फौजी व्हायचंय, पोलिस नाही

  • नीना नाईक

आता मी सुट्टीवर आलो होतो. मला मॅडमना सॅल्यूट मारायचा होता. खास त्यांच्यासाठी मी इथे आलो. कुणाच्याच पुढे इतका जबरदस्त सॅल्यूट मारला नसेल, तेवढा मी आदराने, मानाने आज नतमस्तक झालो.

केबिनचा दरवाजा उघडाच होता. मी पेपरचा गठ्ठा तपासत होते. बुटांचा ठाक् ठाक् असा जोरात आवाज आला. कुणाचीतरी दमदार पावलं केबिनच्या जवळपास असावीत असा भास झाला. मी फक्त मान वर केली. आर्मी गणवेशातील सडसडीच तरुण उभा होता. दरवाज्याबाहेरून त्याने विचारले, ‘‘मे आय् कम् इन् मॅडम?’’ मी किंचितसं हसून स्वागत केले. ‘या’ असे म्हणताच त्याने कडकडीत सॅल्यूट मला मारला. सॅल्यूटची अपेक्षा नव्हती. मी अवघडले. उठू – न उठू करत अर्धवटच उभी राहिले. शेक-हँड केला. कौतुकाने त्याच्याकडे पाहात सहज शब्द निघून गेले ‘‘जय हिंद’’. त्यांना बसायला सांगितले. फौजी हा माझा विकपॉईंट. चेहर्‍यावर कुठलेही भाव न ठेवता मी त्याला आमच्या शाळेत यायचे कारण विचारले. तो खळखळून हसला. मलाच वरती भूलभुलैय्यात घालून विचारले, ‘‘मला ओळखलं नाही?’’ मी बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिले. मानेनेच नकार दर्शविला. खजिल भावना होत्या. असेल विद्यार्थी जुना असा विचार आला. आयत्यावेळी त्यानं त्याचेच नाव विचारले तर पंचाईत नको ह्यासाठी मी खरेखुरे त्याला न ओळखल्याचे सांगितले.
‘‘मॅडम, मी तुम्हाला मध्येमध्ये फोन करतो. मी ट्रेनिंग पूर्ण केल्यावर बॉर्डरवर आहे हेही सांगितले’’. माझी प्रतिक्रिया झटकन् आली. ‘‘हो, ओळखलं. खूप खूप बदलला आहेस’’. मी बाकीच्या शिक्षकांना बोलवले. आदराने त्याला सर्व वर्ग दाखवले. मुलांनाही उत्साह वाटला. आपल्यासारखाच एक मित्र आर्मीत जाऊ शकतो ह्याचा अभिमान वाटला. त्याचे देखणे रूप, बॉडी, रूबाबदारपणा पाहून मुलांनी मला विचारलं, ‘‘मॅडम्, हा ओपनमध्ये कसा आला?’’ त्याच्याभोवती गराडा पडला होता. मुलं त्याच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करत होते. आम्ही ठरवले की त्यालाच चार शब्द बोलायला द्यायचे. आपलं मनोगत प्रकट करायला द्यायचे. आता सगळे हॉलमध्ये जमा झालेत.

तो उभा राहिला. आपलं नाव सांगितलं आणि दोन वर्षांपूर्वीच ह्या शाळेतून बाहेर पडलो ते कथित केले… ‘‘इथे ह्या शाळेत कसा पोहोचलो, हे फक्त मॅडमला ठाऊक आहे. आज मी सर्वांना सांगणार आहे. मी तसा हुशार होतो. आठवीपर्यंत फर्स्ट क्लास सोडला नव्हता. नववीत प्रवेश घेतला आणि वडील घरी आले तुणतुणं वाजवत, ‘तू दहावी झालास की पोलिसात भरती हो’. वडीलही पोलिसातच होते. माझ्या मागे चार भावंडे. परिस्थिती बेताचीच. मी पोलिसात भरती झालो की वडलांचा भार थोडा हलका होईल अशी त्यांची आशा होती. पोलिसात जाणे म्हणजे करप्शन- पैसा खाणे हे माझे समीकरण होते. माझ्या बालवयात कुठेतरी पोलिसांबद्दल घृणाच होती. हप्ता घेणारे, दादागिरी करणारे हे पोलिस हे डोक्यात ठाम होते. कॉलनीत पोलिसांचा वाहता असल्याने, त्यांच्याचबरोबर उठणे- बसणे झाल्याने मी डोळ्यादेखत पाहातच मोठा झालो होतो. वडील ज्या ज्यावेळी मला ‘पोलिस हो’ असं म्हणत त्यावेळी माझे डोळे भरून येत. वडलांना उलट सांगायची ताब नव्हती. आईसमोर सांगून रडून भेकडून उपयोग नव्हता. तिचं वडलांसमोर काहीच चालत नव्हतं. मी दिवसेन् दिवस उडाणटप्पू व्हायला लागलो. दहावी केली की मला पोलिसात भरती व्हावे लागेल ह्याची मी धास्ती घेतली. परिणाम नववीत नापास झालो. जाणून बुजून अभ्यास केला नाही. डोक्यात घातलेलं पोलिसाचं भूत माझ्यातून उतरत नव्हतं. एक वर्ष फुकट गेलं. दुसर्‍यावर्षी त्याच इयत्तेत बसायला लाज वाटत होती. आपल्याला काय करायचे आहे हे ठाऊक असूनही आपला पाय असाच ओढला जातोय ह्याचे दुःख होते.
वडिलांना ‘ओपन’चा शोध लागला. कुणीतरी त्यांच्या कानावर घातले की नववी नापास झाला तरी दहावी ओपन स्कूलमधून करता येते. स्वारींनी पुढचा-मागचा विचार न करता मला ह्या मॅडमच्या पुढे आणून ठेवला. जणुकाही ह्यांना बहालच केला. मी खरंतर त्रासलेलो होतो. नवीन आफत म्हणून यायला टाळत होतो. माझे वाढलेले केस, अवतार पाहून मॅडमने काही कमेंट केले नाहीत. फक्त माझ्या चेहर्‍यावरची नाराजी मात्र त्यांनी अचूक टिपली. त्यांनी आठवीचे गुणपत्र पाहिले. नववीचे पाहिले आणि वडिलांना रूमच्या बाहेर जायला सांगितले.

सर्वच अनपेक्षित होतं. मी गोंधळलो. त्यांनी मला समोर न बसवता त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसवले. शांतपणे माझ्याकडे पाहिले. मी पटकन् मान खाली घातली. आता त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि प्रश्‍न केला, ‘‘आठवीत तुला चांगले गुण आहेत. नववीत कुठे गुण उधळलेस? तुझ्या मनात काय आहे? स्पष्ट सांगितलंस तर मी तुला मदत करीन’’. द्विधा परिस्थिती होती. खांद्यावरचा हात कणखर होता. आत्मविश्‍वास देणारा वाटला. आता मी सरळ डोळ्यात डोळे घालून त्यांच्याकडे पाहिले. त्यांनीही नजर हलवली नाही. मी तोंडाला कुलुप लावले. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. ‘‘तुझ्या मनात गोंधळ उडालाय तो बोल.’’ खळकन् डोळ्यातून पाणी आले. आपलंसं असल्याचा भास झाला. मी ह्यांच्याशी बोलू शकतो, हे मनाला पटलं. ‘‘मला दहावी पास व्हायचे नाही’’, असंच वाक्य दोनदा उच्चारले. त्यांनी मला सांगितलं, ‘‘तू अत्यंत हुशार आहेस’’. मी पटकन् नकळत होकार देत हुंदका दिला. ‘‘तुला कसलातरी राग आलाय तो तू शिक्षणावर काढतो आहेस.’’ भविष्यवाणी झाल्यागत झाले. मी थिजलो. आई-वडीलांसमोर जे बोलू शकलो नाही ते मी मी त्यांना सत्य सांगितले. मला फौजी व्हायचंय, पोलिस नाही’’. त्या गालातल्या गालात हसल्या. मला म्हणाल्या, ‘‘आता कान लांब कर. प्रथम तुला दहावी पास करायची आहे आणि त्यानंतर फौजी की पोलिस ते ठरवायचं आहे. तू मला वचन दे की मी दहावी पास होणार’’. मी यंत्रवतपणे त्यांच्या हातावर हात ठेवला आणि सांगितले की ‘‘हो, मी वचनबद्ध आहे’’. त्या सहजपणे म्हणाल्या, ‘‘हे फौजीचे वचन आहे.’’ मी मागेपुढे विचार न करता त्यांच्या बोलण्यात वाहून गेलो.
वडलांना त्यांनी आत बोलावले. ऍडमिशन झाली. त्यांचे बारीक लक्ष माझ्यावर होते. मी अभ्यास करत होतो. महिन्याच्या शेवटी परीक्षा असे. त्यातही मी उत्तम मार्क मिळवायचो. परीक्षा संपल्या. रीझल्ट आला. मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आता परत मी मॅडमना भेटायला गेलो. वडलांनी पोलिस भरतीचा फॉर्म आणला होता. मी इवलंसं तोंड घेऊन त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझा अवतार पाहण्यासारखा होता. त्यांना भेटल्यावर त्यांनी त्यांच्याकडे दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. त्यांनी उजव्या साईडचा ड्रॉवर उघडला आणि मला फॉर्म भरायला दिला. ‘आता तयारीला लाग. दोन्हीकडचे फॉर्म भरायचेत. शारीरिक कसरतीवर मेहनत घे. पोलिसाच्या परिक्षेत धावणे महत्त्वाचे असते, शेवटपर्यंत धाव. थोडा रडीचा डाव खेळ. शेवटी शेवटी स्टॅमिना संपला म्हणून थांब. जमीनीवर पडून रहा. तुला ते नापास करतील’. अरेच्चा! इतकी साधी गोष्ट माझ्या डोक्यात का आली नाही. सेम ट्रीक बाबांना फसवत केली. आर्मीत सिलेक्शनला गेलो. पास झालो. बाबांना त्यांनी आणि मी कधी काहीच सांगितलं नाही. देशाच्या सेवेत मी रुजू झालो. ट्रेनिंग पूर्ण झाले. मॅडमला सांगितलं, ‘नेहमी हा गणवेश परिधान करताना त्यांनी सांगितलेली एकच गोष्ट आठवायची, मला तुझ्याकडून काहीच नको. एक सॅल्यूट हवा’.

ट्रेनिंग झाल्यावर गोव्यात आलो. मॅडमला भेटू शकलो नाही. मला बॉर्डरवर पाठवले. त्यावेळी मी त्यांना कळवलं. त्यानंतर केदारनाथला उचललेली प्रेतंही त्यांना कळवली. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘अभिमान आहे तुझा मला’. त्यावेळी त्यांचा आवाज कातरला होता. ‘स्वतःला सांभाळ. खूप चांगलं काम करत आहेस!’
मार्च महिन्यात माझ्या भावंडांना ओपनमध्ये घालण्यासाठी मीच आग्रह घरी केला. त्याप्रमाणे माझे भाऊ-बहीण त्यांच्याकडे शिकायला लागले. त्या नेहमी माझ्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी करत. आता मी सुट्टीवर आलो होतो. मला मॅडमना सॅल्यूट मारायचा होता. खास त्यांच्यासाठी मी इथे आलो. कुणाच्याच पुढे इतका जबरदस्त सॅल्यूट मारला नसेल, तेवढा मी आदराने, मानाने आज नतमस्तक झालो. मी बारावी ओपनमधूनच केली. परेडिंग होतं तिथेच परीक्षा दिली. ऍडमिशन यांच्या शाळेतून घेतली. मॅडम नोट्‌स पाठवत. आमच्या परिक्षेतही मी एकेक पायरी चढतोय’’.

मी अतिशय कडक शिक्षिका म्हणून शाळेत प्रख्यात होते. डोळ्यांच्या कडांवर आलेलं पाणी मी थोपवून ठेवलं. समारंभ आटोपला.
दोन-तीन वर्षांनी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मॅडम, माझ्या भावाला तुमच्याशी बोलायचं आहे. मी फोनवरच बोला म्हणाले. ‘‘मॅडम, मी पुण्यात आहे. माझ्या पायात गोळ्या गेल्यात. अनेक ठिकाणी शरीरातही गोळ्या आहेत. जखमी आहे, मी डगमगलो नाही. मला पुन्हा उभे राहायचे आहे. उपाय सांगा’’. मी सुन्न झाले. रक्षामंत्र्यांना आमच्या लेकराची कहाणी सांगितली. ‘याला परत देशाची सेवा करायची ताकद द्या’. त्यांचं आश्‍वासन घेतलं. पुण्याला तो सुधारला. वर्षभराने तो मला भेटला. त्याच जोशात, जोमात आपल्या लग्नाची पत्रिका देत म्हणाला, ‘‘मॅडम, आईवडील आहेत तरी पालक असणे किती महत्त्वाचे आहे हे मला तुमच्यामुळे कळलं. आशीर्वाद द्यायला यायचे बरं का!