बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये सापडल

बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये सापडल

आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या एएन-३२ या भारतीय वायुसेनेच्या विमानाचे काही अवशेष अरुणाचल प्रदेशातील सिंयांग जिल्ह्यात आढळून आले आहेत. या विमानात एकूण १३ जण होते. भारतीय वायुदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अरुणाचल प्रदेशच्या टाटो भागाच्या ईशान्य भागात १६ किलोमीटर दूर १२ हजार फुटांवरून हे अवशेष काल पाहण्यात आल्याचे म्हटले आहे. आता या विस्तृत भागात शोधमोहीम घेण्यात येणार आहे.

वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानाचे काही अवशेष काल मंगळवारी शोध मोहिमेदरम्यान अरुणाचल प्रदेशातील लिपोच्या उत्तरीय भागात दिसले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून ही शोध मोहीम सुरू आहे. एएन-३२ विमानाने ३ जून रोजी आसामच्या जोरहट येथून चीन सीमेजवळील मेंचुकासाठी उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर वायुसेनेने मेंचुका आणि त्याच्या आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली होती.

वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले की, शोध मोहीम अजूनही सुरू आहे. खराब हवामान असूनही भारतीय वायुसेनेकडून या विमानाची शोधमोहीम युद्धपातळीवर राबली जात आहे. हे विमान अरुणाचल प्रदेशाकडे जाण्याच्या मार्गावरच बेपत्ता झाले होते. मागील आठवड्यात बुधवारी वायुसेनेने या विमानाच्या शोधासाठी एसयू ३० जेट लढाऊ विमान, सी १३०जे, एमआय १७ व एएलएच हेलिकॉप्टर पाठवलेले आहे. ही शोधमोहीम आसामच्या जोरहाट ते अरुणाचल प्रदेशच्या मेचुका ऍडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंडदरम्यान असलेल्या वन क्षेत्रात केली जात आहे. याशिवाय इस्रोचे उपग्रह काटरेसॅट व आरआयसॅट यांच्याद्वारे देखील या भागांची छायाचित्रे काढण्यात आली आहेत. वायुसेनेचे माजी हवाई अधिकारी कमांडिंग चीफ एअर मार्शल आर. डी. माथुर या शोध व बचाव मोहिमेला मार्गदर्शन करत आहेत.