‘बिग बॉस’च्या घरातूनच अभिजित बिचकुले यांना अटक

‘बिग बॉस मराठी’च्या दुसर्‍या पर्वातील स्पर्धक अभिजित बिचकुले यांना सातार्‍यातील धनादेश न वटल्याच्या प्रकरणातून बिग बॉसच्या घरातूनच काल अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरे पोलिसांच्या सहाय्याने बिचकुले यांना ही अटक केली.

दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी बिचकुले यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले होते. त्या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. मुंबई पोलिसांच्या सहाय्याने सातारा पोलिसांनी अटकेचे सोपस्कार पार पाडले.

बिचकुले यांना आज सातारा येथील न्यायालयात उभे केले जाणार आहे. यामुळे आता बिचकुले स्पर्धेत कायम राहतील की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभिजित बिचकुले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढविल्या आहेत. नगरसेवक ते राष्ट्रपती पदासाठीही ते निवडणुका लढले आहेत. सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही अनेकदा आव्हान दिले आहे.