बिहारात हॉटेलमध्ये ठेवली इव्हीएम!

>> निवडणूक अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस

बिहारात पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना मुझफ्फरपूर येथे एका हॉटेलच्या खोलीत सहा मतदान यंत्रे (ईव्हीएम) घेऊन राहिलेल्या एका निवडणूक अधिकार्‍याला काल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र या ईव्हीएमचा वापर झालेला नाही किंवा सीलही तोडलेले नाही अशी ग्वाही जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या संदर्भात अनेक स्थानिक राजकीय नेते व विरोधी आघाडी पक्षांच्या नेत्यांना क्षेत्रीय दंडाधिकारी अवधेश कुमार यांनी निवडणूकविषयक साहित्य एका हॉटेलमध्ये हलविल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आवाज उठवला.

याविषयी चौकशी झाल्यानंतर अवधेश कुमार यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ईव्हीएम स्ट्रॉंग रूम किंवा निर्धारीत मतदान केंद्रातच ठेवण्याचा दंडक आहे. अवधेश कुमार यांना ईव्हीएम हॉटेलमध्ये हलविण्यास मदत केलेल्या ५ पोलीस कर्मचार्‍यांवरही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुझफ्फरपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आलोक रंजन घोष यांनी ही माहिती दिली. मात्र, सदर ईव्हीएमच्या गैरवापराबाबतचा संशय त्यांनी फेटाळला. मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास बदली वापरासाठी सदर ईव्हीएम राखून ठेवण्यात आली होती असे ते म्हणाले.