ब्रेकिंग न्यूज़
फिल्म सिटी उभारण्यास सर्वतोपरी मदत : मुख्यमंत्री

फिल्म सिटी उभारण्यास सर्वतोपरी मदत : मुख्यमंत्री

>> गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन

‘फिल्म सिटी’ उभारणे हे काम सरकारचे नव्हे. मात्र, सर्वांना एकत्र आणून गोव्यात फिल्म सिटी उभारण्यास ‘विन्सन वर्ल्ड’ने पुढाकार घेतल्यास सरकार सर्वतोपरी मदत करील अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर केली.

विन्सन वर्ल्ड आयोजित व ‘इंडिका इशी’ प्रस्तुत या महोत्सवाला शानदार प्रारंभ झाला. यावेळी विशेष अतिथी ख्यातनाम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, सन्माननीय पाहुणे राज्यसभा खासदार संजय राऊत, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होत्या.
सुभाष घई म्हणाले की, माझ्या सार्‍या यशाचे श्रेय महाराष्ट्र व मराठी सिनेमाला जाते. मराठी मुलीशी लग्न झाले. माझ्या सिनेमाची प्रगती झाली. मी महाराष्ट्राचा व मराठी सिनेमाचा ऋणी असल्याचे ते म्हणाले.
खासदार राऊत यांनी मराठी चित्रपटसृष्टीला महाराष्ट्रात झगडावे लागते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुमित्राताईंना कृतज्ञता पुरस्कार प्रदान
या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक सुमित्रा भावे याना यंदाचा कृतज्ञता (जीवन गौरव) पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. सुमित्राताईंचे मनोगत याप्रसंगी अंजली पाटील यांनी वाचले. मी जीवनातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करते असे सुमित्राताई मनोगतात म्हणाल्या.

संध्या गौरव पुरस्कार प्रदान
मी मराठी वाहिनीचे संध्या गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. त्यात सचिन पिळगावकर यांना महाराष्ट्राचा अभिमान, मृणाल कुलकर्णी यांना गोदरेज ऑडिवेल ‘फिट सेलेब्रिटी मॉम’, संवद नखाते यांना ‘चित्रपट गुरु’, प्रसाद ओक यांना रुबाबदार व्यक्तिमत्व, चतुरस्त्र अभिनेत्री वर्षा उसगावकर, तर चतुरस्त्र अभिनेता म्हणून भरत जाधव यांना गौरविण्यात आले.