ब्रेकिंग न्यूज़
बालाकोटमध्ये ठार झाले होते १७० दहशतवादी

बालाकोटमध्ये ठार झाले होते १७० दहशतवादी

>> भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकसंदर्भात विदेशी पत्रकाराचा दावा

भारतीय हवाई दलाने गेल्या २६ फेब्रवारी रोजी पाकिस्तानमधील जैश ए महंमद संघटनेच्या बालाकोट येथील तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे १७० दहशतवादी ठार झाले, अशी माहिती एका इटालियन महिला पत्रकाराने एका वृत्तांतात दिली आहे.
फ्रान्सिस्का मारिनो असे या महिला पत्रकाराचे नाव असून बालाकोट हवाई हल्ल्यात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे केवळ खोटारडेपणा असल्याचे तिने म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांदरम्यान आपण याविषयी आपल्या सूत्रांकडून माहिती गोळा केल्याचे सदर वृत्तांतात म्हटले आहे. वस्तुस्थितीबाबत पाककडून जगाची फसवणूक करण्यात येत असल्याचे त्यात नमूद केले आहे.

२६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोट तळावर हल्ला केल्यानंतर सकाळी ६ वाजता (हल्ल्याच्या अडीच तासांनी) पाक लष्कराच्या शिंकियारी छावणीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते असे मारिनो यांनी म्हटले आहे.

बालाकोट हल्ल्यात जखमी झालेल्या दहशतवाद्यांपैकी सुमारे ४५ जण अजूनही पाकच्या लष्करी इस्पितळात उपचार घेत आहेत. उपचार सुरू असताना २० जण मरण पावले आहेत. तर जे जखमी दहशतवादी बरे झाले आहेत ते पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहेत, असे मारिनो यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष बालाकोट तळावर ठार झालेले व इस्पितळात मरण पावलेले मिळून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दहशतवाद्यांची संख्या १३० ते १७० एवढी आहे, असे मारिनो यांनी लिहिले आहे. ठार झालेल्यांमध्ये ११ प्रशिक्षकांसह बॉम्ब तयार करणारे आहेत. तसेच मेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन जैशच्या दहशतवाद्यांनी माहिती बाहेर फुटू न देण्यासाठी त्यांना पैसे दिले आहेत. बालाकोट दहशतवादी तळ पाक लष्कराच्या पूर्ण देखरेखीखाली आहे. स्थानिक पोलिसांनाही त्या भागात जाण्यास मज्जाव असल्याचे मारिनो यांनी सदर वृत्तात म्हटले आहे.