फ्रान्समधील राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

येथील उपनगरात असलेल्या भारताच्या राफेल पथकाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्प व्यवस्थापन पथकाचे हे पॅरिसमधील कार्यालय फ्रान्समध्ये सुरू असलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या उत्पादनाचे काम पाहते. तसेच हवाई दलाची एक प्रशिक्षण तुकडीही येथे आहे. या घटनेची माहिती हवाई दलाकडून दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाला दिली आहे.

पॅरीसमधील वरील कार्यालयातील तुकडीचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकार्‍याकडून केले जाते. भारत व फ्रान्स यांच्यात ३६ लढाऊ राफेल जेट विमान खरेदीसाठी करार झाला आहे. विरोधकांतर्फे भारतात या व्यवहाराविरोधात प्रचंड गदारोळ झाला आहे. या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.