फ्रान्स-स्वित्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ला सुवर्ण मयुर

फ्रान्स-स्वित्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ला सुवर्ण मयुर

>> ‘जल्लीकडू’ला रौप्य मयुर, सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा शानदार समारोप
पुढील वर्ष हे जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे २०२० सालचा इफ्फी हा त्यांना समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी काल इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सांगितले. सत्यजीत रे हे  एक महान चित्रपट दिग्दर्शक होते असे सांगून ५१ वा इफ्फी हा त्यांना समर्पित करतानाच त्यांच्या चित्रपटांना या महोत्सवात स्थान देण्यात येणार असल्याचे खरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, इफ्फीतील उत्कृष्ट चित्रपटासाठी असलेला सुवर्ण मयुर पुरस्कार ‘पार्टिकल्स’ (फ्रान्स, स्वित्झर्लंड) या ब्लेझ हेरिसन दिग्दर्शित ९८ मिनिटांच्या चित्रपटाला प्राप्त झाला. सुवर्ण मयुर व ४० लाख रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख रक्कम निर्माता एस्टेल फियालोन व दिग्दर्शक ब्लेझ हेरिसन यांना प्रत्येकी २० लाख रु. अशी विभागून देण्यात येणार आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी असलेला रौप्य मयुर व रोख १५ लाख रु. या पुरस्कार ‘जल्लीकट्टू’ या लिजो ज्योस पेल्लीसरी दिग्दर्शित ९१ मिनिटांच्या मल्याळम चित्रपटाला मिळाला.
१२ हजारांवर प्रतिनिधी
दरम्यान, खरे पुढे म्हणाले, की यंदाचा इफ्फी हा सुवर्ण महोत्सवी असल्याने यंदा प्रतिनिधींचा आकडाही १२ हजारांवर होता. यंदा सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्त चित्रपटांसाठीचे नवे विभागही सुरू करण्यात आले होते, ५१ वा इफ्फी यापेक्षाही थाटात साजरा करण्याचे आश्‍वासन देतानाच जगभरातून इफ्फीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे व चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे खरे यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना इफ्फीसाठीच्या साधनसुविधांत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे गोवा हे चित्रपट निर्मितीसाठीचे एक महत्त्वाचे केंद्र करण्याचे स्वप्न होते व त्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी, इफ्फी हे चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठीचे एक मोठे व्यासपीठ असल्याचे सांगितले. गोवा हे इफ्फीचे कायम स्थळ तर आहेच. शिवाय ते इफ्फीसाठीचे योग्य असेच स्थळ असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. यंदाच्या इफ्फीत जगभरातील ५० महिला दिग्दर्शकांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाल्याचेही ते म्हणाले.
गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा म्हणाले की, इफ्फीतील चित्रपट पाहण्यासाठी तब्बल ९३ हजार एवढी तिकिटे काढण्यात आली. इफ्फीसाठी विविध ४० देशांतून प्रतिनिधी आले होते असेही त्यांनी सांगितले. इफ्फीतील प्रतिनिधींचा सर्वांत जास्त आकडा गोव्यातील लोकांचा व त्यापाठोपाठ केरळमधील लोकांचा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अमूल्य असे योगदान देणारे दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक इल्लीया राजा, खलनायक प्रेम चोप्रा, दिग्दर्शिका मंजू बोरा, अभिनेता स्वामी व हनुबम पवनकुमार यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो व गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक हे समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. सूत्रसंचालन मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता कुणाल कपूर यांनी केले.
राज्यपालांचे मनोगत
राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी समारोप सोहळ्यात बोलताना आपण काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करीत असतानाचे अनुभव सांगितले. काश्मीरमधील ३६० कलम रद्द करून टाकण्यापूर्वी तेथील स्थिती स्फोटक होती. मात्र, ३६० कलम रद्द केल्यापासून तेथे एकही हत्या झाली नसल्याचा दावा केला. भारतातील गर्भश्रीमंताचा त्यांनी यावेळी बोलताना कुजलेले बटाटे असा उल्लेख केला. हे गर्भश्रीमंत लोक करोडो रु. च्या बहुमजली घरात राहतात. त्यांच्या कुत्र्यांसाठीही घरात वेगळा व खास असा मजला असतो. मात्र, धर्मादाय संस्था अथवा समाजसेवेसाठी हे गर्भश्रीमंत कुणाला एक पैसा देत नसल्याचे ते म्हणाले. सीमेवर शहीद होणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे. पण हे गर्भश्रीमंत कुणाला एक रुपयाही देत नसल्याचे पोटतिडकीने बोलताना राज्यपाल मलिक यांनी सांगितले.
पुरस्कार प्राप्त
चित्रपट व कलाकार
  •  उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार – पार्टिकल्स (दिग्दर्शक ब्लेझ हेरिसन). शिवाय ४० लाख रु. रोख रक्कम.
  • उत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयुर पुरस्कार – जल्लीकट्टू (मल्याळम) – दिग्दर्शक लिजो ज्योस पेल्लीसरी. रौप्य मयुर व १५ लाख रु.
  • उत्कृष्ट अभिनेता (पुरुष) – स्यू जोर्ज (चित्रपट मॅरिगेला) – १० लाख रु. रोख व रौप्य मयुर.
  • उत्कृष्ट अभिनेत्री – उषा जाधव – रौप्य मयुर व १० लाख रु.
  • उल्लेखनीय चित्रपट पुरस्कार – चित्रपट हेल्लारो (गुजराती) दिग्दर्शक अभिषेक शाह. रौप्य मयुर व रोख १५ लाख रु.
  • पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – चित्रपट मोन्सटर्स, दिग्दर्शक – मारियस ऑलटेन्यू. रौप्य मयूर व १० लाख रु. रोख.
  • विशेष ज्युरी पुरस्कार – चित्रपट बलून. रौप्य मयुर व १५ लाख रु.
  • आयसीएफटी युनेस्को गांधी शांती पदक पुरस्कार – चित्रपट रवांडा (इटली).
  • आयसीएफटी युनेस्को – उल्लेखनीय चित्रपट ‘बहत्तर हूँ रे’.