फिरकीपटूंची निवड भारतासाठी डोकेदुखी

>> इयान चॅपेलना हवा हार्दिक कसोटी संघात

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारताला फिरकीपटूंची निवड जपून करावी लागेल. तीनपैकी केवळ दोघांनाच पंधरा खेळाडूंच्या संघात स्थान मिळेल. तसेच या दौर्‍यात अष्टपैलूंची भूमिका महत्त्वाची ठरणार असून त्यासाठी भारताने हार्दिक पंड्याला कसोटी संघात निवडायला हवे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले.

हार्दिक कसोटीसाठी उपलब्ध असेल तर ते भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. हार्दिकच्या संघात असण्यामुळे भारताला गोलंदाजीचा एक अतिरिक्त पर्याय तयार होतो आणि दबावाच्या परिस्थितीत प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठीही हार्दिकचा चांगला वापर होऊ शकतो, असे चॅपेल पुढे म्हणाले. पंड्याला संघात घेतले तरच भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाजांसह उतरू शकतो. या परिस्थितीत ऋषभ पंत याच्याकडे यष्टिरक्षणाची तसेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी द्यावी लागेल, असे चॅपेल यांना वाटते.

फिरकीपटूंविषयी बोलताना चॅपेल म्हणाले की, अश्‍विनसारखा अनुभवी खेळाडू भारताकडे आहे. परंतु, ऑस्ट्रेलियातील त्याचा रेकॉर्ड सुमारच आहे. त्याची फलंदाजीदेखील खालावली आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजाच्या फिरकीतील धार कायम असून त्याच्या फलंदाजीत कमालीची सुधारणा झाली आहे. एक आक्रमक पर्याय निवडायचा झाल्यास कुलदीप यादवची चायनामन गोलंदाजी ऑस्ट्रेलियन खेळपट्‌ट्यांवर प्रभावी ठरेल.

मार्नस लाबुशेन याच्यामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फळी भेदणे भारताला सोपे जाणार नाही. पूर्वी वॉर्नर-स्मिथ या दुकलीवर ऑस्ट्रेलियन संघ बहुतांशी अवलंबून असायचा. परंतु, स्थिती बदलली आहे. ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू वेड व मिचेल मार्श हे त्रिकूट तीन जागांसाठी झगडत असल्याचे चित्र स्पर्धात्मकदृष्ट्या सुखावह असल्याचे चॅपेल यांनी शेवटी सांगितले.