ब्रेकिंग न्यूज़

बांगलादेशचा विंडीजवर एकतर्फी विजय

>> शाकिब अल हसनची अष्टपैलू चमक

>> लिटन दासची स्फोटक खेळी

शाकिब अल हसनने ठोकलेले नववे एकदिवसीय शतक व त्याने लिटन दाससह चौथ्या गड्यासाठी केवळ २२.३ षटकांत केलेल्या १८९ धावांच्या अविभक्त भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने काल विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजचा ७ गडी व ५१ चेंडू राखून पराभव केला. वेस्ट इंडीजने विजयासाठी ठेवलेले ३२२ धावांचे लक्ष्य बांगलादेशने ४१.३ षटकांत गाठले. केवळ तीन स्पेशलिस्ट गोलंदाज व दोन अष्टपैलूंसह उतरलेल्या विंडीजच्या एककल्ली मार्‍याचा समाचार बांगलादेशी फलंदाजांनी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

खेळपट्टीकडून मिळत असलेल्या मदतीमुळे बांगलादेशी गोलंदाजांनी सुरुवातीला टिच्चून मारा केला. मोहम्मद सैफुद्दिनने गेलला भोपळाही फोडू दिला नाही. गेलने १३ चेंडूंचा सामना केला. यासह गेलने वनडे क्रिकेटमध्ये ‘भोपळ्यांचे पावशतक’ पूर्ण केले. एविन लुईस व शेय होप यांनी यानंतर डाव सावरला. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी रचली. लुईसने आपले चौथे वनडे अर्धशतक लगावले. पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ६७ चेंडूत ७० धावा करून तो बाद झाला. चौथ्या स्थानावर आलेल्या निकोलस पूरनने काही नेत्रदीपक फटके खेळले. मोठी खेळी करण्याच्या तयारीत असताना शाकिब अल हसनने त्याचा काटा काढला.

त्याने २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० चेंडूत २५ धावा जमवल्या. शिमरॉन हेटमायरने मात्र होपला चांगली साथ दिली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले. २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने ५० धावा केल्या. त्याचे हे तिसरे वनडे अर्धशतक ठरले. एका टोकाने सातत्याने गडी बाद होत असताना शेय होपने मात्र एक बाजू लावून धरली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. मुस्तफिझुरने एकाच षटकात हेटमायर व आंद्रे रसेल (०) यांना बाद करत विंडीजच्या धावगतीला ब्रेक लगावण्याचा प्रयत्न केला. परंतु, यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. कर्णधार जेसन होल्डर याच्या साथीने होपने डाव पुढे नेला. होल्डरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. होल्डरने केवळ १५ चेंडूंत ३३ धावा चोपल्या. शेय होपचे शतक मात्र केवळ ४ धावांनी हुकले. १२१ चेंडूत ९६ धावांची संयमी खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. डॅरेन ब्राव्होने अखेरच्या टप्प्यात २ षटकारांच्या सहाय्याने १९ धावा केल्या. बांगलादेशकडून सैफुद्दिन आणि मुस्तफिझुरने प्रत्येकी ३ तर शाकिब अल हसनने २ गडी बाद केले. विंडीज व बांगलादेशने या सामन्यासाठी प्रत्येकी एक बदल केला. विंडीजने अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटला वगळून स्पेशलिस्ट फलंदाज डॅरेन ब्राव्होला खेळविली तर बांगलादेशने मोहम्मद मिथुनच्या जागी लिटन दासला संधी दिली.

शिमरॉन हेटमायर बनला हजारी
विंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेटमायरने याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काल एक हजार धावा पूर्ण केल्या. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत ३४वी धाव घेत त्याने हजार धावा पूर्ण केल्या. विंडीजकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांत हजार धावा पूर्ण करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानाववर आहे. हेटमायरने २८ धावांत हजार धावांचा टप्पा ओलांडला. हेटमायरच्या नावावर ३० सामन्यांत ४०.६४च्या सरासरीने १०१६ धावांची नोंद झाली आहे. विंडीज खेळाडूंमध्ये व्हिव रिचडर्‌‌स यांनी सर्वांत कमी २१ डावांत हजार धावा पूर्ण केल्या होत्या. यानंतर गॉर्डन ग्रीनीज (२३) व रामनरेश सारवान (२७) यांचा क्रमांक लागतो.

धावफलक
वेस्ट इंडीज ः ख्रिस गेल झे. रहीम गो. सैफुद्दिन ०, इविन लुईस झे. सब्बीर गो. शाकिब ७०, शेय होप झे. दास गो. मुस्तफिझुर ९६, निकोलस पूरन झे. सरकार गो. शाकिब २५, शिमरॉन हेटमायर झे. तमिम गो. मुस्तफिझुुर ५०, आंद्रे रसेल झे. रहीम गो. मुस्तफिझुर ०, जेसन होल्डर झे. महमुदुल्ला गो. सैफुद्दिन ३३, डॅरेन ब्राव्हो त्रि. गो. सैफुद्दिन १९, ओशेन थॉमस नाबाद ६, अवांतर २२, एकूण ५० षटकांत ८ बाद ३२१
गोलंदाजी ः मश्रफी मोर्तझा ८-१-३७-०, मोहम्मद सैफुद्दिन १०-१-७२-३, मुस्तफिझुर रहमान ९-०-५९-३, मेहदी हसन मिराझ ९-०-५७-०, मोसद्देक हुसेन ६-०-३६-०, शाकिब अल हसन ८-०-५४-२

बांगलादेश ः तमिम इक्बाल धावबाद ४८, सौम्य सरकार झे. गेल गो. रसेल २९, शाकिब अल हसन नाबाद १२४ (९९ चेंडू, १६ चौकार), मुश्फिकुर रहीम झे. होप गो. थॉमस १, लिटन दास नाबाद ९४ (६९ चेंडू, ८ चौकार, ४ षटकार), अवांतर २६, एकूण ४१.३ षटकांत ३ बाद ३२२
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल १०-०-६५-०, जेसन होल्डर ९-०-६२-०, आंद्रे रसेल ६-०-४२-१, शेन्नन गेब्रियल ८.३-०-७८-०, ओशेन थॉमस ६-०-५२-१, ख्रिस गेल २-०-२२-०.

विक्रमवीर शाकिब अल हसन
बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याने काल वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद शतक ठोकताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो तमिम इक्बालनंतरचा केवळ दुसरा बांगलादेशी खेळाडू आहे. क्रिकेटच्या या प्रकारात सहा हजार धावा व २५० पेक्षा जास्त बळी घेणारा तो केवळ चौथा क्रिकेटपटू आहे. या यादीत सनथ जयसूर्या (श्रीलंका), जॅक कॅलिस (द. आफ्रिका) व शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) यांचा समावेश आहे.