बायणातील तीन इमारती निर्बंधित घोषित

>> वास्कोत तीन पोलीस पॉझिटिव्ह

>> आरोग्य सचिव नीला मोहनन यांची माहिती

बायणा वास्को येथील एका बर्फ उत्पादक कंपनीजवळील तीन इमारतींच्या भागाचा मायक्रो कटेंन्मेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. वास्कोतील तीन पोलीस कोरोनाबाधित आढळले असून बायणामध्ये कोरोना पॉझिटिव्ह २९ रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती आरोग्य सचिवा नीला मोहनन यांनी काल दिली.
वास्कोतील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुरगाव पोलीस स्थानकावर २ आणि वास्को पोलीस स्थानकावरील १ एका पोलीस कर्मचार्‍याचा समावेश आहे. एका पोलीस कर्मचार्‍याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आरोग्य खात्यात काम करीत आहे. या पोलीस कर्मचार्‍याच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना क्वारंटाईऩ करण्यात आले आहेत, असेही नीला मोहनन यांनी सांगितले.

कुडतरीत डॉक्टर पॉझिटिव्ह
कुडतरी येथील एक खासगी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या खासगी डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. कुडतरी येथे कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ झाली आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
बेती येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मांगूर हिलाशी संबंध नाही. सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुरक्षा रक्षक उत्तर गोव्यातील असून त्या रुग्णाबाबत सविस्तर माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड इस्पितळामध्ये सुरुवातीला व्हॅन्टिलेटरवर ठेवला होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने व्हॅन्टीलेटरवरून हटविण्यात आला आहे, असे मोहनन यांनी सांगितले.

पणजीतून गायब झालेला अजूनही बेपत्ताच ः मोहनन
पणजी मार्केटमधून गायब झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली. नवी दिल्लीतून हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रेल्वेने गोव्यात आला होता. त्याच्या कोविड चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर पणजी मार्केटमधील एका तार्वेनमध्ये येऊन राहिला होता. त्याठिकाणी दारूची विक्री केल्याची तक्रार आहे. या व्यक्तीचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो गायब झाला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५६०

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन २७ रुग्ण काल आढळून आले आहेत. मांगूर हिलामध्ये नवीन ६ रुग्ण आणि मांगूरहिलाशी संबंधित नवीन ५ रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सध्याची संख्या ५६० झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

वास्कोत रुग्णसंख्या ६६
बायणा येथे आणखी २, सडा येथे आणखीन ४, नवेवाडे येथे आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. सडा, बायणा, नवा वाडा वास्को येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६६ झाली आहे.

सत्तरी तालुक्यातील मोर्ले गावात कोरोना पॉझिटिव्ह आणखीन २ रुग्ण आढळून आले असून या गावातील कोरोना रुग्णांची संख्या १९ झाली आहे. मडगाव बेती येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

११ रुग्ण कोरोनामुक्त
मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणारे आणखीन ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंत ६५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील ५६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही मोहनन यांनी सांगितले.

कोविड केअर सेंटर शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कोलवा, कळंगुट आणि एमपीटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. कोविड केअर सेंटरसाठी स्टेडियम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित १५ रुग्णांना दाखल करण्यात आले असून या खास वॉर्डात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड प्रयोगशाळेत १३०७ स्वॅबचे नमुने पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतून १३८० नमुन्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत.

नवीन रुग्ण
पॉझिटिव्ह  २७

कोरोनामुक्त ११

वास्कोतील रुग्णसंख्या  ६६

पर्वरी येथे कोरोना पॉझिटिव्ह १ रुग्ण आढळून आला आहे. या कोरोना रुग्णांबाबत सविस्तर माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली.