बंदी असतानाही कोरोना रुग्णांची नावे व्हायरल

 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नावे उघड करण्यावर बंदी असतानाच काल कथित संसर्ग झालेल्या दोघा रुग्णांची नावे समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. त्यात सांगे येथील आरोग्य केंद्रात काम करणारा एक कर्मचारी व मडगांव येथे राहणारा एक कर्मचारी यांचा समावेश होता.

सांगे येथील आरोग्य केंद्रात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्तला सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनीही समाजमाध्यमावरुन दुजोरा दिलेला असला तरी त्यांनी त्या कर्मचार्‍याचे नाव मात्र उघड केलेले नाही.

दरम्यान, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही मडगाव येथे राहणार्‍या व आरोग्य केंद्रात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांनीही सदर कर्मचार्‍यांचे नाव उघड केलेले नाही. लोकांनी विनाकारण घाबरू नये. सामाजिक अंतराचे तत्त्व पाळावे. बाहेर पडताना मास्क घालावे, असे आवाहन त्यांनी केले.