ब्रेकिंग न्यूज़

फसण्याच्या तर्‍हा

  • दत्ताराम प्रभू साळगावकर

मोजायला पैसे काढले तर त्यापैकी पाचशेची नोट ही पाचशे नोटीची झेरॉक्स कॉपी होती. कातरवेळच्या मंद उजेडात तिला ती समजलीही नाही. केळी गेलीच, उरलेले चारशे रुपये दिले ते गेलेच! दिवसाची सारी कमाई गेली व पाचशेची झेरॉक्स नोट हाती राहिली.

आपण सर्व म्हणजेच प्रत्येकजण कधीतरी, कुठेतरी फसत असतो किंवा फसवले जात असतो. कोणाला या म्हणण्यात अतिशयोक्ती वाटेल, परंतु थोडा जरी विचार करून बघितला तर त्यातला तथ्यांश लक्षात येईल. काहीजण बोलण्यातून फसतात, ऐकण्यातून फसतात, करण्यातून फसतात, पाहण्यातून फसतात. असे फसण्याचे किंवा फसवले जाण्याचे अनेक मार्ग आहेत. साधा रस्त्यावर जादूचे खेळ करणारा हातचलाखीने आपणास हातोहात फसवतो व तेही आपल्या डोळ्यांसमक्ष! आपण व्यवहार करताना फसतो, वस्तू विकत घेताना फसतो. अशा प्रकारची फसवणूक आपण फसले किंवा फसवले गेल्यावर कळते. पण त्यावेळी त्याचा उपयोग नसतो. आपल्याला क्षणिक भुरळ पडते, तीच फसवणुकीला कारणीभूत ठरते. अशा गोष्टी आपण ‘अक्कल खात्यात’ जमा करून टाकतो.

आपण कान उघडे करून एकेकाच्या कहाण्या ऐकल्या की आपल्याला त्या विचित्र वाटतात. आपण केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप करणारे भेटतात. पैसे उधार देऊन फसलो, नोकरी सोडून फसलो, प्रमोशन घेऊन फसलो, विश्‍वास ठेवून फसलो, प्रेम करून फसलो, घर बांधून फसलो, पैसे गुंतवून फसलो, एवढंच काय… लग्न करून फसलो(!)… एवढीच काय याहूनही लांबलचक यादी आपल्या कानापर्यंत येतच असते! पण एक गोष्ट खरी, आपला निष्काळजीपणाच बर्‍या वेळा आपल्याला फसवणुकीच्या मार्गावर नेतो!
दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी जमिनीचे दोन प्लॉट्‌स विकत घेतले. क्षेत्रफळ व आकाराने अगदी एकसारखे व एकमेकाला लागून असलेले. कोणाला कुठला हे एकवेळ घेणार्‍यालाही क्षणभर गोंधळात टाकणारे! त्यापैकी एकाने घर बांधायला घेतलं. स्वतःला व्यापामुळे जमणार नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर नेमला. पैशांचा व्यवहार तसेच कॉन्ट्रॅक्टसंबंधी सर्व गोष्टी कशा कायदेशीर व पद्धतशीर केल्या, कोणतीही उणीव न ठेवता. कॉन्ट्रॅक्टरनं कामही सुरू केलं, पण गफलत झाली ती इथेच! घर त्याच्या प्लॉटमध्ये न बांधता तसाच असलेल्या दुसर्‍याच्या प्लॉटमध्ये बांधायला सुरुवात केली. जवळजवळ छपराइतकं बांधकाम होईपर्यंत तो दुसरा मालक गप्प राहिला व त्याने पुढील बांधकामाला स्थगिती आणली. यावर उपाय राहिले ते असे-
एक – झालेलं बांधकाम पाडून टाकायचं, केलेला खर्च फुकट घालवायचा.
दोन – बांधकाम केलेला दुसर्‍याचा प्लॉट आपण घ्यायचा व आपला त्याला द्यायचा व आपल्या चुकीबद्दल योग्य ती भरपाई त्याला द्यायची.
तीन – कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करायची.
चार – प्रकरण येनकेनप्रकारेण सामोपचारानं सोडवायचं.
दुर्दैवानं यातलं काहीच झालं नाही; प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं व भिजत पडलं.
ही निष्काळजीपणाची कमाल होती; ‘घर बांधायला घेऊन फसलो’ म्हणून रडायची नव्हे!

नोकरीनिमित्त परराज्यातल्या एका महानगरात असताना ऐकलेली एक गोष्ट, आमच्या एका चांगल्या कस्टमरने सांगितलेली. त्याच्या घरात लग्नसमारंभ ठरला. लग्न म्हणजे वेगवेगळ्या व महागड्या वस्तू घेणं आलंच! तो आणि त्याची बायको सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतात अशा प्रसिद्ध बाजाराच्या ठिकाणी गेली. ड्रेस, साड्या, शालू, पैठणी, चांदीची भांडी वगैरे भरमसाठ खरेदी केली. घर लांब असल्यामुळे टॅक्सीनं जायचं ठरलं. आणखीही काही घ्यायचं राहिलं ते वाटेत घेऊया म्हणून टॅक्सी ठरवली व घेतलेलं सामान टॅक्सीत भरून घरच्या वाटेला लागली. वाटेत टॅक्सीवाल्याला रस्त्याच्या बाजूला टॅक्सी पार्क करायला लावली. बायकोला टॅक्सीत बसायला सांगून आमचा कस्टमर उरलेल्या वस्तू आणायला जवळच्या ठिकाणी गेला. तेवढ्यात टॅक्सीचा ड्रायव्हर गाडीतून उतरला व हातात फडकं घेऊन गाडी पुसायला लागला. गाडीत बसून असलेल्या कस्टमरच्या बायकोला त्यानं सीट पुसण्याच्या निमित्तानं थोडं बाहेर उतरून राहायला सांगितलं. ती उतरल्याची संधी साधून दार बंद करून गाडी सुरू करून सामानासह पोबारा केला. असं काही होऊ शकेल हे त्या बायकोच्या लक्षातसुद्धा येऊ शकलं नाही. ती फार गांगरली; थोडा आवाज पण केला पण त्याचा उपयोग काही झाला नाही. नवरा येऊन पाहतो तर काय? टॅक्सी गायब व बायको हतबल होऊन उभी!
पोलिसात तक्रार नोंदविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, म्हणून नोंदवली. गाडी चालवणार्‍याचं जेवढं काही तोकडं वर्णन होईल तेवढं केलं, पण ते कितपत् उपयोगाचं कोण जाणे! फक्त प्रयत्न म्हणून. हताश होऊन नवरा-बायको घरी परतली. खरेदी केलेल्या वस्तू मिळतील ही आशा सोडून दिली.

दोन दिवसांनंतर तो कस्टमर कामानिमित्त नेहमीप्रमाणे बाहेर पडला असताना त्याला एक टॅक्सी उभी असलेली दिसली. त्याला पुसटसा संशय आला की हीच ती टॅक्सी असावी. बारीक नजरेनं पाहिलं तर चालक पूर्वीचा नव्हता. थोडा वेगळा वाटला. पण प्रयत्न म्हणून जवळच्याच टेलीफोन बूथवर जाऊन पोलीस स्टेशनला फोन लावला व त्या संशयित गाडीसंबंधी सांगितलं. पुढे सांगितलं की ‘मी ती गाडी भाड्यानं घेऊन पोलीस स्टेशनच्या रस्त्यावरून जाईल अशा रीतीनं येतो. दोन पोलीस रस्त्यावर तैनात ठेवा.’

पोलीस याला राजी झाले.
‘प्रयत्नांती परमेश्‍वर!’ या विश्‍वासावर गाडी भाड्यानं घेतली व पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्याला लावली. स्टेशननजीक रस्त्याच्या बाजूला पार्क करायला लावली. पोलीस हजर होतेच, त्यांना खूण केली. पोलीस आले. गाडी अडवली. ड्रायव्हरकडे चौकशी केली. दोन दिवसांपूर्वी गाडी कोण चालवत होता ती माहिती काढली व त्याला बोलवून घेतलं. ‘होय-नाही, होय-नाही’च्या नाटकानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्या दुसर्‍या ड्रायव्हरनं गुन्हा कबूल केला. पळवलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या. आमचा कस्टमर खूश झाला! सर्व वस्तू मिळाल्या म्हणून व त्यापेक्षा जास्त एवढ्याचसाठी की त्या चोरीचा त्यानं आपण स्वतःहून हुशारीनं तपास लावला.

पण दुर्दैव असं की आम्हाला त्यानं ही गोष्ट पंधरा दिवसांनी सांगितली; तोपर्यंत त्याच्या वस्तू त्याला मिळाल्या नव्हत्या. कायदेशीर (?) सोपस्कारात (?) अडकल्या होत्या. दुसरा काही उपाय करायला पाहिजे होता. सनदशीर मार्गानं गेलो व फसलो असं अगदी उद्वेगानं डोळ्यात पाणी आणून बोलून निघून गेला. पुढे त्याचं काय झालं ते आम्हाला कळलं नाही, पण एक नवीन अनुभव म्हणून गोष्ट लक्षात राहिली.
अशीच इथल्या मार्केटमधली फसवणुकीची गोष्ट. सायंकाळच्या कातरवेळी केळी विकणार्‍या एका म्हातार्‍या बाईकडे एक गिर्‍हाईक आलं. सबंध दिवसाच्या क्षीणाने दमून म्हातारी आपला व्यापार गुंडाळून घरी जाण्याची तयारी करत होती. चार पैसे कमावलेलेही असावेत. गिर्‍हाईकाने एकदम चार/पाच डझन केळ्यांची मागणी केली. सौदा ठरला शंभर रुपयांचा. केळी घेऊन तिने गिर्‍हाईकाकडून पाचशे रुपयांची नोट घेतली. केळी व चारशे रुपये परत दिले. दिवसा तिन्हीसांजेला लक्ष्मी पावली म्हणून खूश होऊन घरी गेली. मोजायला पैसे काढले तर त्यापैकी पाचशेची नोट ही पाचशे नोटीची झेरॉक्स कॉपी होती. कातरवेळच्या मंद उजेडात तिला ती समजलीही नाही. केळी गेलीच, उरलेले चारशे रुपये दिले ते गेलेच! दिवसाची सारी कमाई गेली व पाचशेची झेरॉक्स नोट हाती राहिली.
असे हे फसण्याचे किस्से!