ब्रेकिंग न्यूज़

फसवणूक

  •  सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर

नाहीतरी आईला सर्वच पत्रिका पाहणार्‍यांनी आधी सूचना दिली होती की ‘तुमची फसवणूक व्हायची शक्यता आहे.’ मग ती फसवणूक अशी झाली तर त्यात फार काही कुठं मोठं बिघडलं? उलट त्यांचे सर्वांचे भविष्य बरोबरच ठरले, भविष्यातच तसे होते म्हणूनच तसे झाले.

अमोल एक तिशी उलटून गेलेला सोफ्टवेअर इंजिनिअर. गोरा, हॅन्डसम दिसणारा. चांगल्या कंपनीत नोकरी. शहरात वास्तव्य. सतत परदेशी जाण्याची संधी मिळाल्याने बर्‍याचदा घडलेलं परदेशगमन. अशा होतकरू मुलाचे लग्नाचे मात्र वय सरून चालले होते, पण योग काही जुळून येत नव्हता. कधी याला मुलगी पसंत पडे तर तिच्यात घरच्यांना काही खोट दिसे, तर कधी पत्रिका जुळत नाही म्हणून नकार पचवावा लागे.

त्याच्या आईने बरेच ज्योतिषी, भटजी यांचे उंबरठे झिजवले होते. बर्‍याच ठिकाणी पत्रिका दाखवून झाल्या. बहुतेक ठिकाणी तिला एक कॉमन सल्ला मिळाला की फसवणुकीची शक्यता आहे, तेव्हा नीट पत्रिका पाहूनच लग्न करावे. या वाक्याची त्याच्या आईने मनाशी अगदी खूणगाठच बांधली होती. मुलगी पाहायला जायच्या आधी ती पत्रिका तपासून पाही. नाडी, गण, दोघांचे किती गुण जुळतायेत इत्यादी सारे ती पडताळून पाहायची आणि ते जुळले तर मगच मुलगी बघायचा घाट घातला जायचा. शिवाय तिच्या मनात काही ठाम विचार होते. अमक्या राशीची मुलगी नको म्हणजे अगदी नकोच! मग ती कितीही सुंदर, मुलाला साजेशी असली तरी ती ढुंकूनही तिकडे पाहत नव्हती. बिचारा अमोल या सर्व दुष्टचक्रात अडकला होता. त्याला आईच्या मनाविरुद्ध जाणे शक्य नव्हते. त्याने आईला समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तिचा आपल्या मतांवर ठाम विश्वास होता. त्याला उलट ती दम भरी, ‘‘हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करतेय ना? की मला हौस आलीय चांगल्या चांगल्या मुली नाकारण्याची?’’
आता मुली बघून बघून तोही अगदी कंटाळून गेला होता. ज्या मुलीची पत्रिका जुळायची, ती नेमकी दिसायला खास नसे किंवा शिकलेली नसे किंवा उंचीच जुळायची नाही. अशा अनेक खोडी निघत होत्या. पत्रिका जुळतेय म्हणून न आवडलेल्या कुठल्याही मुलीशी कसं लग्न करायचं? ज्या मुली त्याला पसंत पडण्यासारख्या होत्या त्यांना पत्रिका जुळत नाही म्हणून नकार देणे त्याला आवडत नसे. पण आईच्या हट्टापायी हे सर्व त्याला निमुटपणे करावं लागत होतं. आईच्या चौकटीत बसणारी कुठलीच मुलगी सांगून येत नव्हती.

आईचा भविष्य, पत्रिका, ग्रहदशा, पिडा, साडेसाती, असल्या गोष्टींवर ठाम विश्वास. आणि त्यातली माहिती मिळवण्याचे साधन म्हणजे टीव्हीवरील भविष्यावरचे कार्यक्रम. ते सारे ती न चुकता पाहत असे आणि मग तिच्या असल्या ज्ञानात आणखीनच भर पडत असे. तिच्या माहितीच्या, आजूबाजूच्या, नात्यागोत्यांच्या पती-पत्नींची भांडणे, विस्कटलेले संसार तिच्या मनात येत आणि योगायोगाने तिला असे आढळून येई की कोणाची रासच जुळत नव्हती, तर कोणाचे गुणच जुळत नव्हते तर कुठे आणि काहीतरी जुळत नव्हते.

मग खडाष्टक, षडाष्टक, ग्रह राशी शांती सारे उपायही करून झाले. पण कुठे अडत होते ठाऊक नाही, पण लग्न काही जुळत नव्हते.
अमोलही आता ‘इथून पुढे मी मुलगी बघायला जाणार नाही, तुला काय ठरवायचे ते तूच ठरव’ या त्याच्या मतावर ठाम राहिला. आईवर सारे सोपवून मोकळा झाला. इतका छान देखणा तरुण, इतकी छान नोकरी पण त्याला मिळेना छोकरी. अशी परिस्थिती झाली होती.

अशीच एका मुलीची फोटो, पत्रिकेसह माहिती आली. ही माहिती ई-मेलने आल्याने आणि घरात त्याचाच ई-मेल आयडी असल्याने साहजिक त्यानेच ती सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपवर पाहिली. त्याला मुलगी आवडली. त्या ई-मेलमधल्या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं त्याला वाटलं. मग त्याच्या लक्षात आलं, त्याच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये मधेच तिचेही ऑफिस आहे. कँटीनमध्ये बर्‍याचदा त्याने तिला पाहिलं होतं, पण ओझरतं. दोघांचे कँटीन एकच असल्याने त्याने तिच्याशी ओळख वाढवली. दोघेही बरोबर चहा, नाश्ता घेऊ लागले. मुलगी त्याला आवडली होती. तिला चांगली नोकरीही होती. पण पत्रिकेचं काय, असा प्रश्न उभा राहिला.

हळूहळू त्याचे तिच्याशी चांगलेच सूत जुळले. मग त्याने तिला सर्व गोष्टींची कल्पना दिली व आईच्या अट्टाहासाने आतापर्यंत आपण बर्‍याच मुलींना नकार दिलाय पण आता परिस्थिती वेगळी आहे, तू मला आवडतेस पण मी आईच्या मर्जीविरुद्ध जाऊन तिला दुखावून लग्नही करू शकत नाही. त्यासाठी मी एक पर्याय निवडलाय. तुझी पत्रिका माझ्या पत्रिकेला मॅच होईल अशी बनवून घेऊया, आणि मग ती आईला दाखवली, पत्रिका जुळतेय अशी खात्री झाली तर ती लग्नाला तयार होईल. दोघेही लांबच्या एका ज्योतिषाकडे गेले. पैशाचे आमिष दाखविताच त्यानेही त्याच्या पत्रिकेशी जुळेल अशी पत्रिका करून दिली. रास, नाडी, गुण इत्यादी इत्यादी जुळेल असे जल्मवेळेचे नाव तिला बहाल केले. त्यांना फार काही फेरफार करावे लागले नाहीत. दोघांची नाडी एक येत होती ती बदलली, शिवाय आईला हव्या त्या राशीची ती नव्हती तिथे खो पडला असता म्हणून मग रासही बदलली. अशी बदललेली पत्रिका फोटोसह आता परत तिने त्याच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवली. ते पाकीट हातात पडताच आईने नेहमीप्रमाणे पत्रिका किती जुळते ते सारे डीटेल्स पाहून घेतले व त्याला तू प्रत्यक्षात मुलगी पाहून ये, या कॉम्प्युटरवर माझा भरोसा नाही, फोटोत मुलगी छान दिसते पण प्रत्यक्षात तशी असेलच असे नाही, तेव्हा खात्री करून घे, मागे आठवतेय ना फोटो छान वाटला म्हणून मुलगी पाहायला गेलो तर फोटो होता तिच्या कॉलेजमध्ये असतानाचा आणि प्रत्यक्षात पहिली तर ड्रमसारखी सुटलेली मुलगी, असे आईने त्याला सांगितले. हे सारे आठवून त्यालाही हसू फुटले. आपण ती मुलगी आधीच पाहिलीय आणि तिच्याशी लग्न करायचे ठरवलेय याचा त्याने घरात सुगावा लागू दिला नाही. मग मुलगी पाहून आल्याचं नाटक करत त्याने मुलगी पसंत असल्याचं सांगितलं.

जवळजवळ पंचवीस ते तीस मुलींना पाहून, नकार देऊन तो या परिस्थितीवर पोचला होता. आईची पत्रिकेची शंकाही मिटली होती. मुलीच्या घरच्यांचा पत्रिका वगैरेवर फारसा विश्वास नसल्याने त्यांनी त्यात काही इंटरेस्ट दाखवला नाही व अशा तर्‍हेने शेवटी अमोलचं लग्न ठरलं. त्याला त्याच्या आवडीची वधू मिळाली. पण तिला मात्र आपण खोटी पत्रिका दाखवल्याचे, अमोलच्या आईची फसवणूक केल्याचे वाईट वाटत होते. अमोल म्हणाला, अगं तसंच काही नाही. नाहीतरी आईला सर्वच पत्रिका पाहणार्‍यांनी आधी सूचना दिली होती की ‘तुमची फसवणूक व्हायची शक्यता आहे.’ मग ती फसवणूक अशी झाली तर त्यात फार काही कुठं मोठं बिघडलं? उलट त्यांचे सर्वांचे भविष्य बरोबरच ठरले, भविष्यातच तसे होते म्हणूनच तसे झाले. यात आपला काहीही दोष नाही हे तिला पटले. पण आपण तिला हे नंतर काही वर्षानंतर सांगूया. सध्या तरी तिला या समाधानात राहू दे, की मुलाचे मुलीचे गुण चांगले जुळतायेत, आपले स्वभाव चांगले जुळलेत ना? मग संसारही चांगलाच होईल.

लग्नात त्याची आई उशिरा का होईना पण मला हवी तशी सून मिळाली हो! नाडी, गण, नक्षत्र सारे कसे मनासारखे जुळून आले, शिवाय सूनही अगदी मनासारखी मिळाली बरं का! आता असतो कुणाकुणाचा योग उशिरा, दुसरं काय! असं सर्वांना मोठ्या उत्साहात सांगत होती. पण यामागचा करता करविता कोण हे तिला ठाऊक नव्हतं.