ब्रेकिंग न्यूज़

बंद पाडलेले मोपाचे काम पुन्हा आजगावकरांच्या उपस्थितीतच सुरू

पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी गेल्या शनिवारी सुमारे २०० समर्थकांसह मोर्चा नेऊन बंद पाडलेले मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जीएमआर कंपनीचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काल पुन्हा एकदा रितसर विधीवत सुरू करण्यात आले. यावेळी मंत्री आजगावकर हेही उपस्थित होते.

यावेळी जीएमआर कंपनीचे मुख्याधिकारी आर. व्ही. शेषन, कंपनीचे एक अधिकारी मिलिंद पैदरकर, माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू, वारखंडचे सरपंच मंदार परब, कोरगाव पंच सदस्य रंगनाथ कलशावकर, स्थानिक पंच प्रदीप कांबळी, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष पांडुरंग परब, कोरगावचे पंच कुस्तान कुयालो, सुशांत मांद्रेकर व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री आजगावकर यांनी सांगितले की, जीएमआर कंपनीचे संचालक तथा मुख्य अधिकारी शेषन यांच्याबरोबर काल महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्यांना प्राधान्याने नोकरी, ज्या गावांना या आंतरराष्ट्रीय विमानतळाची झळ पोचली त्या गावातील लोकांच्या समस्या त्यांचे प्रश्‍न त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या अधिकार्‍यांवर विश्‍वास ठेऊन कालपासून कामाला सुरुवात करण्यात आली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी पुन्हा विश्‍वासघात केला तर हे आंदोलन पुन्हा छेडले जाईल. एवढंच नव्हे तर महिन्या भरामध्ये जे काम झाले त्याची माहिती स्थानिक आमदाराला देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक होऊन जी कामे झाली आणि पुढे होणार यावर सखोल चर्चा केली जाईल. सुरवातीला वीस कामगार घेतले जातील व टप्प्या-टप्प्याने ही संख्या वाढणार आहे. सुरवातीला गावातील लोकांना प्राधान्य, नंतर बाजुच्या गावांना प्राधान्य, नंतर तालुक्याला प्राधान्य व नंतरच उत्तर जिल्ह्याला प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.