ब्रेकिंग न्यूज़

बहुरूपी ‘प्रेरणा’

  • प्रदीप गो. मसुरकर
    (मुख्याध्यापक, स.हायस्कूल)
    नामोशी गिरी

प्रेरणा मनुष्याच्या जीवनात जादू घडवून आणते. चमत्कार घडू शकतो. पण प्रेरणा देणारी शक्ती तितकीच योग्य असावी लागते. त्या व्यक्तिजवळ तशीच पात्रता असावी लागते. मुलांना प्रेरित करणे हे शिक्षकाच्या हाती जास्त असते.

मुलांकडे जर घरातून व शाळेतूनही दुर्लक्ष झाल्यास समस्या निर्माण होतात. आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यास, घरात नवीन व्यक्तीचा जन्म झाल्यास व प्रेम देणारी व्यक्ती दुरावल्यास मुले भावनावश होतात. त्यांच्या समस्या समजून घेणे फार गरजेचे असते. त्यात शिक्षकांच्या प्रेरणेचा मोलाचा उपयोग होतो.

तेलाचा दिवा पेटविण्यासाठी आम्हाला तेल, वात व पणतीची गरज भासते. इतके असूनही आम्ही तो कशाच्या सहाय्याने पेटवतो? आपले उत्तर असेल- काड्यापेटीच्या सहाय्याने आम्ही दिवा पेटवतो. बरोबर. अगदी बरोबर. आता आम्ही सर्व साहित्य जमा केले. मग तो दिवा पेटविण्यासाठी कोणीतरी पेटवणारा हवा आणि त्याला तशी बुद्धी व्हावयास पाहिजे. तशाच प्रकारची घटना नेहमीच्या अध्ययनप्रक्रियेत होते.
विद्यार्थी म्हणजे दिवा, तेल म्हणजे अनुभव- ज्ञान- कौशल्य आणि काडेपेटी म्हणजे शाळा- पर्यावरण. ज्ञान देण्याचे काम करणारा, म्हणजे ज्ञानाची ज्योत पेटवणारा तो शिक्षकच होय, गुरूच होय.
एका अभंगात असे म्हटले आहे….

* वेद शास्त्रे पुराणादिक | आणिक संत सनकादिक |
गुरुविण गती नाही म्हणती | सकळीक ॥

आमच्या जीवनाला गती देण्याचे कार्य गुरुरूपी शिक्षक करत असतात. त्यांच्याकडून योग्य ती प्रेरणा मिळाल्यावरच शिष्यात बदल घडून येतो.
आजच्या परिस्थितीत आम्हाला मुलांच्या बाबतीत बर्‍याच तक्रारी ऐकावयास मिळतात. पालकांची नेहमी तक्रार असते- मुलं शिकत नाहीत, अभ्यासात लक्ष देत नाहीत. इकडे शाळेत शिक्षकांची तक्रार असते. शिकवताना मुलांचे अवधान नसते. गृहपाठ नीट करत नाहीत, परीक्षेत चांगली प्रगती नाही, अभ्यास खूप करायला हवा वगैरे, वगैरे.
काही पालकांची एक रड असते, ‘माझा मुलगा सकाळपासून पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसतो तरीसुद्धा नापास का होतो?’
काही तर म्हणतात, ‘माझ्या मुलाचे एकसारखे खेळाकडे लक्ष पण अभ्यास कर म्हटलं तर काहीतरी निमित्त काढतो.’

असा तक्रारमय स्वर मुलांच्या बाबतीत ऐकावयास मिळतो. याचाच अर्थ असा की आमची मुले योग्य प्रकारे प्रेरित झाली नाहीत. त्यांना योग्य प्रेरणा मिळाली नाही. आमचे कुठेतरी चुकते आहे का?
मग अशा परिस्थितीत आम्ही त्यांना कशाप्रकारे प्रेरणा देऊ शकतो??
सर्वप्रथम प्रेरणेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रेरणा ही आंतरिक स्थिती आहे. ते एकप्रकारचे आंतरिक बल आहे. हे बल आमच्या वर्तनातून योग्य ते प्रतिसाद देते किंवा योग्य ते वर्तन किंवा कृती घडवून आणते.
एडवर्ड थॉर्नडाइक या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने सज्जतेचा नियम (लॉ ऑफ रेडिनेस) किंवा तयारीचा नियम अध्ययनासाठी संबोधित केला आहे. यावरून प्रेरणेची कल्पना पुढे आली.
थॉनडाईकचा नियम ः- कोणतेही अध्ययन सुरू करताना त्या बालकाची शारीरिक व मानसिक तयारी हवी. मांजर जर भुकेले असेल तर ते दरवाजा उघडण्याचा जोरदार प्रयत्न करेल, असे थॉर्नडाईकला आपल्या प्रयोगात दिसून आले. मानसिक पूर्वतयारीने जिज्ञासा व उत्सुकता जागृत होते व यातून नवीन गोष्ट जाणून घेण्याची आंतरिक प्रेरणा मिळते.

* आपण पाठाची सुरुवात आकर्षक प्रस्तावनेने केली तर मुलांची ज्ञान घेण्याची मानसिक तयारी होते.
प्रेरणा ही भावनेची थोरली बहीण मानली जाते. ती सर्व जीवनाची तपश्‍चर्या असते. स्वामी विवेकानंदांची आंतरिक स्थिती जाणून गुरूवर्य रामकृष्ण परमहंसांनी असे काय मार्गदर्शन केले की त्यांची ज्ञानज्योत पेटली व त्याचा असाकाही परिणाम झाला की याच स्वामी विवेकानंदांनी प्रेरित होऊन जगभर हिंदू धर्माचे व मानवतेचे श्रेष्ठत्व दाखवले व अमेरिकेतल्या लोकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे कलकत्त्याच्या झोपडपट्टीत दुःखी, अपंग, आजारी बालकांची आयुष्यभर सेवा करणार्‍या मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक मिळाले. पण त्यांनी हे बक्षिसासाठी केले नव्हते. ही आंतरिक प्रेरणा त्या बक्षिसाने समाधान पावत नसते. त्यांचे जवळचे सहकारी एकदा म्हणाले होते, ‘नोबेलपेक्षा मोठं पारितोषिक तेरेसा बाईंना आधीच मिळालं आहे’. मदर तेरेसा ही स्वयंप्रेरणेची निर्माती होय.
प्रत्येक घरात आई आपल्या मुलासाठी धडपडत असते. आपल्याला कितीही कष्ट पडले तरी बक्षिसाची अपेक्षा न करता ती सर्व करीत असते. तेथे तिची आंतरिक स्थिती तिला स्वस्थ बसू देत नाही.

काही प्राण्यांचे वर्तनही आम्हाला स्वयंप्रेरणेचे दर्शन घडविते. मांजरीने जन्माला घातलेल्या पिल्लांची काळजी मांजर स्वतःच घेत असते. ती दोन-तीन ठिकाणी जागा बदलते. आपल्या शेपटीबरोबर त्यांना खेळवते; बाहेर नेते; खावयास देते. तेथेसुद्धा तिची आंतरिक स्थिती कार्य करते.
त्याचप्रमाणे चिमणी, कोंबडी, कुत्रा अशा अनेक पक्षांमध्ये व प्राण्यांमध्ये आंतरिक स्थिती जाणवते. ती कार्य करीत असते आणि आम्हाला वर्तनाच्या स्वरूपात दिसून येते.
काही मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणेसंबंधी दिलेल्या व्याख्या….
वुडवर्थ ः ‘प्रेरणा ही एक अशी स्थिती आहे जी एका विशिष्ट ध्येयाकडे नेणारे वर्तन दाखवते.’
जॉन्‌सन् ः ‘प्रेरणा ही आमच्या सर्व सामान्य कृतींस वाव देते आणि मनुष्याला वर्तनास दिशा दाखवते’.

मॅक डोगल ः ‘प्रेरणा म्हणजे मनुष्यामधील व इतर सजीवातील शारीरिक व मानसिक स्थिती आहे, जी आम्हाला निरनिराळ्या प्रकारे वागण्यासाठी प्रेरित करते.’
रमेश ह्या इयत्ता ७वीमधील विद्यार्थ्यावर त्याच्या शिक्षकांच्या शिकविण्यामुळे, आचरणामुळे त्याच्या आंतरिक स्थितीवर चांगला परिणाम झाला. अभ्यासाला बस, म्हणून सांगायची पाळी पालकांवर आली नाही. तो मन लावून अभ्यास करतो. वर्गातही त्याचे चांगले लक्ष असते. या उदाहरणात शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, शिक्षकांचे आचरण, बोलणे, वागणे प्रेरक ठरले. त्या मुलाची शिक्षणाबद्दलची आत्मियता वाढली, विश्‍वास वाढला. त्याच्या विचारात योग्य बदल झाला, त्याला आपले ध्येय दिसू लागले व तो स्वयंप्रेरित झाला. त्याला प्रेरणा देण्याचे सगळे श्रेय शिक्षकास जाते. त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याची स्थिती ओळखून त्याला वाव दिला व ती जागा केली.
पालकांनी किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, कुवत, शिकविण्याची वेळ लक्षात घेऊन योग्य शैक्षणिक साधने समाविष्ट करून विद्यार्थ्यांनासुद्धा सहभागी करून घ्यावे. त्याचबरोबर त्यांना नीट ऐकण्याची, विचारण्याची, कृती करून पाहण्याची संधी अवश्य द्यावी. कारण यातूनही मुलांना योग्य प्रेरणा मिळू शकते.

पिसुर्लेसारख्या खेड्यात, सत्तरी तालुक्यातील शाळेत शिकवत असतानाचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. १९९५-९६ मध्ये मुळगावहून माझी बदली पिसुर्ले सरकारी हायस्कूलमध्ये झाली. मी त्यावेळी विज्ञान व गणित हे विषय शिकवीत असे. इयत्ता ९वीतील एक विद्यार्थी नापास होऊन पुन्हा त्याच वर्गात राहिला होता. माझ्या विषयाचे तास सुरू असताना तो अगदी मन लावून ऐकत असे. मला प्रश्‍न पडला, हा मुलगा ९वीत नापास कसा झाला?… त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास केल्यानंतर समजले की त्याचा इंग्रजी विषय कच्चा आहे. गणिताच्या संकल्पना स्पष्ट झाल्या नव्हत्या व त्याच्याकडे कुणी जातीने लक्ष दिले नव्हते. त्याची ग्रहण क्षमता सर्वसामान्य होती. च्यारी कुटुंबातील होता. च्यारी कुटुंबातील मुलांमध्ये उपजत कौशल्य असते किंवा त्यांच्या घरचा असा काही व्यवसाय असल्याने अनुकरणाने ते कौशल्य आत्मसात करतात. त्यांच्या घरी लोखंडापासून अनेक वस्तू बनविण्याचे काम चालायचे. उदा. कोयता, बैलगाडीला लागणारे लोखंडी चाक वगैरे. मी त्याला एक दिवस त्याच्या घरच्या व्यवसायाबद्दल प्रवृत्त केले. त्याला घरातून भाता आणण्यास सांगितला. एक विशिष्ट अशी रचना सांगितली व ते ठेवण्यासाठी एक खुर्ची, वरच्या बाजूस एक स्क्रू वेल्डिंग करून बसविण्यास सांगितले व खालून हँडल फिरविण्याची सोय केली. वरच्या बाजूस ‘सुमीत’ मिक्सरचे भांडे बसविण्याची सोय करून बहुउद्देशीय मशीन तयार केली. (मल्टीपर्पज मशीन).
या यंत्राच्या सहाय्याने फळांचा रस काढणे, खोबरे वाटणे, ताक चाळणे इ. कामे सहज करता येतात. त्याशिवाय त्यावरचे भांडे काढून दुसरे लोखंडी चाक बसवून लाकूड व थर्माकोल कापण्याची सोय केली होती.

शिक्षक या नात्याने मी त्यास उत्तेजन दिले व त्याच्याबरोबर आणखी एका विद्यार्थ्याला घेतलं ज्याची इंग्रजी व बोली भाषा चांगली आहे. या दोन मुलांना घेऊन मी हा प्रकल्प घेऊन राज्य पातळीवर भरलेल्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला. विद्युत ऊर्जेशिवाय केलेल्या या प्रकल्पास राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला व त्याची निवड मुंबईस भरणार्‍या पश्‍चिम भारतीय विज्ञान प्रदर्शनात झाली. येथे पाच राज्यांचे प्रतिस्पर्धी समाविष्ट झालेले होते. तेथेही या प्रकल्पाला दुसरा क्रमांक मिळाला व त्यानंतर हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर निवडण्यात आला. त्याच मुलाबरोबर हा प्रकल्प घेऊन मी गुरगाव (दिल्ली) येथे सादर केला व याची निवड पुन्हा अखिल भारतीय विज्ञान प्रदर्शनात पहिल्या क्रमांकाने झाली.

हे सर्व करत असताना या मुलाच्या वर्तनात चांगला बदल घडून आला. इतर मुलांचे अनुकरण करून शब्दांचे उच्चारण योग्य रीतीने करावयास शिकला. शिक्षणाची आवड निर्माण झाली. अभ्यासात मन रमू लागले, वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ लागला व पहिल्याच खेपेस एस.एस.सी. पास झाला.

ही किमया त्याची आवड व कौशल्ये लक्षात घेतल्यामुळे झाली व त्या मुलाने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला व आता तो जीवनात स्थिर व आनंदी आहे.
प्रेरणा मनुष्याच्या जीवनात जादू घडवून आणते. चमत्कार घडू शकतो. पण प्रेरणा देणारी शक्ती तितकीच योग्य असावी लागते. त्या व्यक्तिजवळ तशीच पात्रता असावी लागते.
मुलांना प्रेरित करणे हे शिक्षकाच्या हाती जास्त असते. प्रेरणेमागचा मुख्य उद्देश मुलांचे अवधान खेचून घेऊन त्याच्या ज्ञानामध्ये, कौशल्यामध्ये भर घालणे हा आहे व त्याला त्यांच्या ध्येयाकडे योग्य रितीने वाटचाल करावयास मार्गदर्शन करणे हे आहे. मुले कोणत्या वयोगटाची आहेत, त्यांची परिपक्वता, बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी युक्ती-प्रयुक्तीने काही काही शैक्षणिक साधनांचा वापर करून त्यांना प्रेरित केले पाहिजे.

* १ली ते ४थीच्या मुलांचे अवधान खेचून घेण्यासाठी पाठाची प्रस्तावना आकर्षक करण्यासाठी योग्य चित्रांचा वापर, कृतींचा समावेश, गोष्टी- हावभाव- हालचाली यांचा वापर करावा. त्याशिवाय योग्य प्रबलन देणे आवश्यक आहे जसे- ‘‘तू गुणी आहेस, ‘शाब्बास, चांगला, उत्तम, फार छान, स्टार चिन्हांचा वापर करणे, पाठीवर हात ठेवणे इ.’’

* क्रिया जरी सोप्या असल्या तरी शिक्षकही तसाच मुलांमध्ये अभिरुची घेणारा व विद्यार्थ्यांना समजून घेणारा असावा. आपल्या मुलांप्रमाणेच शाळेतील मुलांवरही प्रेम करणारा असावा. एकदा मुलांना शिक्षक मनापासून आवडू लागला की त्याच्या प्रत्येक गोष्टी विद्यार्थी टीपकागदाप्रमाणे टिपून घेतात व आपल्या घरी जाऊन शाळेत घडलेल्या सर्व गोष्टींचा अहवाल देतात.

* मोठ्या मुलांना खेळामध्ये सहभागी करून घेता येते. शिकवताना एखाद्या कृतीमध्ये सहभागी करून घेता येते. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी असेल तर मुलांचे अवधान खेचून घेता येते. त्यात शिक्षक यशस्वी होतो.
सर आयझॅक न्यूटन यांनी गतीविषयक तीन नियम सांगितले आहेत. त्यापैकी पहिला व तिसरा नियम येथे लागू पडतो.
– एखादी वस्तू स्थिर असेल किंवा एकसमान गतीमध्ये असेल तर तो पदार्थ किंवा वस्तू त्याच अवस्थेत राहील जोवर बाह्य बलाची क्रिया होत नाही. मुलांची आंतरिक शक्ती जागविण्यासाठी शिक्षकाचे बाह्यबल जरुरीचे आहे.
– न्यूटनचा तिसरा नियम सांगतो- क्रिया, बल व प्रतिक्रिया परस्परांशी समान असतात. शिक्षक व पालक मुलांशी जसे वागतात तसाच प्रतिसाद आम्हाला मुलांकडून मिळतो. तुम्ही मुलांना धीर दिला, प्रोत्साहन दिले, प्रबलन दिले त्याप्रमाणे तुम्हाला प्रतिसाद मिळतो हे शिक्षकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

* वर्गात मुलांमध्ये व्यक्तिभेद असतो. काही मुले सामान्य बुद्धिमत्तेची तर काही सामान्यांपेक्षा जास्त, काही कुशाग्र तर काही अलौकिक बुद्धिमत्तेची असतात. काहींची ग्रहण क्षमता कमी असते. त्यांच्या शरीराची वाढ, उंची, वजन, अवधान क्षमता, बद्धिमत्ता वेगवेगळी असते. घरातील परिस्थितीही त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणते. हा व्यक्तिभेद प्रामुख्याने अनुवंश व वातावरणावर अवलंबून असतो आणि त्याच्या, गुणाकाराच्या परिणामामधून दिसून येतो.
हा व्यक्तिभेद शिक्षकांनी लक्षात घेऊन पाठाचे योग्य नियोजन करणे आवश्यक. वर्गात शिकवत असताना सर्व प्रकारची मुले असल्याने सर्वांना अनुकूल अशी अध्ययन पद्धत वापरणे उपयोगी ठरते. यासाठी जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांना वापर करून शिकवणे (मल्टीसेन्सरी टेक्निक) उचित व परिणामकारक ठरते. त्यामुळे पाठाची संकल्पना स्पष्ट होते.

कोणतीही संकल्पना एकदा का स्पष्ट झाली की मुले ती आपापल्या परीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये अभिरूचि निर्माण होते व मुलांची प्रगती आपोआप घडत जाते.
* वर्गात शिकविताना मुलांना त्यांच्या नावाने हाक मारणे, आठवडाभराचे नियोजन करून देणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलाला शिक्षकाचे प्रेम हवे असते. ती त्यांची गरज असते ती भागवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रेरणा दिल्यासारखे होईल.
प्रेरणेपूर्वी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे मुलांच्या समस्या. मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

एखादा विषय कळत नसेल किंवा घरची परिस्थिती, वातावरण तणावपूर्ण दिसून येते. घरातून व शाळेतूनही दुर्लक्ष झाल्यास समस्या निर्माण होतात. आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यास, घरात नवीन व्यक्तीचा जन्म झाल्यास व प्रेम देणारी व्यक्ती दुरावल्यास मुले भावनावश होतात. त्याच्या समस्या समजून घेणे फार गरजेचे असते. त्यात शिक्षकांच्या प्रेरणेचा मोलाचा उपयोग होतो.

शिक्षकांनी आपल्या परीने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा व त्यांची समस्या सोडवण्याचा निदान प्रयत्न तरी करावा. हीसुद्धा फार मोठी प्रेरणा ठरेल.
आजची परिस्थिती वेगळी आहे. धकाधकीचे जीवन, नोकरी करणारे पालक, आई-बाबांचे प्रेम व अवधान विद्यार्थ्याला नीट न मिळाल्यास समस्या निर्माण होतात. त्याला पर्याय फक्त शिक्षकच होऊ शकतो.

आज कित्येक मुले वाईट मार्गाला, वाईट संगतीला लागली आहेत. कारण फक्त एकच- योग्य वेळी योग्य अवधान न दिल्यामुळे! मोठी झाल्यावर ती आईबाबांना जुमानत नाहीत, पाहिजे तसे बोलतात. पाहिजे तसे वागतात. अयोग्य वर्तन करतात. या सगळ्याचा परिणाम अध्ययनावर होतो. अशा मुलांना योग्य मार्गदर्शक, तज्ज्ञ व्यक्तींकडून समुपदेशनाची गरज असते. तसेच दहावी पास झालेल्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. पुढे शैक्षणिक क्षेत्र निवडण्यासाठी, योग्य व्यवसाय निवडण्यासाठी करिअर गायडन्स फार उपयुक्त ठरते.
अशा मुलांची क्षमता तपासून त्यांना योग्य शैक्षणिक दिशा दाखवणे व त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे हीसुद्धा एक प्रेरणाच ठरते.

चांगल्या सवयी मुलांची आंतरिक स्थिती बदलू शकतात. त्यांना त्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. चांगल्या सवयींचे महत्त्व कृतीने, आचरणाने, गोष्टीरूपात मुलांना पटवून देणे आवश्यक आहे. सवय आपल्याला सरावाने लागते. त्यासाठी विद्यार्थ्याकडून काही गोष्टींचा सराव करून घेणे गरजेचे आहे. चांगल्या सवयीसुद्धा मनुष्याला यशाच्या शिखरावर पोचवतात. यासाठी शिस्तीचे, वेळेचे महत्त्व पटवून देणे हीसुद्धा एक प्रकारची प्रेरणाच! इतके केल्यास प्रेरणेचे मूळ उद्दिष्ट साध्य होईल.

सांदिपनी ऋषींनी श्रीकृष्णास प्रेरित केले
कृष्णाने युद्धात अर्जुनास प्रेरित केले
श्रीकृष्णाने सुदामाचा उद्धार केला
हाच कृष्ण मुलांच्या रुपाने आपल्यासमोर बसला आहे. त्याला गरज आहे तुमच्या प्रेमाची, प्रबलनांची, चांगल्या आचरणाची. मग हाच कृष्ण जग बदलण्यास कारणीभूत ठरेल. हीच खरी आपली प्रेरणा ठरेल.
चला तर मग आम्ही आमच्या मुलांना समजून घेऊया.