बलात्कारप्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी जाहीर

>> ३० रोजी शिक्षा सुनावणार

विविध आरोपांखाली सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याला काल येथील सत्र न्यायालयाने बलात्कारप्रकरणी दोषी असल्याचा निवाडा दिला. त्याला दि. ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एका भाविक महिलेने नारायण साई याच्याविरुद्ध २०१३ साली बलात्काराची तक्रार दाखल केली होती. सूरत पोलिसांनी आरोपींवर २०१४ साली ११०० पानांचे आरोपपत्र सादर केले होते. ४७ वर्षीय नारायण साई याला २०१३ सालीच अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने याप्रकरणी दोन महिलांसह त्याच्या चार सहकार्‍यांनाही विविध आरोपांखाली दोषी ठरविले आहे. त्यांच्यावर भा. दं. संहितेतील कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक गुन्हे), ३२३ (मारहाण), ५०६-३ (गुन्हेगारी धमकी) अशी कलमे लावण्यात आली आहेत. ११ आरोपींपैकी ६ जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. गढवी ३० एप्रिल रोजी सर्व आरोपींना शिक्षा सुनावणार आहेत. याप्रकरणी आरोपीस किमान १० वर्षे तुरुंगवास व कमाल जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. या प्रकरणीच्या कटात नारायण साईचे साथीदार धर्मिष्ठा उर्फ गंगा, भावना उर्फ जमुना आणि पवन सामील असल्याचे सिद्ध झाले आहे.