फटाके बंदी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दिवाळी हे प्रकाशपर्व मानले जात असल्याने फटाक्यांची आतषबाजी हा या उत्सवाचा परंपरेने भाग बनला असल्याने या निवाड्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, या बंदीची पार्श्वभूमीही समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग पडले. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत सोडले जाणारे घातक प्रदूषणकारी घटक श्वसनातून मानवी शरीरात गेल्याने फुफ्फुसांचे गंभीर विकार संभवतात. त्यामुळे प्रदूषणाच्या नजरेतून अशा प्रकारची बंदी ही योग्यच आहे अशी भूमिका पर्यावरणप्रेमी घेत आहेत, मात्र, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरच ही बंदी घातली गेली असल्याने हिंदू धार्मिक परंपरेला त्यामुळे बाधा पोहोचत असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. या समस्येचे उत्तर मात्र या दोन्ही भूमिकांच्या मध्ये कोठे तरी दडलेले आहे. महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब बनलेली आहे. प्रस्तुत निवाडा केवळ दिल्लीपुरता जरी असला तरी देशातील अन्य शहरांमध्येही परिस्थिती काही फारशी वेगळी आहे असे म्हणता येत नाही. आज ना उद्या असे फर्मान या शहरांबाबतही निघल्याशिवाय राहणार नाही. फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घातक आहेत याबद्दल दुमत नाही आणि दिवाळीच्या वेळी जेव्हा लक्षावधी लोक फटाके फोडतात, तेव्हा त्या थंड वातावरणात खाली साचून राहणार्‍या धुरामुळे कित्येकांना – विशेषतः मुलांना श्वसनाचा त्रास होतो हेही खरे आहे. प्रति घनमीटर पीएम २.५ प्रकारचे ६० मायक्रोग्रॅम आणि पीएम १० प्रकारचे १०० मायक्रोग्रॅमपर्यंत प्रदूषणकारी घटक सामान्यतः सुसह्य मानले जातात. दिल्लीत ते सुमारे साडे सातशे मायक्रोग्रॅम आढळून आले होते. म्हणजे दिल्लीच्या हवेमध्ये किती प्रचंड प्रदूषण आहे हे लक्षात येते. अर्थात, दिल्लीतील या प्रदूषणास अन्य अनेक कारणेही आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण हे एक मोठे कारण आहे. त्यासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने सम – विषम सक्ती केलेली होती. डिझेल गाड्यांवरही निर्बंध घातले गेले. दिल्लीच्या परिसरात वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे डिझेलवर चालणारी जनित्रेही मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यातूनही प्रदूषण होत असते. आजूबाजूच्या ग्रामीण भागांतील शेतांमध्ये मळी जाळली जाते तो धूरही गुदमरवून टाकणारा असतो. त्यामुळे दिल्लीतील हवा स्वच्छ व श्‍वसनयोग्य राहावी याचा आग्रह धरणे चुकीचे म्हणता येणार नाही. परंतु अशा प्रकारच्या सक्तीद्वारे वा विक्रीवर प्रतिबंध लादल्याने काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. पहिली बाब म्हणजे ऐन दिवाळीत ही मनाई आल्याने व्यापार्‍यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे. फटाके उद्योग हा देशातील एक मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. त्या व्यवसायाच्या संपूर्ण साखळीवर या निवाड्याचा परिणाम संभवतो. फटाके ही काहींसाठी चैनीची वस्तू जरी असली, तरी त्यांचे उत्पादन, वाहतूक, विक्री या साखळीमध्ये असंख्यांची रोजीरोटी त्यावर अवलंबून असते हेही तितकेच खरे आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीत जरी फटाके विक्रीस बंदी असली तरी बाजूच्या परिसरांमध्ये ती लागू नसल्याने तेथून दिल्लीत चोरून फटाके आणणे वा ऑनलाइन खरेदी करणे सहजशक्य आहे. त्यामुळे ही बंदी प्रत्यक्षात उतरवणे कितपत शक्य होईल हा खरा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट अमलात आणायची असेल तर सक्ती हा त्यावरचा उपाय ठरत नाही. जेव्हा ती गोष्ट पटते आणि स्वेच्छेने स्वीकारली जाते, तेव्हाच खर्‍या अर्थाने तिची कार्यवाही होत असते. फटाक्यांच्या वापरासंदर्भातही हेच आहे. जनतेला फटाक्यांच्या अतिवापराचे दुष्परिणाम जेव्हा जाणवतील तेव्हाच तिला योग्य ते शहाणपण येईल. नुसत्या बंदीतून काळाबाजार, हप्तेबाजी, नफेखोरी यांचेच पेव फुटू शकते. त्यामुळे खरी गरज आहे ती जनतेमध्ये फटाक्यांच्या गैरवापराबद्दलच्या जागृतीची. दिवाळी हे प्रकाशपर्व आहे, परंतु फटाक्यांवर लाखो रुपयांचा त्या काळात चुराडा करावा असे शास्त्रात कोठेही लिहिलेले नाही. आसमंतातील अंधार प्रकाशाने उजळवून टाकून आपला आनंद व्यक्त करण्याचे इतरही मार्ग आहेत. त्यामुळे इतरांना उपद्रवकारक ठरतील, असे कानठळ्या बसवणारे आणि घातक वायू आसमंतात पसरवणारे फटाके हेच काही दिवाळी साजरे करायचे साधन नव्हे. हे भान जेव्हा सामान्यजनांना येईल, तेव्हाच दिवाळीच्या किंवा अशा सण उत्सवांच्या जोडीने कळत – नकळत फोफावलेल्या अनिष्ट हानीकारक प्रथांना चाप लागेल. स्वेच्छेने अशा गैर गोष्टींचा त्याग केल्याचा आनंदही वेगळा असेल.