प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर बाळाची काळजी…

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर बाळाची काळजी…

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

तुम्ही आई झालात! तुम्ही स्वतःची काळजीही घेऊ लागलात. आता नवजात शिशूचे लालन-पालन तुम्ही करणार आहात. तेव्हा तुम्ही काय कराल?

खरे म्हणजे आपले मूल सुदृढ व्हावे याची काळजी मातेने गर्भारपणातच घ्यायला हवी. गरोदरपणात घेतलेल्या जेवणावर मूल पोसले जाते. गरोदरपणात काय खावे यावर आम्ही बोललोय. तरीही परत सांगावयास आणि तुम्हाला परत ऐकावयास हवे. कारण हे फार महत्त्वाचे असते. गर्भारपणात मुलाची शारीरिक वाढ होते. तेव्हा शरीर वाढीकरता लागणार्‍या सर्व घटकांची गरज त्याला असते. अगदी कॅल्शिअमची गरज लागतेच लागते. आईच्या उदरातच मुलांची हाडे बळकट होतात. गर्भारपणात जास्त जेवलात म्हणून मूल पोसणार व मग बाळंतपणात त्रास होणार ही शंकाच मुळी मनातून काढून टाका!!आता मूल जन्माला आलेय. पाश्‍चात्त्य देशात बाळंतपणानंतर लगेचच झालेल्या बाळाला न पुसता तसेच आईच्या पोटावर ठेवतात. मुलाला बघून आईला आनंद होतो. साहजिकच नैसर्गिकरीत्या ‘प्लासेंटा’ लवकरच बाहेर निघतो. रक्तस्रावही लवकरच कमी होतो.
आमच्या इथे तर वेगळेच आहे. बाळंत होणारी बाई मूल जन्माला आल्यावर नर्सला विचारते ‘‘मुलगा की मुलगी?’’ अजूनही तेच. विचारले नाही तर समजावे आईने मुलाचे गर्भारपणात लिंगनिदान केले होते… व साहजिकच ते मूल मुलगा होता. मग ती नर्स मुलगी असेल तर सांगायला वेळ काढते. कारण बाळंतबाईवर त्याचा वाईट परिणाम तिला नको असतो.
बाळंतपणानंतर पहिल्यांदा तुम्ही काय कराल?…
हां..! मुलाला स्तनाला लावाल. म्हणजे ते मूल स्तनाचे अग्र चोखेल… व त्यातून दूध निघणार… कोलेस्ट्रम निघेल.
भारतात बाळंतपणानंतर तासाभरात बाळाला दूध पाजणार्‍यांचे प्रमाण केवळ २४.५% आहे. तर पाच ते सहा महिन्यांपर्यंत पाजणार्‍या स्त्रिया ४६.३% आहेत. गोव्यात कोलेस्ट्रम पाजणार्‍यांचे प्रमाण ८५.८% तर तासाभरात दूध पाजणार्‍यांचे प्रमाण ५९.४% आहे.
मुलाला कोलेस्ट्रम पाजणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यात विटामिन्स असतात जेणेकरून नवजात बाळाला प्रतिकारशक्ती मिळते, त्याचे पोट साफ राहते. कितीतरी रोग पळून जातात. पचनक्रिया वाढते. कॅन्सर होत नाहीत.
मुलाला पोटाला धरल्याबरोबर मातेचे आरोग्य चांगले राहते. नऊ महिने पोटात जोपासना केल्यावर मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या श्रमाचे साफल्य झालेले असते.
सिझेरीयन झालेल्या मातेनेही मुलाला लवकर दूध पाजणे गरजेचे आहे. ऑपरेशनमध्ये दिलेल्या गुंगीचे प्रमाण ओसरल्यास डॉक्टरी सल्ल्यानुसार तान्हुल्या बाळाला दुधाला धरणे गरजेचे आहे.
चला, मूल जन्माला आले, तुम्ही त्याला दूध पाजू लागलात… कसे पाजणार दूध? खरे तर बसून… झोपून नव्हे! तर बसूनच मुलाला स्तनास धरणे. छोट्या मुलाच्या पोटाचा घेर ४-६ औंस असतो. भूक लागल्यावर हावरटासारखे दूध पिते. तेव्हा दूध देताना, मध्येच बंद करून मुलाला पलीकडच्या स्तनाला धरावे. कारण दूध दोन्ही स्तनात तयार होत असते. पोट भरल्यावर ते झोपले तर…? तेव्हा मध्येच दूध पाजायचे थांबवा… त्याला खांद्यावर घ्या. त्याचे पोट खांद्यावर दाबा… मग त्याच्या पोटातील हवा ढेकर रूपाने बाहेर निघेल.. मगच परत स्तनाला लावा.
दर दोन ते चार तासांनी मुलाला दूध पाजावे. ही प्रक्रिया चालू राहायला हवी. कामावर जाणार्‍या महिलांनी त्याचे पाढे तिने गिरवले आहेतच. ती सुट्टीवर राहणार, बाळाची निगा राखणार! नाहीतर गोळ्या खाऊन अंगावरचे दूध बंद करणार… मग बाळाला डब्याचे दूध… हे आलेच. पाळणाघर आहेच. हल्ली तर फॅड वाढलेच… प्रत्येक गोष्टीचे… तुम्हाला समाजात होणारा बदल दिसतो ना?
मागे मी लिहिलेले. आजकाल नवरा-बायको लग्नानंतर सोयीनुसार, नोकरीनुसार राहण्याची जागा ठरवतात. दिनक्रम ठरलेला असतो. सुनेला सासू-सासरे बरोबर नकोत. तेव्हा राहता राहिली सुनेची आई… ती असली तर मग मुलाचा सांभाळ करायला ती येते… पण हल्ली कुणीतरी नोकर बायका घरी ठेवून घेतात कामाला व तीच मुलाची काळजी घेते. तिने कोणत्या वेळेला मुलाला काय द्यावे याची यादी.. कॉम्प्युटरवर काढलेली चक्क फ्रीजवर लावली जाते. ऑफिसमधून आई फोन लावते, चौकशी करते.
स्वतःच्या शरीराविषयी चिंता असेल तर ‘लोंबणारे’ स्तन तिला नको असतात… व अंगावर पाजत राहिले तर मग स्तनाचा आकार बदलतो. तेव्हा शरीराची रेखिवता राखायला नको कां? ही शरीराची रेखिवता राखण्याची मानसिकता मुलाला धोक्याची ठरू शकते.
मूल अंगावर खेळल्यावर आईचा स्पर्श ओळखते… नाहीतर ती ओळखणार दाईला… आईला तर नाहीच नाही. बघा, विचार करा!
मुलाला जास्तीत जास्त अंगावर घ्या. त्याला जवळ घ्या. त्याला बोलता येत नसेल तरी बोला… ते आपले बोबडे बोल बोलू लागणार बघा. त्याला हात धरून चालवायला लागा… पोट ओढत तुमच्या हाकेला ओ देत ते पुढे येईल. हे सगळे आईच करते. हे सगळे आईच करते… तुम्ही आई आहात.. बाळंतपणात मुलाला दिलेले प्रेम त्यांच्यात तुमच्याविषयी प्रेम निर्माण करेल.. ती वेळ जाता कामा नये!
मुलाला दररोज आंघोळ घाला. बाळंतपणानंतर मातेला व मुलाला तेलाची मालीश करतात ही गरज आहे. कां? पूर्वी बाळंतबाईच्या पोटावर बांधायचे असायचे… आईकडून मुलीला तो मिळायचा व बाळंतपणानंतर आजही बायका त्याचा वापर करतात.. हे गरजेचे आहे हो!
हे बघा गर्भारपणात व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आपल्या पोटाचे, ओटीपोटाचे स्नायू, पोटर्‍या अगदी तयार असायला हव्यात. कारण नैसर्गिक बाळंतपणाला या प्रत्येक स्नायूंची गरज असते. आता तर बांळतपणाला सिझेरीयनचे खूळ भारी झालेय. तेव्हा व्यायाम करण्याची काय गरज? गरोदरपणात व्यायाम? काहीतरीच सांगतात ग बाई डॉक्टर!! अहो, डॉक्टरांना तुम्हाला सल्ला द्यायला वेळ तरी आहे का? हे सगळे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. बाळंतपणानंतर बायका व्यायाम करतात कां? नक्कीच नाही. तेव्हा व्यायाम केला तरच शरीर चांगले राहते. नको असलेली चरबी अंगावर चढू देऊ नका… नाही म्हणायला गरोदरपणात बायका आमचा एवढा सल्ला ऐकतात की दिवसभर खातच असतात…त्यातही नातू झाल्यावर तर सासू सुनेचे एवढे कौतुक करते की विचारू नका. तेव्हा व्यायाम करा. ही वेळ परत येणार नाही. आजचा जमाना एकच मुलाचा आहे. ‘आम्ही दोघे आमचे एक’!
आजच्या जमान्यात नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. प्रापंचिक प्रश्‍ने वाढलीत. अपेक्षा वाढल्या. राहायला घर हवे.. गाडी हवी.. पार्ट्या हव्यात.. बाहेरगावी फिरायला हवे.. थोडी मौज करायला हवी..! या सगळ्या गोष्टीत आपण विसरून जातो… अरे हो.. आपण घरी पार्टी करून उशिरा आलो. दाईने मुलाला आपल्या पोटाशी धरले.. त्याला दूध दिले.. झोपवले.. ते अंगाईगीत आपल्या आईने गात आपल्याला नेहमी झोपवले.. ते गाणेच मी दोन मुले झालीत तरी गायलेच नाही..!
मोठे झाल्यावर तुम्हाला ते विचारेल… मॉम, अंगाई गीत काय असते गं?… असे होऊ देऊ नका..! स्वतःला सांभाळा… भेटू!
………………………………………………………

Leave a Reply