बंडखोरांविरुद्ध अपात्रता याचिका सादर करणार

>> चेल्लाकुमार : बाबुशना उमेदवारी घोडचूक

पणजी पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेर्रात यांना कॉंग्रेसची उमेदवारी देऊन फार मोठी चूक केली. त्यांनी दोन महिन्यांत कॉंग्रेस विधिमंडळ गटात उभी फूट घातली. भाजपात गेलेल्या १० बंडखोर आमदारांविरुद्ध कॉंग्रेस सभापतींकडे तसेच उच्च न्यायालयात अपात्रता याचिका सादर करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी काल येथे सांगितले. कॉंग्रेसच्या १० आमदारांनी वेगळा गट करून विधिमंडळ पक्षच भाजपामध्ये विलीन केल्याच्या पार्श्‍वभूमीवर चेल्लाकुमार तातडीने गोव्यात दाखल झाले. त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ आमदार माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत यांची भेट घेऊन राजकीय स्थितीवर चर्चा केली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फोडाफोडीचे सूत्रधार आमदार बाबुश मोन्सेर्रात हेच असल्याचा आरोप केला. कॉंग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्वधर्मजातीच्या लोकांचा विश्‍वास आहे. कॉंग्रेस पक्षाला धोरण व तत्त्वे आहेत. त्या तत्त्वाची पायमल्ली करून गद्दारी केलेल्यांना जनताच शिक्षा देईल. भाजपा ‘मनी पावर’ने कॉंग्रेस आमदारांना आमिषाचे बळी दाखवून बळी घेतला असे चेल्लाकुमार यांनी सांगितले.
विधानसभा अधिवेशन येत्या आठवड्यात सुरू होणार असून विधिमंडळ पक्षनेत्याची त्याआधी निवड करण्यात येईल असे चेल्लाकुमार यांनी सांगितले.