बालगोपाळ सादर करणार आहेत दशावतारी काला लोकोत्सवानिमित्त पणजीत १४ रोजी आयोजन

बालगोपाळ सादर करणार आहेत दशावतारी काला लोकोत्सवानिमित्त पणजीत १४ रोजी आयोजन

आपल्या पारंपरिक लोककला लोप पावत असताना आणि त्यांच्या संवर्धनाची गरज व्यक्त होत असताना केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात न ठरता प्रत्यक्षात नव्या पिढीकडे ही लोककला सोपवण्याचा एक प्रयत्न म्हार्दोळच्या ‘कृतार्थ’ संस्थेने केलेला आहे. एकेकाळी गावोगावी लोकप्रिय असलेल्या व अस्तंगत होत चाललेल्या दशावतारी काल्याचा ठेवा जतन करण्यासाठी बालगोपाळांकडून हा ‘काला’ संस्थेने बसवून घेतला असून येत्या मकर संक्रांतीला १४ जानेवारीस कला अकादमीत ‘लोकोत्सवा’ निमित्त दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात संध्याकाळी ६ वाजता त्याचा प्रयोग सादर होणार आहे.

आधुनिकीकरण आणि शहरीकरणाच्या विळख्यात पारंपरिक लोकजीवनाचा सांस्कृतिक ठेवा दुर्लक्षिला जाऊ नये यासाठी बालकलाकारांना घेऊन ‘कृतार्थ’ चे श्री. राजेंद्र देसाई यांनी हा दशावतारी काला बसविला आहे.
या ‘काल्या’ मध्ये गौतम गोपाळ दामले, कौशिक उदय जठार, ओंकार योगानंद केरकर, कार्तिक विशाल जठार, कौशिक नीळकंठ केरकर, देवांग मिलिंद जाण, कार्तिक दामोदर घैसास, नहुश हेमंत अध्यापक, रघुराम उदय शानबाग, गंधर्व नंदा केरकर, शर्वा शशांक हुडेकर, वेदा अजय जठार यांचा सहभाग असून गोवर्धन संदीप नाईक व मितिशा अनिल सतरकर यांची मृदंग साथ असेल.
२०१४ साली टिळक पुण्यतिथीदिनी स्थापन झालेल्या या संस्थेने यापूर्वी दशावतारी काल्यावर कार्यशाळा घेतली होती. आता प्रत्यक्ष काल्याची निर्मिती करून एक पाऊल पुढे टाकले आहे. संस्थेने निर्मल साधना उपक्रमांतर्गत ओहळ सफाई, लोकसहभागानिशी वृक्ष लागवड, मार्गफलक स्वच्छता मोहीम, कला सुसंगत पर्यावरण व्रताचरण, आदी उपक्रम यापूर्वी राबवले आहेत.