प्रेरणादायी

वरवर पाहता ‘चंद्रयान २’ अंतिम टप्प्यात अपयशी ठरल्याचे जरी दिसत असले तरी त्याने चंद्रापासून २.१ किलोमीटर अंतरापर्यंत नियोजनाबरहुकूम अगदी अचूकपणे गाठलेली मजल प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. चंद्रयान २ चे लँडर ‘विक्रम’ चंद्रावर उतरू शकले नाही. चंद्रापासून फक्त २.१ किलोमीटर उंचीवर असताना त्याचा पृथ्वीशी एकाएकी संपर्क तुटला. त्यामुळे त्याचे आणि त्याच्यातील ‘प्रज्ञान’ चे पुढे नेमके काय झाले हे आपल्याला कळू शकलेले नाही. माहितीच्या पृथक्करणाअंतीच त्याबाबतचे वास्तव कळू शकेल, परंतु असे असले तरीही जेथवर आपण झेप घेतली ते यशही थोडथोडके नाही! मुळात चंद्रावर हे यान उतरवणेच अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी सुरवातीलाच त्या ‘भीतीदायक पंधरा मिनिटां’चा उल्लेख केलेला होता. वेगवान विमानाच्या कित्येक पट वेगाने धावणारे यान एकाएकी त्याची गती कमी करून चंद्रावर उतरवणे ही काही सोपी गोष्ट नव्हतीच, परंतु त्या अंतिम टप्प्याआधी आपल्या चंद्रयानने वेळोवेळी एकेक टप्पे ज्या कुशलतेने पार केले, ते सारे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. शेवटच्या पंधरा मिनिटांतही बहुतेक वेळ ‘इस्रो’च्या नियंत्रणकक्षातील पटलावर ‘विक्रम’चा तो हिरवा बिंदू आखून दिलेल्या पथावरून अगदी गणितीय अचूकतेने मार्गक्रमण करीत असलेला अवघ्या जगाने पाहिला. इस्रोच्या या क्षेत्रातील अधिकाराचा निर्वाळा देणारा तो प्रवास होता. शेवटच्या क्षणी ‘विक्रम’चा अनपेक्षितरीत्या तोल ढळला आणि पुढे संपर्कच तुटला, परंतु तोवर त्याने मारलेली मजल ही काही कमी महत्त्वाची नव्हती. ज्या कारणामुळे ‘विक्रम’ भरकटले, त्यात ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांकडून राहिलेल्या त्रुटीपेक्षा चंद्रावरील अनपेक्षित वा अज्ञात परिस्थितीचा वाटा अधिक असावा असेच दिसते आहे. शिवाय चंद्रयानचे ऑर्बिटर तर यापुढेही अवकाशात चंद्राभोवती यशस्वी परिभ्रमण करणार आहे, त्याची छायाचित्रे टिपून पाठवणार आहे. त्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली असे मानण्याचे काहीही कारण नाही. शेवटी प्रत्येक अपयश ही यशाची एकेक पायरी असते. पहिल्याच झटक्यात सगळे काही आपल्या नियोजनबरहुकूम होतेच असे नसते. आलेल्या अपयशापासून शिकून, धडा घेऊन, चुका सुधारून पुढे जायचे असते आणि हाच धडा ‘चंद्रयान’ ने आज आपल्याला दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’च्या अपयशानंतरही त्यांची कौतुकाने पाठ थोपटली, त्यांचे केवळ सांत्वन केले नाही, तर त्यांचा उत्साह वाढवला. ‘‘मी तुमचे सांत्वन करण्यासाठी नाही, तर तुमच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे’’ असे ते दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या वैज्ञानिकांच्या भेटीस गेले असता उद्गारले. पंतप्रधान तेथून बाहेर पडत असताना त्यांना निरोप देताना ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन भावूक झाले आणि त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांना ज्या आपुलकीने आणि मायेने जवळ घेऊन थोपटले, तो या मोहिमेचा एक मानवीय चेहरा कोट्यवधी भारतीयांच्या मनःपटलावर कायमचा कोरला गेलेला आहे. सिवन यांच्या त्या अश्रूंमागे या प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या हजारो शास्त्रज्ञांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम दडलेले होते. स्वतः सिवन यांची एक वैज्ञानिक म्हणून झालेली वाटचाल देखील किती असाधारण स्वरूपाची आहे. कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका खेड्यात गरीब शेतकर्‍याच्या घरी जन्मलेला हा मुलगा तामीळ माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकला. तो अनवाणी शाळेत जायचा, मोठे होण्याची स्वप्ने पाहायचा. डोळ्यांत स्वप्न असेल, ह्रदयात जिद्द असेल आणि त्या स्वप्नांना त्या जिद्दीने साकारण्यासाठी प्रचंड परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कोठून कोठे जाता येते हा संदेश सिवन यांची वैज्ञानिक कारकीर्द आज देशाला देते आहे. खरोखरच या चंद्रयान मोहिमेने जी प्रेरणा तमाम देशवासीयांना दिलेली आहे ती फार मोठी आहे. विशेषतः या मोहिमेने जे प्रचंड औत्सुक्य आणि कुतूहल देशभरामध्ये निर्माण केले, देशाच्या नव्या पिढीमध्ये, मुलांमध्ये जागवले ते असामान्य प्रकारचे आहे. किती मुलांच्या मनामध्ये चंद्रयानच्या या सार्‍या प्रवासाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीजारोपण केले असेल, किती मुलांच्या मनामध्ये याने वैज्ञानिक स्वप्नांची पेरणी केली असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. एक चैतन्यमयी असे वैज्ञानिक वातावरण या मोहिमेने आपल्या देशात निर्माण केले. त्या जागृतीपुढे हे क्षणैक अपयश मामुलीच म्हणावे लागेल. चंद्रयान ही काही इस्रोच्या वाटचालीची सांगता नाही. त्याच्या आजवरच्या यशोमार्गावरील फक्त हा एक थांबा होता, जो हुकला एवढेच. परंतु मंगलयान असेल, संकल्पित गगनयान असेल, किंवा चंद्रयानचा यापुढील टप्पा असेल, त्या प्रयत्नांमध्ये कोठेही कोणतीही कसर राहणार नाही, उलट या अपयशापासून धडा घेऊन अधिक मोठे यश गाठण्याची चेतना या सार्‍या वैज्ञानिकांमध्ये जागेल अशी खात्री वाटते. त्यामुळे निराश का व्हायचे?
इन्हीं गम की घटाओंसे खुशी का चॉंद निकलेगा |
अंधेरी रातके पर्देमें दिनकी रौशनी भी है ॥