखीचा माणूस भेटला.
‘‘काय, बरा आहेस ना?’’ मी विचारलं.
‘‘मी बरा नाही असं तुला कोणी सांगितलं?’’- तो.
मी खजील झालो.
‘‘तसं नाही रे, तू कसा आहेस; ठीक आहे ना सगळं असं विचारण्याचा माझा उद्देश होता.’’ – मी.
‘‘मग तसं विचारायचं. मी ठीक आहे असं सांगितलं असतं तुला.’’
यावर मी काय बोलणार? असली विक्षिप्त माणसं वाटेत भेटण्यापेक्षा न भेटलेलीच बरी असं वाटलं. चांगल्या माणसाशी चार शब्द बोलावेत. असल्या विचित्र माणसांपासून चार पावले दूरच राहून निघून जाणं चांगलं.
असेच एकदा आमचं ऑफिस सुटल्यावर आम्ही सर्व स्टाफ चाललो होतो. समोरून विरुद्ध दिशेने आमचे एक ग्राहक आबासाहेब राणे येत होते. आमच्या व्यवस्थापकांनी सहज विचारायचं म्हणून विचारलं-
‘‘काय आबासाहेब, बरेच दिवस आमच्या ऑफिसमध्ये आला नाही?’’
‘‘काम नाही, येत नाही,’’ कोरडं, सरळ-सरळ तोडून टाकणारं उत्तर! त्यामुळे पुढचा संवादच बंद. याच महाशयांचं स्वतःचं ऍग्रिकल्चर फार्म होतं. चांगल्या जातीची केळी, अननस, चिकू, आंबे वगैरे उत्पादन व्हायचं. या वस्तू जवळच्याच शहराच्या बाजारात विकण्यासाठी जायच्या. पण वेळ घालवण्याचं साधन किंवा विरंगुळा म्हणून रस्त्यालगतच असलेल्या फार्महाऊसकडे महाशय थोडी थोडी फळं घेऊन बसायचे.
असेच एके दिवशी फळं घेऊन बसलेले असताना एक गिर्‍हाईक आलं. बरोबर त्याचवेळी आम्ही त्या रस्त्यानं चाललो होतो. कुतूहल म्हणून आम्ही आमची चाल मुद्दामच मंद केली, कसा काय व्यवहार होतो ते बघण्यासाठी. गिर्‍हाईकाने विचारलं, ‘‘आबासाहेब, केळी कशी?’’
‘‘तीन रुपयाला एक!’’
‘‘डझन कशी?’’
‘‘छत्तीस रुपये.’’
‘‘फिक्स रेट? काय कमी नाही?’’
‘‘नाही खपली तरी चालतील,’’ आबासाहेब.
हे काय उत्तर झालं? सरळ सांगायचं की, ‘‘होय फिक्स्ड रेट, घासाघीस नको.’’ पण असं सांगितलं तर ते आबासाहेब कसले? गिर्‍हाईक केळी विकत न घेता निघून गेलं. आबासाहेब मख्ख. चेहर्‍यावर कसलेच भाव नाहीत! म्हणायचे, ‘‘उत्पन्न छान येतं पण गिर्‍हाईक नाही. पीक तेथे भीक; फुकटात विक!’’ तुसडेपणाने वागल्यास कुठून गिर्‍हाईक येईल?