ब्रेकिंग न्यूज़
बारावी परीक्षेचा निकाल ८९.५९ टक्के

बारावी परीक्षेचा निकाल ८९.५९ टक्के

>> यंदा निकालात ४.०६ टक्के वाढ

>> वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९१.८६ %

यंदा बारावीच्या परीक्षेला १६,९५२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १५,१८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९१.९७ टक्के तर मुलांची टक्केवारी ८६.९१ टक्के एवढी आहे. परीक्षेला बसलेल्या ७९८५ मुलांपैकी ६९४० उत्तीर्ण झाले. तर ८९६७ मुलींपैकी ८२४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. २८ फेब्रुवारी ते २६ मार्च २०१९ दरम्यान एकूण १७ केंद्रांतून बारावीची परीक्षा घेतली होती, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सामंत यांनी दिली.

निकालाच्या टक्केवारीत वाढ
मागील दोन वर्षांत बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत घट झाली होती २०१६ मध्ये ९०.१० टक्के निकाल लागला होता. त्यानंतर २०१७ मध्ये ८८.७८ टक्के आणि २०१८ मध्ये ८५.५३ टक्के एवढा लागला होता. यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

६ विद्यालयांचा १०० टक्के
राज्यातील सर्वाधिक निकाल म्हापसा केंद्राचा ९५.३५ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल साखळी केंद्राचा ७८.३४ टक्के एवढा लागला आहे. राज्यातील सहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात तेरेझा उच्च माध्यमिक कांदोळी, कमळेश्वर उच्च माध्यमिक – कोरगाव पेडणे, परूळेकर उच्च माध्यमिक – वेरे बार्देश, मुष्टीफंड आर्यन – कुजिरा, लोकविश्वास प्रतिष्ठान उच्च माध्यमिक – ढवळी फ़ोंडा आणि संजय स्कूल उच्च माध्यमिक पर्वरी या उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे.

राज्यातील २० उच्च माध्यमिक विद्यालयांचा ९५ टक्के आणि जास्त निकाल लागला आहे. संगणक विज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, गणित आणि सांख्यिकी (वाणिज्य), अर्थशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, गणित (विज्ञान शाखा), भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, लेखापाल, राज्यशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

क्रीडा गुणांमुळे
११४ विद्यार्थी पास
बारावीच्या एकूण ३०९३ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ मिळाला. त्यातील ११४ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणामुळे उत्तीर्ण झाले आहेत. क्रीडा गुणामुळे परीक्षेत ०.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेतील १५ टक्के मुलांनी ७५ ते १०० गुण मिळविले आहेत. ४० टक्के मुलांनी ६० ते ७४ गुण, ३५ टक्के मुलांनी ४५ ते ५९ गुण आणि केवळ ७ टक्के मुलांना ३३ ते ४४ गुण मिळालेले आहेत.

पुरवणी परीक्षा ७ जून पासून
बारावीची पुरवणी परीक्षा ७ जून २०१९ पासून सुरू होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा १७ जूनला घेतली जाणार आहे. पुरवणी परीक्षा उत्तर गोव्यातील आसगाव, म्हापसा येथील कुशे उच्च माध्यमिक विद्यालय आणि दक्षिण गोव्यातील नुवे येथील कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात येणार आहे. या पुरवणी परीक्षेला गुणांची टक्केवारी वाढविण्यास इच्छुक विद्यार्थी बसू शकतात. विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी वाढविण्यासाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.
विद्यार्थी उत्तर पत्रिकेच्या सत्यापित छायाप्रतिसाठी ६ मे, पुनर्मूल्यांकनासाठी ९ मेपर्यंत आणि गुणांची पडताळणीसाठी ९ मे पर्यंत अर्ज करू शकतात, असेही सामंत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये, उपसचिव (आयटी) भारत चोपडे, साहाय्यक सचिव ज्योस्टीना सरीन यांची उपस्थिती होती.