बा. भ. बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील संस्कारबहुलत्व

बा. भ. बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील संस्कारबहुलत्व

  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

गोव्याच्या निसर्गाने आणि विशेषत्वाने बोरकरांच्या बोरी गावच्या परिसराने बोरकरांमधील कवी निरंतर सौंदर्यशाली ठेवला. या त्रिमितीमुळे बोरकरांच्या प्रतिभेचे इंद्रधनुष्य सदैव सप्तरंगांनी काव्यक्षितिजावर खुलत राहिले. पतंजलीचे योगसूत्र, महात्माजींची जीवनधारा आणि रवींद्रनाथांची साहित्यसाधना यांचा बा. भ. बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर पडलेला प्रभाव अमिट स्वरुपाचा आहे. कविश्रेष्ठ बोरकरांची आज १०९ वी जयंती, त्यानिमित्त…

कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर जन्मास येऊन ३० नोव्हेंबर २०१९ रोजी एकशे नऊ वर्षे पूर्ण होताहेत. कालप्रवाहात अनेक कवी निर्माण होतात. त्यांच्या प्रतिभेचे स्फुरण विशिष्ट कालावधीत परमोच्च बिंदू गाठत असते. रसिकजनांकडून तिचा गौरव होत असतो. कालांतराने लोकप्रियतेची ही लाट ओसरत असते. हा रसिकजनांचा दोष नव्हे. ही जगाची रीत आहे. अभिरुचिभेद हेही त्याचे एक कारण आहे. कविता ही चिरंतन सत्याला उद्गार देत असली तरी स्थल-काल-सापेक्ष अवकाशात ती जन्म घेत असते. पण बा. भ. बोरकरांच्या प्रातिभ धर्माचा प्रवास पाहताना आणि त्यांच्या अम्लान कवितेचा आस्वाद घेताना रसिकाला आगळा-वेगळा अनुभव येतो. बालकवींच्या कवितेप्रमाणे ती नित्यनूतनत्वाचा प्रत्यय देते. ती नितांत रमणीय शब्दकळेची कविता आहे. पण शब्दनिष्ठ अभिव्यक्ती हेच तिचे प्रयोजन नव्हे. सम्यक जीवनांगांना व्यापून राहिलेली, जीवनावर रसरसून प्रेम करणारी, जीवनसौंदर्याचा प्रत्यय आणून देणारी ती वाग्विलासिनी आहे. जीवनदर्शन घडविणारी कवित्वशक्ती म्हटल्याबरोबर मानवी प्रवृत्तीतील रूप-रस-गंध-स्पर्श-नाद या संवेदना आल्या, मानवी स्वभावातील विचार आला, भाव-भावनांची आंदोलने आली, विवेक-अविवेक यामध्ये चालणार्‍या निरंतर तुमुल युद्धाचे भान आले, प्रगल्भ जाणिवा आल्या, जीवनाचे आकलन – मर्मदृष्टी- आणि त्यांतून सर्जनाला आवश्यक असलेली अंतर्दृष्टी आली. सर्जनशील कलावंताला आपण समाजासाठी आपल्या जीवनातील भव्य, दिव्य, उत्कट आणि उत्कृष्ट देण्याची अंतःप्रेरणा घेऊन आलेलो आहोत हे द्रष्टेपण हवे. वर उल्लेखिलेले सर्व पैलू बा. भ. बोरकरांमध्ये समग्रतेने एकवटलेले होते. प्रतिभावंत कवी हा जन्मावा लागतो असे म्हटले जाते ते यासाठी. जन्मजात प्रतिभेचे पोषण करण्यासाठी स्वप्रयत्नांची जोड द्यावी लागते. त्यासाठी जे जे आवश्यक ते ते त्यांनी केले. आपले कविमन त्यांनी फार लवकर ओळखले. त्याची निगराणी त्यांनी निगुतीने केली. दहा दिशांकडून योग्य वेळी योग्य संस्कार त्यांच्यावर झाले. स्वागतशीलतेने आणि आपल्या प्रकृतिधर्माची जाणीव ठेवून त्यांनी ते आत्मसात केले; पण स्वत्व जोपासले. या गुणसमुच्चयातून बोरकरस्पर्शाची कविता जन्मास आली. मराठी काव्यशारदेचे लावण्यमय लेणे बनून.

खेळण्याच्या वयात बोरकर शब्दांशी खेळू लागले. ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात ः ‘‘एवढे खरे की लोलकांसारखे शब्द गोळा करण्याचा आणि मनीच्या उजेडात ते न्याहाळीत बसण्याचा मला जो छंद जडला तो तेव्हापासून.’’ या त्यांच्या शब्दक्रीडेत केवळ अनुकरण नव्हते. श्रवणभक्तीच्या संस्कारांमधून नवीन शब्द घडविण्याच्या सामर्थ्याचे दर्शन त्यांच्या वाढत्या वयात घडत गेले. बोरकरांनी वेळोवेळी आपल्या मनात गंधसंवेदना, स्पर्शसंवेदना, रंगसंवेदना आणि स्वरविषयक जाणिवा कशा जागृत झाल्या याविषयी खूप काही लिहून ठेवलेले आहे. हे सारे संदर्भ आपल्या मनात जागे करून त्यांच्या कविमनाच्या विकासक्रमाकडे बघायला हवे.

वाचन, पठण, श्रवण इत्यादींची समृद्ध परंपरा असलेल्या त्यांच्या बोरीच्या एकत्रित कुटुंबात भजने कशी चालत आणि ती ऐकल्याने आपोआप कान कसे तयार होत याचे बोरकरांनी एकतानतेने वर्णन केले आहे.

‘‘रात्र झाली की, घरच्या देव्हार्‍यापुढे तीन तीन तास भजन चाले. या भजनात एकूण एक पदे मंथून काढलेल्या रत्नांसारखी वेचीव आणि सोलीव होती. त्यात जसे छंदांचे वैचित्र्य आणि वैपुल्य होते तसेच वेगवेगळ्या कविप्रतिभांचे निवडक आविष्कारही होते. राग-तालांचे बाहुल्यही होते. अभंग, विराण्या, गौळणी, भारुडे, पदे, सवाया वगैरे प्रकार असत तसे ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, सोहिरोबा, कृष्णंभट बांदकर, मध्वमुनीश्वर, शिवदिनकेसरी, विठोबाअण्णा दप्तरदार, मीरा, तुळसी, कबीर अशा विविध कवींचे रसाळ वेंचे असत. आमच्याकडील भजनांची या पदांची निवड आणि त्यांचा क्रमनिर्णय कुणी केला, हे कळायला मार्ग नाही; पण ती यादी अव्वल रसिकतेची घोतक आहे, यात मुळीच शंका नाही. आमच्या घराण्यात ही भजनाची परंपरा सात पिढ्या चालत आली आहे आणि सात पिढ्यांच्या रसिकतेतून तिला हा असा आकार लाभला आहे असे मला वाटते.

घरात जसे आठही पार असे निवडक काव्य कानावर पडे त्याचप्रमाणे चातुर्मासात आणि चैत्र-वैशाखात चौसोपीवर वाचल्या जाणार्‍या पोथ्या ऐकायला मिळत. त्यात दासबोध, आर्याभारत, हरिविजय, भक्तिविजय, पांडवप्रताप, गुरचरित्र असे कितीतरी लोकमान्य ग्रंथ असत.’’
(एका पिढीचे आत्मकथन – वा. रा. ढवळे गौरवग्रंथ/संपा. पु. शि. रेगे, वा. ल. कुलकर्णी, रा. भि. जोशी, गं. बा. ग्रामोपाध्ये/मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय प्रकाशन, मुंबई/१९७५/पृ.२२४)
याच आत्मकथनातून बा. भ. बोरकरांनी बोरी गावात जगन्नाथबुवा बोरीकरांनी सुरू केलेल्या भजनी सप्ताहामधून स्वरसंगीताच्या मैफली कशा बहरत गेल्या, अन्य सांस्कृतिक उपक्रमांमुळे वातावरण कसे चैतन्यमय होऊन जात असे याचे वर्णन केले आहे. हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘‘शब्दांनी आपले आंतररहस्य आपण होऊनच मला सांगितले. त्यासाठी मला कधी शब्दकोशाचा आश्रय घ्यावा लागला नाही.’’ हे त्यांनी मोकळेपणाने सांगून टाकले आहे.

दुसरा संस्कार चित्रकलेचा. बोरकरांच्या वडिलांचे अनेक आवडते छंद होते त्यांपैकी चित्रकला हा एक होता. राजा रविवर्म्याची बहुतेक सर्व प्रसिद्ध चित्रे त्यांनी आपल्या दिवाणखान्यात लावली होती. स्वतःही चित्रे काढण्याचा छंद त्यांनी जोपासला होता. त्यामुळे रंग-रेषांच्या विश्‍वात बोरकरांना रमता आले. त्यांच्या कवितेत रंगानुभूतीच्या प्रतिमा येतात त्या या संस्कारामुळे. या रंगविश्‍वाशी बोरकरही संस्कारक्षम वयात थोडेफार खेळले आहेत. एकीकडे सौंदर्यासक्तीचा गुण या चित्रांच्या अवलोकनामुळे त्यांच्यामध्ये आला आणि दुसरीकडे पौराणिक, रामायण-महाभारतातील या प्रसंगचित्रमालिकेमुळे पौराणिक संदर्भांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. आपाततः श्रुतयोजन कौशल्यामुळे ते संदर्भ त्यांच्या कवितेत येत गेले. त्यांची कविता अभिजात वळण घेऊन आली. अशी कितीतरी उदाहरणे येथे उद्धृत करता येतील.
बोरकरांच्या गावातील वयोवृद्ध पात्रीस हा रेंदेर त्यांच्या घरावरून येता-जाता एखादे कोंकणी गाणे शिकवून जाई. त्याच्या या स्वयंस्फूर्त गीतगायनकौशल्याचा आणि आपल्यावर झालेल्या संस्काराचा बोरकरांनी अनेकवार उच्चार केलेला आहे.

महाभारताच्या वाचनाने आपली कल्पकता समृद्ध केली. प्रगल्भ केली. बुद्धी संस्कारित केली. ज्ञानेश्वरीने आपल्या भावनांना शुचितेचे वळण दिले, सौंदर्यानुभूतीचे संस्कार केले असे ते मानत असत. काव्यरचनेच्या उमेदीच्या काळात त्यांची आणि समकालीन कवी दामोदर अच्युत कारे यांची जुळून आलेली मैत्री परस्परांच्या काव्यनिर्मितीस पोषक ठरली. कारे यांच्याकडून केशवसुत, बी, ना. वा. टिळक, विनायक, दत्त इत्यादी कवींचे कवितासंग्रह बोरकरांनी आणून वाचले. जडणघडणीच्या या कालखंडात हे सारेच त्यांना भावले असे नाही; पण त्यांच्या संवेदनशीलतेवर त्यांचा थोडाफार परिणाम झालाच. पण बालकवींची भावकोमल कविता आणि तिच्यातील सौंदर्याचे उन्मेष टिपणारी शब्दकळा त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न करून गेली. कविवर्य तांबे यांची कविता बाह्यांगाने आणि अंतरंगाने त्यांना प्रभावित करून गेली. या काळात त्यांनी ‘केसरी’, ‘मनोरंजन’, ‘चित्रमय जगत’ आणि ‘नवयुग’ या नियतकालिकांचे समरसून वाचन केले. ‘सत्संग’, ‘प्राचीप्रभा’ आणि ‘पथ्यबोध’ या गोमंतकात प्रसिद्ध होणार्‍या नियतकालिकांचे वाचन ते अधूनमधून करीत असत. सरदेसाई यांच्या ‘मराठी रियासती’चे तसेच स्वामी रामतीर्थ आणि स्वामी विवेकानंदांची पुस्तके त्यांनी आवडीने वाचली. कादंबरीवाचनाला त्या काळात घरातून मज्जाव असायचा. पण प्रतिकूलतेतून वाट काढीत त्यांनी हरी नारायण आपटे आणि नाथमाधव यांच्या कादंबर्‍या वाचल्या.

काव्यसाधनेच्या पहिल्या बहरात त्यांना यशवंतराव सूर्यराव ऊर्फ भाई देसाई आणि वि. स. खांडेकर ही भली माणसे भेटली. बा. भ. बोरकर आणि वि. स. खांडेकर यांचे भावसंबंध तर उत्तरोत्तर दृढ होत गेले. बोरकरांचा मराठी काव्यविश्‍वात झालेला विकास भाऊसाहेबांना दीर्घकाळ अनुभवता आला. अशा प्रकारचे वाङ्‌मयीन सौहार्द दुर्मीळच मानावे लागेल. एकीकडे ते बोरकरांना लाभले आणि दुसरीकडे कुसुमाग्रजांनाही लाभले.

बा. भ. बोरकर यांच्या कवित्वशक्तीवर संस्कार करणार्‍या आणखी दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करायला हवा. त्यातील एक ट्रेनिंग कॉलेजचे नामवंत अध्यापक प्रो. रामचंद्र शंकर नायक. ते रसज्ञ होते, व्यासंगी होते अन् अभिरुचिसंपन्न होते. बोरकरांच्या अभिरुचीला वेगळे वळण लावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. दुसर्‍या विदुषी आणि लेखिका दोना प्रोपॅर्सुयो आफोंसो ई फिगरेदो. त्या तेजस्वी होत्या. त्यांच्या वात्सल्ययुक्त वागण्याने आणि कुशल अध्यापनशैलीमुळे पोर्तुगीज, फ्रेंच भाषेतील उत्तम कविता बोरकरांना अभ्यासता आल्या. फ्रेंच भाषेतील ह्यूगो, लामार्तिन आणि म्यूसे हे कवी बोरकरांनी तिच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासले आणि पोर्तुगीज भाषेतील झ्युंकैरू, आंतॅरू, बुकाज, कामॉंइस, जुवांव द देउश व काझिमीरू द आब्रेव हे कवी अभ्यासले. काव्यनिर्मितीमागची मर्मदृष्टी तिला अवगत होती. म्हणूनच ‘‘बाईने असा मला वाङ्‌मयीन पुनर्जन्मच मिळवून दिला’’ असे सार्थ उद्गार बोरकरांनी काढले आहेत.
बोरकरांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत भारतीय जीवनसंचित आणि पाश्‍चात्त्य सौंदर्यदृष्टी यांचा स्वरसंगम साधला गेला. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे निसर्गानुभूती. गोव्याच्या सौंदर्याची लयलूट करणार्‍या निसर्गाने आणि विशेषत्वाने बोरकरांच्या बोरी गावच्या परिसराने बोरकरांमधील कवी निरंतर सौंदर्यशाली ठेवला. या त्रिमितीमुळे बोरकरांच्या प्रतिभेचे इंद्रधनुष्य सदैव सप्तरंगांनी काव्यक्षितिजावर खुलत राहिले. पतंजलीचे योगसूत्र, महात्माजींची जीवनधारा आणि रवींद्रनाथांची साहित्यसाधना यांचा बा. भ. बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर पडलेला प्रभाव अमिट स्वरुपाचा आहे.