बोरकरांचे काव्यतीर्थ साकारुया

  •  घनश्याम बोरकर

गोव्यातील कोकणी आणि मराठी भाषेतील एक महान कवी आणि गोवामुक्ती-संग्रामातील एक स्वातंत्र्यसैनिक, कविवर्य पद्मश्री ‘बा. भ. बोरकर’ यांचे स्मारक,
बोरी गावाचेच नव्हे तर गोव्याचे वैभव ठरेल. हे एक सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक केंद्र म्हणून विख्यात व्हावे आणि भारताचे हृदयंगम ‘काव्यतीर्थ’ म्हणून उदयास यावे हीच परमेश्‍वर चरणी प्रार्थना!

कविवर्य बा. भ. बोरकर हे मराठी आणि कोकणी भाषेतील एक समर्थ, महान कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मराठी आणि कोकणी कविता आणि गीते आज जवळजवळ १०० वर्षांनंतरही लोकांच्या ओठांवर रुंजी घालतात आणि जन-मनाला एक अभूतपूर्व प्रसन्नता देतात. ‘तेथे कर माझे जुळती’, ‘जीवन त्यांना कळले हो’ अशा अनेक कवितांमधील ओळींचा भाषेमध्ये सुभाषितांसारखा वापर केला जातो. आजही गोव्यात, महाराष्ट्रात, बडोद्यात, दिल्लीत बा. भ. बोरकरांच्या कवितांवर कार्यक्रम सादर केले जातात. हे सर्व बा. भ. बोरकरांच्या कवित्वशक्तीतील प्रतिभेच्या सन्मानाचे द्योतक आहे.
हा प्रतिभावंत कवी फक्त सरस्वतीचाच पुजारी नव्हता, तर एक कृतिशूर राष्ट्रभक्तही होता. १९४६ साली राम मनोहर लोहियांनी गोवामुक्ती संग्रामाची, एका मंगळवारी गोव्यात मडगावात, हाक दिली आणि हा प्रज्ञावंत कवी, त्या गोवामुक्ती संग्रामाच्या प्रमाथी लाटेवर स्वार झाला. पोर्तुगीज सरकारची शाळेतली चांगली नोकरी लाथाडली. स्थिरस्थावर चाललेला आपला संसार, या राष्ट्रभक्ताने स्वतःच अस्थिर केला. म्हातारे आईवडील, पोटची ६ मुले यांना सोडून, गोव्याच्या, आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी हा कवी भूमिगत झाला. मुंबईला जाऊन तिथे गोवामुक्ती संग्रामाचे कार्यालय स्थापन केले. १९४६ साली कवी बा. भ. बोरकर महात्मा गांधींना भेटले आणि पुढे अनेक वर्षे पं. नेहरूंना भेटून गोवामुक्तीसाठी भारत सरकारने सैन्य पाठवावे यासाठी विनंत्या आणि पाठपुरावा करीत राहिले. गोवा १९६० ला स्वतंत्र झाला. पण त्याअगोदर १४ वर्षें हा द्रष्टा कवी स्वतंत्र गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून, वन-वासात राहात होता. कवी बा. भ. बोरकरांच्या या जाज्वल्य गोवा-प्रेमाची तसेच गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या मुत्सद्दी आणि विजिगीषू वृत्तीची, गोव्याने तसेच भारतातील जनतेनेही घ्यावी तशी दखल घेतलेली नाही.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हाही ‘गोवा हे स्वतंत्र राज्य राहिले पाहिजे आणि कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे’ ही ठाम भूमिका कवी बा. भ. बोरकरांनी घेतली होती. त्यांच्या या कोकणी आणि गोव्याच्या प्रेमामुळे, मराठी साहित्यिकांनी त्यांना एक प्रकारे वाळीत टाकले. ‘मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद’ हे बोरकरांना देण्यात आले नाही, ते त्यांच्या कोकणी प्रेमामुळेच. एवढेच नव्हे तर जेव्हा कवी बोरकरांचे नाव ‘ज्ञानपीठ पारितोषिका’साठी (मराठी कवितेसाठी) निश्चित करण्यात आले होते तेव्हा मराठी निवड मंडळाने (महाराष्ट्रातील) कवी बोरकर हे कोकणी कवी आहेत, असे नोंदवले. आणि कवी बोरकर ‘ज्ञानपीठा’सारख्या सर्वोच्च पुरस्काराला पारखे झाले. परंतु कवी बा. भ. बोरकरांचे गोव्यावर आणि आपल्या कोकणी भाषेवर एवढे निस्सीम प्रेम होते की ते आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले. कोकणीशी तडजोड केली असती तर हे सगळे मान-सन्मान त्यांच्या पायाशी लोळण घेत आले असते. कवी बा. भ. बोरकरांचे गोवा आणि कोकणीवर असलेले असीम, अव्यभिचारी प्रेम, त्यांची तत्त्वनिष्ठा, त्यांचे देशप्रेम, त्यांचा त्याग याचासुद्धा गोवा प्रांताने करावा तसा आदर आणि सन्मान केला नाही.

अशा या प्रज्ञावंत कवीचे, द्रष्ट्या क्रांतिकारकाचे, सच्च्या देशभक्ताचे गोव्यात, कवीच्या ‘बोरी’ गावात एक भव्य आणि सुंदर स्मारक व्हावे, अशी आमची प्रामाणिक आणि मनःपूर्वक इच्छा आहे.
या स्मारकाचा दैनंदिन जीवनातील व्यवहारातही उपयोग होईल परंतु त्याहीपेक्षा अधिक माणसातील कवित्वाला, साहित्याला, संगीताला, देशभक्तीला आणि विजिगीषू प्रसन्न वृत्तीला हे स्मारक सदैव प्रेरणा देत राहील.

‘कविवर्य बा. भ. बोरकरांचे हे स्मारक बोरी गावाचेच नव्हे तर गोव्याचे वैभव ठरेल. हे एक सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक केंद्र म्हणून विख्यात व्हावे आणि भारताचे हृदयंगम ‘काव्यतीर्थ’ म्हणून उदयास यावे हीच परमेश्‍वर चरणी प्रार्थना!