बायणातील काही भाग निर्बंधित करणार

>> मुख्यमंत्री; इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक चाचण्या गोव्यात

राज्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, नावेली स्टेडियम आणि पेडणे स्टेडियम या प्रमुख तीन स्टेडियममध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्कोतील मांगोर हिलनंतर कोविड पॉझिटिव्ह जास्त रुग्ण आढळून आलेल्या बायणातील काही भागात कटेंन्मेंट झोन जाहीर करण्यावर विचार केला जात असून बुधवारपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील ९५ टक्के कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. या रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाऊ शकतात. नावेली स्टेडियममध्ये कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या महिलांवर, श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पुरुष कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.

कोविड केंद्राला
विरोध नको
राज्यातील विविध भागात कोविड केअर केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने पाहणी केलेली आहे. राज्यात कोविड केंद्राला विरोध करणे योग्य नव्हे. कोविड विरोधात लढा देण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. कोविड सेंटरवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

सर्वाधिक चाचण्या गोव्यात
पंतप्रधान मोदी यांनी कोविड जास्तीत जास्त चाचण्या आणि जनजागृतीवर देण्याची सूचना केली. आरोग्य सेतू ऍप पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर पोलिसांना लक्ष ठेवण्यात सुलभ होणार आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा गोव्यात सर्वाधिक कोविड चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.

खाणी सुरू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्याकडे जीएसटी नुकसान भरपाईची ७५० कोटीची थकबाकी, पीएम केअर फंडातून आर्थिक साहाय्य, राज्यात बंद असलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

पंतप्रधान मोदींकडे राज्यासाठी खास आर्थिक पॅकेजची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. केंद्रांकडून मिळणारी जीएसटीची मागील सात ते आठ महिन्यांची सुमारे ७५० कोटींची थकबाकी प्रलंबित आहे. राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू केल्यास नवीन व्यवसाय सुरू होऊन नागरिकांना थोडासा दिलासा मिळू शकतो. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्तीची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.